Pages

Saturday, April 2, 2022

वनामकृवि सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचा समारोप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी च्या सुवर्ण जयंती महोत्सवाचे औचित्य साधुन सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने दिनांक १५ फेबुवारी ते ३१ मार्च राज्यस्तरीय तीस दिवसीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे आयोजन वेबीनारच्या माध्यमातुन करण्यात आले होते. सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप दिनांक ३१ मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी गुजरातमधील नवसारी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा डॉ. झिनाभाई पटेल हे उपस्थित होते तर विशेष अतिथी राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु मा डॉ. राजाराम देशमुख आणि डेहराडुन येथील भारतीय मृद व जल संधारण संस्थेचे संचालक डॉ. एम. मधु हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहूणे म्हणुन संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, नवसारी येथील एनएम कृषि महाविद्यालयाच्‍या मृदा शास्‍त्रज्ञा डॉ. सोनल त्रिपाठी, प्रगतशीत शेतकरी कृषिभुषण श्री. सोपानराव अवचार, आयोजक केंद्राचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे, डॉ. स्मिता खोडके, डॉ रणजित चव्‍हाण, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. मिनाक्षी पाटील आदींची उपस्थित होते.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, सेंद्रीय शेती संशोधन केंद्राच्‍या वतीने राबविण्यात आलेले प्रशिक्षण सेंद्रीय शेतीचा ज्ञानरूपी यज्ञ असुन यामाध्‍यमातुन राज्यातीलच नव्हे तर देशातील विविध कृषि विद्यापीठे, संशोधन केंद्र येथे सेंद्रीय शेती विषयात कार्य करणारे तज्ञ यांचे मार्गदर्शन राज्यातील शेतक­यांना डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून दिला. हे प्रशिक्षण शेतकरी बांधवा बरोबरच संशोधकांनाही दिशादर्शक ठरेल. विविध विषयात शेतक­यांना व प्रशिक्षणार्थी यांना सेंद्रीय शेतीबाबत तंत्रज्ञान व माहिती देण्यात आली. सेंद्रीय शेतीबाबत शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये दिवसेंदिवस जागरूकता येत आहे. भविष्यातही सेंद्रीय शेती संशोधनाच्या माध्यमातुन विकसीत होणारे तंत्रज्ञान, सेंद्रीय शेतीसाठी आवश्‍यक निविष्ठा, निविष्ठा निर्मीती, वापर, वितरण गुणवत्ता याबाबतही प्रशिक्षण कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन करण्यात येईल. राज्यातील प्रमुख पिकांच्या बाबतीत विशेष करून फळे व भाजीपाला पिकांमध्ये सेंद्रीय पद्धतीने संपूर्ण पीक लागवड तंत्रज्ञान विकसीत करण्यात येईल. विषमुक्त, आरोग्यदायी अन्न व संबंधीत तंत्रज्ञान तसेच सेंद्रीय पद्धतीने पिकांच्या लागवडीची सुत्रे विकसीत करून शेतक­यांपर्यंत पोहचविणे या उद्देशाने अशा प्रशिक्षण कार्यक्रमास मोठे महत्व आहे.

