Pages

Saturday, July 30, 2022

परिसर मुलाखतीच्‍या माध्‍यमातुन परभणी कृषी महाविद्यालयातील २२ विद्यार्थ्‍यांची विविध पदावर निवड

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात दिनांक २७ जुलै रोजी नांदेड येथील मे. अंम्‍बीशन फर्टिलायझर कंपनीच्‍या वतीने परिसर मुलाखती घेण्‍यात आल्‍या. यात महाविद्यालयाच्‍या ३८ पदवी व पदव्‍युत्‍तर विद्यार्थी मुलाखती दिल्‍या, यातील २२ विद्यार्थ्‍यांची कंपनीव्‍दारे विपणन, संशोधन व विकास विभागात विविध पदाकरिता निवड करण्‍यात आली. परिसर मुलाखती करिता प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्लेसमेंट सेलचे प्रभारी डॉ पी आर झंवर, शिक्षण विभागचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण, डॉ एस आर जक्कावाड, डॉ सुरेश वाईकर, डॉ मिलिंद सोनकांबळे, डॉ प्रविण कापसे आदींनी कार्य केले. तर कंपनीच्‍या वतीने श्री शिवप्रसाद धानोरकर सह संचालक सदस्‍यांनी मुलाखती घेतल्‍या.

Friday, July 29, 2022

राष्‍ट्रीय पातळीवर परभणी कृषि विद्यापीठाचे मानांकन उंचाविण्‍याकरिता विशेष भर देण्‍यात येईल ..... माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिपादन

परभणी कृषि विद्यापीठाचे मानांकनात (रॅकिंग) वाढ करून पुढील पाच वर्षात देशाच्‍या पहिल्‍या वीस कृषि विद्यापीठात वनामकृविचा समावेश करण्‍याचे उद्दीष्‍ट असुन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यापीठाच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीत बदल करण्‍याकरिता राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शनाखाली प्रमुख उद्दिष्टांची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करण्‍यात येईल, असे ‍प्रतिपादन नुतन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.   

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे नुतन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी दिनांक २५ रोजी कुलगुरू पदाचा पदभार स्‍वीकारला, त्‍यानिमित्‍त दिनांक २९ जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, जिल्‍हा माहिती अधिकारी श्री अरूण सुर्यवंशी, विस्‍तार शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

परभणी कृषि विद्यापीठाची भविष्‍यातील दिशा याबाबत माहिती सां‍गतांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांचा सर्वांगिन विकासावर भर देण्‍यात येईल. कृषि पदवीधर हा नोकरी शोधणा-या नव्‍हे तर नौकरी देणारे उद्योजक व्‍हावे याकरिता विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता स्‍टार्टअप सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्‍यात येईल. विद्यार्थी नवोपक्रम आणि सर्जनशीलता वाढीकरिता इनक्युबेशन सेंटरची स्‍थापना करण्‍यात येईल. पदव्‍युत्‍तर शिक्षणाच्‍या दर्जात्‍मक वाढी करिता अग्रगण्य आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या सहकार्याने पीएच.डी.साठी सँडविच व ड्युअल डिग्री कार्यक्रम राबविण्‍यात येईल. शास्‍त्रज्ञाच्‍या संशोधन लेख लिखाण कौशल्‍य वाढीकरिता सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना करण्‍यात येईल. विद्यमान प्राध्यापकांच्या उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्‍यात येईल. तसेच विद्यापीठांगतर्गत असलेल्‍या खासगी महाविद्यालयाचा शैक्षणिक स्‍तर उंचाविण्‍यासाठी प्रयत्‍न केले जातील. विद्यापीठात ५० टक्के पेक्षा जास्‍त पदे रिक्‍त असुन कालबद्ध पद्धतीने ही रिक्त पदांची भरती करित प्रयत्‍न केला जाईल. राज्याच्या विशिष्ट संशोधन गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य क्रम निश्चित करून कार्य करण्‍यात येईल, यात कोरडवाहू शेती, मूल्यवर्धन, सोयाबीन, कापुस आणि अद्रक यांत्रिकीकरण भर देण्‍यात येईल. ड्रोनचा कृषि क्षेत्रात वापराबाबत परभणी कृषि विद्यापीठ देशात सर्वोकृष्‍ट करण्‍याचा मानस असुन कृषि संशोधनाची गती वाढविण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल. शेतक-यांच्‍या बांधावर कृषि तंत्रज्ञान प्रभावीपणे पोह‍चविण्‍यासाठी मेरा गांव मेरा गौरव याधर्तीवर विशेष विस्‍तार शिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येईल. आधुनिक माहिती तंत्रज्ञान वापर करून कृषी विस्तार सेवांमध्ये कार्यक्षमता आणि प्रभावी बदल करण्‍यात येईल. प्रगतशील व यशस्‍वी शेतकऱ्यांनी स्‍वत:च्‍या अनुभवाच्‍या आधारे अनेक तंत्रज्ञान विकसित करतात. अशा शेतक-यांना प्रोत्‍साहित करून विद्यापीठ फेला म्‍हणुन निवड करून संशोधनात सहभाग घेण्‍यात येईल. शेतकऱ्यांच्या सहभागाने विद्यापीठ बियाणे उत्पादन वाढी करिता प्रयत्‍न करेल. डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पारदर्शक, विश्वासार्ह आणि वक्‍तशीर विद्यापीठ प्रशासन करण्‍याचा प्रयत्‍न राहील, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी  केले तर आभार विभाग प्रमुख डॉ राजेश कदम यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता प्रा डि एफ राठोड, डॉ आशाताई देशमुख, प्रा चव्‍हाण आदीसह विद्यापीठ अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. पत्रकार परिषदेस प्रसारमाध्‍यमांचे प्रतिनिधी, संपादक, पत्रकार बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. 


माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांची विद्यापीठाबाबतची भविष्यातील दिशा -Vision of Honble VC

 कृषि शिक्षण

  • विद्यापीठाचे मानांकनात (रॅकिंग) वाढ करून पुढील पाच वर्षात देशाच्‍या पहिल्‍या वीस कृषि विद्यापीठात वनामकृविचा समावेश करण्‍याचे उद्दीष्‍ट
  • राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यापीठाच्या सध्याच्या शिक्षण पद्धतीत बदल करण्‍याकरिता राज्‍य शासनाच्‍या मार्गदर्शनाखाली प्रमुख उद्दिष्टांची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करणे.
  • कृषि पदवीधर नोकरी शोधणा-या नव्‍हे तर नौकरी देणारे उद्योजक व्‍हावे याकरिता विद्यार्थ्‍यांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता स्‍टार्टअप सारखे उपक्रम प्रभावीपणे राबविण्‍यात येईल.
  • विद्यार्थी नवोपक्रम आणि सर्जनशीलता वाढीकरिता इनक्युबेशन सेंटरची स्‍थापना करण्‍यात येईल.
  • कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांचा सर्वांगिन विकासावर भर देण्‍यात येईल.
  • पदव्‍युत्‍तर शिक्षणाच्‍या दर्जात्‍मक वाढी करिता अग्रगण्य आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या सहकार्याने पीएच.डी.साठी सँडविच / ड्युअल डिग्री प्रोग्राम राबविणे येईल.
  • शास्‍त्रज्ञाच्‍या संशोधन लेख लिखाण कौशल्‍य वाढीकरिता सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना करण्‍यात येईल.
  • विद्यमान प्राध्यापकांच्या उच्च शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्‍यात येईल, पीएचडी नसलेले प्राध्‍यापकांकरिता शक्यतो परदेशातून पीएचडी करण्‍याकरिता प्रात्‍साहित करण्‍यात येईल.
  • विद्यापीठांगतर्गत असलेल्‍या खासगी महाविद्यालयाचा शैक्षणिक स्‍तर उंचाविण्‍यासाठी प्रयत्‍न केले जातील.

