Pages

Sunday, May 1, 2022

वनामकृवित महाराष्‍ट्र दिन साजरा

जागतिक कामगार दिनाचे औजित्‍य साधुन कर्मचा-यांचा सत्‍कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक मे रोजी महाराष्‍ट्र दिन साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य क्रिडा प्रांगणात कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. याप्रसंगी महाराष्‍ट्र दिन जागतिक कामगार दिनाच्‍या कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी शुभेच्‍छा दिल्‍या. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कृषि औद्योगिक क्रांतीचे स्‍वप्‍न पाहुन महाराष्‍ट्र राज्‍याची स्‍थापना करण्‍यात आली. कृषि आणि कृषि उद्योगच राज्‍यातील प्रगतीचा पाया आहे. साखर उदयोग, कापड उदयोग, दुग्‍धव्‍यवसाय आदींना कृषि क्षेत्राने बळ दिले. राज्‍यात चार कृषि विद्यापीठाच्‍या स्‍थापनेनंतर फळ, कडधान्‍य व तेलबीया वर्गीय पिक उत्‍पादनातही भरीव अशी वाढ झाली. राज्‍यात कृषि तंत्रज्ञानाच्‍या आधारे हरित क्रांती, धवल क्रांती, नील क्रांती झाली. गेल्‍या पन्‍नास वर्षात राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठाने कृषि शिक्षण व संशोधनाच्‍या माध्‍यमातुन मोठे योगदान दिले आहे. परभणी विद्यापीठात गेली चार वर्ष हरित विद्यापीठ, स्‍वच्‍छ विद्यापीठ, सुंदर विद्यापीठ आणि सुरक्षित विद्यापीठ अभियान सर्वांच्‍या सहकार्यांंने यशस्‍वीपणे राबविले, असे ते म्‍हणाले.

कार्यक्रमात जागतिक कामगार दिनाचे औजित्‍य साधुन स्‍वच्‍छ विद्यापीठ, हरित विद्यापीठ अभियानात मोलाचे योगदान देणा-या परभणी मुख्‍यालयी निवडक कृषि सहाय्यक, पहारेकरी, मजुर आणि माळी प्रवर्गातील कर्मचा-यांचा शाल व श्रीफळ देऊन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनात योगदान देणारे श्री सखारामतात्‍या शिंदे, श्री हरिभाऊ ढगे, श्री कुंडलीकराव शिंदे, श्री आप्‍पाराव शिंदे, श्री ज्ञानेश्‍वर जाधव, श्री सय्यद ईरफान सय्यद उस्‍मान, श्री गजानन भारती, श्री मंचक डोंबे, श्री संदीप वावळे, श्री बालासाहेब कानडे, श्री उत्‍तम सुर्यवंशी, श्री बाळु मस्‍के, श्री मारोती शिंदे, श्री दत्‍ता देशमुख, श्री रमेश शिंदे, श्री किरण बनसोडे, सौ नंदाबाई वावरे, श्री सुभाष वाघ, श्री कैलाश आगलावे आदींची सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर आणि डॉ एच व्‍ही काळपांडे यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.