कुलगुरू मा. डॉ. झिनाभाई पटेल मार्गदर्शनात म्‍हणाले की,  विविध क्षेत्रात सेंद्रीय शेती संदर्भाने काम होत आहे. सेंद्रीय शेती करतांना केवळ अधिक बाजारभाव मिळण्याचे संकुचित उद्दिष्ट न ठेवता पर्यावरणाचे संरक्षण, जमिनीचे आरोग्य जपणे व सुरक्षीत अन्न उत्पादन ही महत्वाची उद्दिष्टे असली पाहिजेत. व्यापक पद्धतीने सेंद्रीय शेती केल्यास पर्यावरण व आरोग्य संवर्धनासोबतच सेंद्रीय उत्पादनास १०० ते २०० टक्के अधिक बाजारभाव मिळुन सेंद्रीय शेती फायदेशीर झालेली बघायला मिळते. शेती क्षेत्रासमोर असलेल्या समस्या, त्यांची कारणे जाणून घेऊन त्यावर वेळीच उपाययोजना आवश्‍यक आहे. सेंद्रीय शेतीत मुख्यत्वे संसाधनांचा कार्यक्षम वापर, पुर्नवापर, जैवविविधता संरक्षण यावर भर असला पाहिजे. जैविक क्रांती करतांना विकासाकडे लक्ष देणे तसेच वाढत्या लोकसंख्येसाठी पुरेसे उत्पादनही करावे लागेल. सेंद्रीय शेतीमध्ये मुख्य करुन पीक अवशेषांचा वापर, हिरवळीची खते, पीक फेरपालट, पिके व पीक पद्धतींची निवड या माध्यमातून जमिनीची सुपिकता वाढवावी लागेल. कीड व रोग व्यवस्थापनासाठी पिक फेरपालट, प्रतिबंधात्मक उपाय व जैविक पद्धतींचा अवलंब करावा लागेल. सेंद्रीय शेतीत सुरवात करतांना लगेच परिवर्तन होणार नाही यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर, टप्याटप्याने सेंद्रीया शेतीखाली वाढ करणे, स्वत:च्या अनुभवानुसार तसेच गटाच्या माध्यमातुन आणि तसेच धैर्य, विश्‍वास, सातत्य व नैतिकता या पातळीवर प्रसारदुत व देवदुत म्हणून प्रशिक्षणार्थींनी कार्यरत रहावे. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून समाज व पर्यावरण संरक्षणासाठी आपण सर्वांनी योगदान दिले पाहिजे आणि यातुन मिळणारे समाधान हीच खरी पावती आहे. 

विशेष अतिथी माजी कुलगुरु डॉ. राजाराम देशमुख मार्गदर्शनात म्हणाले की, सेंद्रीय शेती आणि विषमुक्त अन्न हि काळाची गरज आहे. विषमुक्त अन्नासाठी आज देशात व जगात मोठी मागणी आहे आणि सेंद्रीय मालास चांगला बाजारभावही मिळत आहे. यामुळे शेतक­यांना या क्षेत्रात मोठी संधी आहे. सेंद्रीय शेतीत अनेक समस्या असून त्यावर शेतक­यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

डॉ. एम. मधु यांनी कृषि विद्यापीठांनी व संशोधन केंद्रे यांनी सेंद्रीय शेतीसाठी अनुकुल अशा पिकांच्या विविध जाती निर्माण करणे आवश्‍यक असुन सेंद्रीय शेतीत माती व पाण्याचे संवर्धनावर भर दयावा लागेल असे सांगितले.

डॉ. दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले की, सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे देशातील विविध राज्यातील शेतक­यांना विविध राज्यातील कृषि विद्यापीठामधील शास्त्रज्ञांद्वारे संशोधन ज्ञान उपलब्ध करुन दिले. महाराष्ट्र शासनाने प्रकल्प सुरू करते वेळी दिलेल्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक हे शेतक­यांचे प्रशिक्षण असून गेली चार वर्ष हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम शेतक­यांसाठी राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाद्वारे देशातील शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्या विचाराची देवाण घेवाण होत आहे. या प्रशिक्षणात सेंद्रीय शेतीसाठी महत्वपुर्ण असे विषये जसे की, पीक लागवड, पीक संरक्षण, प्रमाणीकरण, विपणन यावर विशेष व्याख्यान ठेवण्यात आले होते. सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या मार्फत विद्यापीठाची २० हेक्टर क्षेत्र प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

डॉ. सोनल त्रिपाठी यांनी असे सांगितले की, शेतकरी हे सर्व जगाला अन्न पुरवितात. तसेच सेंद्रीय शेती करणारे शेतकरी मोल्यवान, नै‍सर्गिक संसाधनांची रक्षा करतात. याद्वारे शेतकरी देशाची सेवाच करत आहेत. माती हा पृथ्वी वरील जीवनाचा सार आहे. सेंद्रीय शेती चांगल्या मातीचे संरचनेला चालना देते.

