Pages

Thursday, June 9, 2022

पिकांवरील शत्रुकिडींच्‍या नियंत्रणात मित्रकिडींची मोठी भुमिका ...... किटकशास्‍त्रज्ञ डॉ अनंत लाड

पर्यावरण जनजागृती व स्‍वच्‍छता सप्‍ताहानिमित्‍त मौजे इंदेवाडी येथे आयो‍जित कार्यक्रमात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या राष्‍ट्रीय सेवा योजना आणि ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाच्‍या वतीने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दिनांक ७ जुन ते १३ जुन दरम्‍यान पर्यावरण जनजागृती व स्‍वच्‍छता सप्‍ताहानिमित्‍त विविध उपक्रमाचे आयोजन करण्‍यात आले. या अंतर्गत दिनांक ८ जुन रोजी मौजे इंदेवाडी येथे शेतीतील मित्रकीडी यावर किटकशास्‍त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांचे व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमास सरपंच श्री मोहन कच्‍छवे, उपसरपंच श्री संदिप चंदेल, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ मधुकर खळगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ अनंत लाड म्‍हणाले की, विविध पिकांवरील शत्रुकिडींचे व्‍यवस्‍थापनात निसर्गातील विविध मित्रकिडींंची मोठी भुमिका असुन अनेक मित्रकिडींचे खाद्य हे शत्रुकिडी आहेत. परंतु अनेक वेळा शेतकरी बांधव मित्रकिडींना शत्रुकीड समजुन किटकनाशकांची फवारणी करतात. यामुळे किटकनाशक फवारणीचा खर्च तर वाढतोच परंतु निसर्गातील मित्रकीडींची मोठी हानी होऊन निसर्गाचा समतोल बिघडतो. त्‍यामुळे शेतकरी बांधवाना मित्रकिडींची माहिती आवश्‍यक असल्‍याचे सांगुन त्‍यांनी विविध मित्रकिडीं बाबत मार्गदर्शन केले.  

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ मधुकर खळगे यांनी केले तर आभार कृषिदुत गणेश माळी यांनी मानले. कार्यक्रमास मौजे इंदेवाडी येथील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. सदरिल कार्यक्रम प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, रावे समन्‍वयक डॉ राजेश कदम, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली राष्‍ट्रीय सेवा योजने स्‍वयंसेवक आणि रावेचे कृषिदुत यांनी राबविला.