Pages

Wednesday, June 29, 2022

खामगांव (बीड) येथील कृषि विज्ञान केंद्रात कृषि संजीवनी मोहीम अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या खामगांव (बीड) येथील कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग व आत्मा, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने "कृषि संजीवनी मोहीम" अंतर्गत कृषि विज्ञान केंद्रात दिनांक २९ जून रोजी "शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून आत्मा संचालक श्री. दशरथ तांबाळे हे उपस्थित होते तर बीड जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. बाबासाहेब जेजुरकर, बीड आत्मा प्रकल्प संचालक श्री. दत्तात्रय मुळे, बीड, माजलगाव उपविभागीय कृषि अधिकारी श्री. सुरज मडके, कार्यक्रम समन्वयक प्रा. दिप्ती पाटगावकर, गेवराई तालुका कृषि अधिकारी श्री. अभय वडकुते, व बीड तालुक्यातील उमेद चे तालुका समन्वयक, आष्टी येथील धान फाउंडेशनचे तालुका समन्वयक, आर्थिक विकास महामंडळ, गेवराईचे तालुका समन्वयक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात श्री. दशरथ तांबाळे यांनी खरीप हंगामातील प्रमुख पिकांची लागवड करताना बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी, बीज प्रक्रिया, जलसंवर्धना करीता बीबीएफ तंत्रज्ञान, कीड व रोग व्यवस्थापन, कापणी पश्चात तंत्रज्ञान तसेच स्मार्ट प्रकल्पाचे विविध योजना, धान्य तारण योजना ई. बाबत मार्गदर्शन केले. श्री. दत्तात्रय मुळे यांनी आत्मा अंतर्गत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन मूल्यवर्धनामुळे शेतामाल मिळणारे मूल्य, सोबतच आत्मा अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या पोषण बाग किटच्या वापराबाबत मार्गदर्शन केले.

तांत्रिक सत्रात खरीप पीक लागवड तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञ डॉ. हनुमान गरुड यांनी मार्गदर्शन केले तर हुमणी अळीचे व्यवस्थापनावर डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, शास्त्रोक्त शेळीपालनावर प्रा. किशोर जगताप, बीबीएफ तंत्रज्ञान व दालमिल यावर डॉ. तुकेश सुरपाम यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते केंद्राच्या प्रक्षेत्रावर उभारण्यात आलेल्या "आदर्श पोषण बागेचे" उद्घाटन करण्यात आले तसेच वृक्षारोपण करण्यात आले. केव्‍हीके प्रकाशित पोषण बागेच्या माहिती पत्रकाचे विमोचन करण्‍यात आले तसेच आत्मा, बीड तर्फे पोषण बागेच्या किटचे उपस्थित महिला वर्गास वाटप करण्यात आले.

प्रास्‍ताविकात प्रा. दिप्ती पाटगावकर यांनी पोषण बागेत प्रात्यक्षिक देऊन बाग तयार करण्याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषि पर्यवेक्षक श्री. घसिंग यांनी केले तर आभार तालुका कृषि अधिकारी श्री. अभय वडकुते यांनी केले. कार्यक्रमात १५० पेक्षा जास्‍त शेतकरी बांधव, शेतकरी महिला सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्र, खामगाव, कृषि विभाग व आत्मा येथील अधिकारी व कर्मचारी तसेच कु. अश्विनी म्हस्के, मंडळ कृषि अधिकारी, जातेगाव यांनी परिश्रम घेतले.