Pages

Tuesday, June 14, 2022

आत्मनिर्भर भारतासाठी डिजिटल तंत्रज्ञानचा वापर कृषी क्षेत्रात आवश्यक ...... प्रा. वीरेंद्र तिवारी

वनामकृवितील पदव्‍युत्‍तर विद्यार्थी व शास्‍त्रज्ञांना देशातील नामांकित आयआयटी खरगपुर येथे डिजिटल तंत्रज्ञानावर प्रशिक्षण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) यांच्‍या विद्यमाने खरगपुर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था – आयआयटी येथे पीक व्यवस्थापनासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापरयावरील दोन आठवडीय (दिनांक ६ ते १७ जुन) तसेच कॅड-कॅम तंत्रज्ञानाचा कृषि यंत्र निर्मितीसाठी वापरयावरील तीन आठवडीय (दिनांक ६ ते २५ जुन) प्रशिक्षणाचे  विद्यापीठातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थी आणि शास्‍त्रज्ञ यांच्‍या करिता आयोजन करण्यात आले आहे. 

सदरिल प्रशिक्षणाचे उदघाटन दिनांक ६ जुन रोजी खरगपुर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयआयटीचे संचालक प्रा. वीरेंद्र तिवारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी व अन्न अभियांत्रिकी विभागाच्‍या विभाग प्रमुख प्रा. रिंतु बॅनर्जी या होत्या. तसेच नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. डॉ. राजेंद्र माचावरम, प्रकल्पाचे उपप्रमुख आवेश प्रा तरुण कांती भट्टाचार्य, प्रा महुआ भट्टाचार्य, प्रा पियुष सोनी, प्रा हिफाजूर रेहमान आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात प्रा विरेंद्र तिवारी म्‍हणाले की, आत्‍मनिर्भर भारत बनविण्‍यासाठी कृषि क्षेत्र आत्‍मनिर्भर झाले पाहिजे. यासाठी कृषी यंत्रे, स्वयंचलित उपकरणे, प्रक्रिया तंत्रज्ञान यामध्ये संशोधन होणे गरजेचे आहे. डिजिटल तंत्रज्ञानाने काटेकोर शेती तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. विविध इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल तंत्रज्ञानाव्‍दारे शेतीकरिता उपयुक्‍त किफायतीशील स्‍मार्ट साहित्‍य न‍िर्मिती करावी लागणार आहे. विद्यार्थांनी प्रशिक्षणाचा उपयोग करून संशोधनासाठी वापर करण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले.

प्रकल्पाचे उपप्रमुख अन्‍वेषक प्रा. तरुण कांती भट्टाचार्य यांनी नाहेप प्रकल्‍पात राबविण्‍यात येत असलेल्‍या सेन्सर्स, तंत्रज्ञान, आयओटी या विषयी संशोधनाची माहिती दिली.

प्रो. रिंतु बॅनर्जी यांनी कृषी व अन्न अभियांत्रिकी विभागाची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कौशल्य आत्मसात करण्‍याचा सल्‍ला दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात डॉ. राजेंद्र माचावरम यांनी प्रशिक्षणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया लक्ष्मी यांनी केले. सदरील प्रशिक्षणाचे आयोजन राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), वनामकृवि, परभणी आणि  भारतीय तंत्रज्ञान संस्था, खरगपूर यांच्‍यात झालेल्‍या सामंजस्य करारानुसार करण्यात आले असुन प्रशिक्षणासाठी एकूण ६५ पदव्युत्तर आणि आचार्य पदवी विद्यार्थी तसेच नाहेप प्रकल्पातील ६ अभियंते सहभागी झाले आहेत.

सदरील प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरू मा डॉ. प्रमोद येवले, आयआयटीचे संचालक प्रा विरेंद्र तिवारी, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली नाहेप प्रमुख अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. राजेंद्र माचावरम, डॉ. एम. भट्टाचार्य, प्रो. ए.के. देब यांनी केले आहे. प्रशिक्षण समन्वयक म्हणून रवीकुमार काललोजी, डॉ अनिकेत वाईकर, शिवानंद शिवपुजे, श्वेता सोळंके, अपूर्वा देशमुख, संजीवनी कानवते, गोपाळ रनेर आदी काम पाहत आहेत.