कृषिभुषण श्री. सोपानराव अवचार आपल्‍या मनोगतात म्‍हणाले की, सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे. जुन्या काळामध्ये लोक सेंद्रीय शेतीच करत असत. नंतर रासायनिक खतांचा बेसुमार वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडला, त्याचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम झाले. सेंद्रीय शेतीत प्रमाणीकरण पद्धतीत सुधारणा करणे गरजेचे असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमाच्‍या प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे सांगितले की, सेंद्रीय शेती करतांना शेतकरी बंधु भगिनी यांना येणा­या समस्या व अडचणी लक्षात घेऊन या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्‍याचे सांगितले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. प्रवीण कापसे आणि प्रा प्रितम भुतडा यांनी केले तर आभार डॉ. रणजीत चव्हाण यांनी मानले. डॉ. जयश्री एकाळे यांनी संकलक म्हणुन काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. स्मिता खोडके, डॉ. कैलास गाढे, डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. संतोष फुलारी, डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. अनुराधा लाड, डॉ. श्रध्दा धुरगुडे, डॉ. संतोष बोरगावकर, डॉ. सारीका नारळे, श्री. ऋषीकेष औंढेकर, श्री. अभिजीत कदम, डॉ. सुनिल जावळे, श्री. दिपक शिंदे, श्री. सतिश कटारे, श्री. भागवत वाघ, श्री. दशरथ गरुड, श्री. सचिन रणेर आदींनी कार्य केले.

सदर तीस दिवसीय कार्यक्रम राबविण्यासाठी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण आणि संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनखाली आयोजन करण्‍यात आले होते. प्रशिक्षणात ४४ शास्त्रज्ञ / तज्ञांनी ३३ सत्रांमध्ये वरील विषयांवर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणासाठी ५५३३ प्रशिक्षणार्थींनी नोंदणी केली. प्रशिक्षणाचा शेतकरी बंधू भगिनी, विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदींनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. प्रशिक्षणाकरिता राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्राध्यापकांचे सहकार्य मिळाले. श्री. मंगेश मांडगे, श्री. ओमकार नागवाडे व अहमदनगर येथीकृषि प्रशिक्षण संस्‍थेच्‍या संपूर्ण टिमचे मोलाचे तांत्रिक सहकार्य लाभले.

सदरिल प्रशिक्षणात सेंद्रीय शेतीमध्ये पीक लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, जैविक कीड व रोग व्यवस्थापन, भाजीपाला व फळपिकांचे सेंद्रीय पद्धतीने व्यवस्थापन, सेंद्रीय शेतीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, रेशीम उद्योग, प्रक्रिया उद्योग, अवजारांचा कार्यक्षम वापर, सौर ऊर्जा व इतर अपारंपारिक साधनांचा वापर, जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर, पशुधन व्यवस्थापन, मधुमक्षीका पालन, सेंद्रीय प्रमाणीकरण, सेंद्रीय शेतमाल विक्री व बाजारपेठ तंत्रज्ञान आदी विविध विषयांवर राज्यातील व देशातील नामांकित कृषि विद्यापीठे, संशोधन संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था येथील तज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये नवसारी कृषि विद्यापीठ, नवसारी, गुजरात, आनंद कृषि विद्यापीठ, आनंद, गुजरात, केद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैद्राबाद, भारतीय एकात्मिक शेती पध्दती संशोधन संस्था, मोदीपुरम, उत्तर प्रदेश, राष्ट्रीय जैविक शेती केंद्र, गाजीयाबाद, प्रादेशिक जैविक शेती केंद्र, नागपूर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला, कृषि विभाग व इतर स्वयंसेवी व खाजगी संस्थेतील  तज्ञांनी मार्गदर्शन केले.