Pages

Saturday, May 7, 2022

डॉ अशोक ढवण हे मातीशी नाते जपणारे व्‍यक्‍तीमत्‍व ....... कृषिरत्‍न मा श्री विजयअण्‍णा बोराडे

वनामकृवित माजी कुलगुरू मा. डॉ अशोक ढवण यांचा निरोप समारंभ तर प्रभारी कुलगुरू मा. डॉ प्रमोद येवले यांचा स्‍वागत समारंभ संपन्‍न

डॉ अशोक ढवण एक संवेदनशील व्‍यक्‍तीमत्‍व पण तेवढेच कठोर प्रशासक म्‍हणुन कार्य केले. डॉ ढवण यांचे विद्यापीठाचे विद्यार्थी ते कुलगुरू असा विद्यापीठाशी असलेले प्रदीर्घ नाते आहे. डॉ ढवण मातीशी नाते जपणारे व्‍यक्‍ती असुन हे भविष्‍यातही शेतकरी व शेती विकास याच क्षेत्रात ते आपले योगदान देतील. मागील पन्‍नास वर्षाच्‍या कार्यकाळात परभणी कृषी विद्यापीठाने मराठवाडयातील कृषि क्षेत्रास भरीव असे कार्य केले. सोयाबीन, कापुस, तुर आदी पिकांचे विविध अधिक उत्‍पादक वाण तसेच बायोमिक्‍स सारख्‍या निविष्‍ठा विद्यापीठाने विकसित केल्‍या. डॉ ढवण यांच्‍या संकल्‍पनेतुन विद्यापीठ विकसित बियाणे व निविष्‍ठा विंकेद्रीत स्‍वरूपात विक्रीमुळे मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयातील शेतकरी बांधवाना याचा लाभ होत आहे, असे प्रतिपादन मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे विश्‍वस्‍त कृषीरत्‍न मा श्री विजयअण्‍णा बोराडे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांचा कार्यकाळ दिनांक ६ मे रोजी पुर्ण झाला. महाराष्‍ट्राचे राज्‍यपाल तथा वनामकृविचे कुलपती मा श्री भगतसिंह कोश्‍यारी यांनी विद्यापीठाच्‍या कुलगुरूपदी औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले यांची नियुक्‍ती केली आहे. मा डॉ प्रमोद येवले यांनी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या कडुन दिनांक ६ मे रोजी पदभार स्‍वीकारला. यानिमित्‍त विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक ६ मे रोजी कृतज्ञता आणि स्‍वागत समारंभाचे आयोजन करण्‍यात आले होते,  या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात मा श्री विजयअण्णा बोराडे बोलत होते. व्‍यासपीठावर मा डॉ अशोक ढवण व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ. उषाताई ढवण, नुतन कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले, विधान परिषद सदस्‍य तथा विद्यापीठ कार्यकारणी सदस्‍य मा आमदार श्री सतिश चव्‍हाण, परभणी विभानसभा सदस्‍य तथा विद्यापीठ कार्यकारणी सदस्‍य मा आमदार डॉ राहुल पाटील, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मा श्री निसार तांबोळी, कवि प्रा इंद्रजित भालेराव, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, नियंकत्र श्रीमती दिपाराणी देवतराज आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

सत्‍कारास उत्‍तर देतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, जीवनात नैतिकता अत्‍यंत महत्‍वाची असुन कोणत्‍याही परिस्थितीत नैतिकता मार्ग सोडु नका. सामुदायिक प्रयत्‍नाने कोणतीही संस्‍था उभी राहते. शेतकरी व विद्यार्थ्‍यांकरिता समर्पित भावनेने कार्य करा. परभणी कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी ते कुलगुरू पदापर्यंतच्‍या प्रवासात अनेकांनी सहकार्य केले. कुलगुरू पदाच्‍या कार्यकाळात कृषी विद्यापीठ निर्मित बियाणे केवळ परभणी मुख्‍यालयी विक्री न करता, मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयात विकेंद्रित स्वरूपात विक्री व्‍यवस्‍था केली. विद्यापीठात मर्यादित मनुष्‍यबळ असुन सर्वांच्‍या प्रयत्‍नातुन बिजोत्‍पादनात वाढ झाली केली तसेच विद्यापीठ महसुलात वाढ झाली. गेल्‍या चार वर्षाच्‍या काळात स्‍वच्‍छ विद्यापीठ, हरित विद्यापीठ, सुरक्षित विद्यापीठ उपक्रम सर्वांच्‍या सामुदायिक प्रयत्‍नातुन यशस्‍वीपणे राबविली. याचा लाभ भविष्‍यातही होणार आहे.

नुतन कुलगुरू मा डॉ प्रमोद येवले आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठात मागील पन्‍नास वर्षात अनेक चांगले संशोधन कार्य झाले. विद्यापीठाचे संशोधन हे जागतिक दर्जेचे आणि समाजभिमुख असले पाहिजे. विद्यापीठाने शेतकरी व समाजाच्‍या अपेक्षा कितपत पुर्ण केल्‍या यांचे वेळोवेळी मुल्‍याकंन झाले पाहिजे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

मा आमदार श्री सतिश चव्‍हाण म्‍हणाले की, डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठात समर्पित भावनेने कार्य केले. विद्यापीठासमोर असलेल्‍या अनेक अडचणीत खंबीरपणे निर्णय घेतले. विद्यापीठाचे हितास त्‍यांनी प्रथम प्राधान्‍य दिले.   

मा आमदार डॉ राहुल पाटील, डॉ अशोक ढवण हे आदर्शवत व शिस्‍तप्रिय व्‍यक्‍तीमत्‍व असुन संस्‍थेच्‍या हिता करिता एकनिष्‍ठेने कार्य केले. नवीन शैक्षणिक धोरताना बहुशाखीय शिक्षणास प्राधान्‍य असुन याचा विचार करून विद्यापीठात आंतरराष्‍ट्रीय दर्जेचे विज्ञान संकुल उभारण्‍याचे काम त्‍यांच्‍या प्रयत्‍न होत आहे.  

मा श्री निसार तांबोळी म्‍हणाले की, डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठात प्रदीर्घ अशी सेवा दिली. आजच्‍या तरूण पिढीपुढे एक शिस्‍तप्रिय व आदर्श व्‍यक्‍तीमत्‍व असुन अनेक अडचणीत गुणवत्‍ता टिकवुन ठेवण्‍याचा त्‍यांनी प्रयत्‍न केला.

कवि प्रा इंद्रजित भालेराव म्हणाले की, कुलगुरूपद हा काटेरी मुकुट असतो. अनेक विरोध सहन करून डॉ ढवण यांनी आपली कारकीर्द यशस्वी केली. ग्रामीण भागातुन शेतकरी कुटूंबातुन शिक्षण घेऊन विद्यापीठाचा विद्यार्थी ते कुलगुरू असा प्रवास निश्चितच इतरांना प्रेरणादायी आहे. त्‍यांनी आयुष्याची प्रेरणादायी कथा आत्मकथनातून लोकांसमोर मांडावी, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्‍यवरांच्‍या हस्‍ते माननीय कुलगुरू डॉ अशोक ढवण यांचा शाल श्रीफल देऊन सपत्‍नीक सत्‍कार करण्‍यात आला तसेच अनेक मान्‍यवरांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम यांनी केले. सुत्रसंचालक डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ प्रविण कापसे यांनी मानले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी श्री कांतराव देशमुख, श्री रविंद्र देशमुख, डॉ रामेश्‍वर नाईक, डॉ दिवाण आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.