कृषि संशोधन

  • विविध संख्‍येच्‍या सहयोगाने, नवनवीन उपक्रमाद्वारे कृषि संशोधनातील गुणवत्ता, उत्पादकता आणि प्रभाव सुधारणे विशेष लक्ष देण्‍यात येईल.
  • कृषी आणि संलग्न विज्ञानांच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये प्राध्यापकांच्या देवाणघेवाणीसह द्विपक्षीय आणि बहु-पक्षीय संशोधन कार्यक्रमावर लक्ष केंद्रित करण्‍यात येईल.
  • कृषि तंत्रज्ञानाचे व्यापारीकरणाकरिता संशोधन स्तरावर विविध उद्योगांचे सहकार्य तसेच उद्योगाकडून निधी प्राप्‍त करण्‍यात येईल.  विविध उद्योग समुहाशी करार करून संशोधन आणि विकास निधी मिळविण्‍यावर भर देण्‍यात येईल.
  • विद्यापीठासाठी मोठ्या बाह्य निधीला मिळविण्‍यासाठी प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षीत करण्‍यात येईल.
  • राज्याच्या विशिष्ट संशोधन गरजा पूर्ण करण्यासाठी प्राधान्य क्षेत्रामध्ये (कोरडवाहू शेती, मूल्यवर्धन, सोयाबीन यांत्रिकीकरण) उत्कृष्टतेचे केंद्र (Centre of Excellence) स्थापना केली जाईल.
  • काटेकोर शेती, शेतीमध्ये ड्रोनचा वापर, सेंद्रिय शेती आणि हवामान अनुकुल शेती यासारख्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये संशोधनाला चालना देण्‍यात येईल.
  •  कृषि संशोधनाची गती वाढविण्‍याचा प्रयत्‍न केला जाईल.

विस्‍तार शिक्षण

  •  शेतक-यांच्‍या बांधावर कृषि तंत्रज्ञान प्रभावीपणे पोह‍चविण्‍यासाठी मेरा गांव मेरा गौरव याधर्तीवर विशेष विस्‍तार शिक्षण कार्यक्रम राबविण्‍यात येईल.
  • आधुनिक माहिती तंत्रज्ञान (ICTs) वापर करून कृषी विस्तार सेवांमध्ये कार्यक्षमता आणि प्रभावी बदल करण्‍यात येईल.
  • शेतकऱ्यांच्या विविध शेती विषयक प्रश्नांचे निवारण करणारी यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.
  • राज्‍यातील कृषि विभाग आणि विविध संबंधित संस्‍थेसोबत एकत्रित कार्य करून विविध कृषि विषयक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यात येईल.
  • प्रगतशील व यशस्‍वी शेतकऱ्यांनी स्‍वत:च्‍या अनुभवाच्‍या आधारे अनेक तंत्रज्ञान विकसित करतात. अशा शेतक-यांना प्रोत्‍साहित करून विद्यापीठ संशोधनात सहभाग घेण्‍यात येईल.
  • शेतकऱ्यांच्या सहभागाने बियाणे उत्पादन वाढी करिता प्रयत्‍न केला जाईल.
  •  प्रशासकीय
  • डिजिटल तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पारदर्शक, विश्वासार्ह आणि वक्‍तशीर विद्यापीठ प्रशासन करण्‍याचा प्रयत्‍न राहील.
  • विद्यापीठात ५० टक्के पेक्षा जास्‍त पदे रिक्‍त असुन कालबद्ध पद्धतीने ही रिक्त पदांची भरती करित प्रयत्‍न केला जाईल.
  • अध्यापन, संशोधन, विस्तार आणि प्रशासनात नैतिकता आणि मूल्यांवर अधिक भर दिला जाईल.

Tuesday, July 26, 2022

शेतीक्षेत्रात ड्रोन वापराबाबत एसओपी निश्चित करण्‍यासाठी राष्‍ट्रीय समितीची स्‍थापना

वनामकृविचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची अध्‍यक्षपदी नियुक्‍ती


शेती क्षेत्रात ड्रोन वापराबाबत शेतकरी बांधवामध्‍ये मोठया प्रमाणात उत्‍सुकता असुन किटकनाशकांच्‍या फवारणीसाठी ड्रोनचा वापर भविष्‍यात निश्चितच फायदेशीर ठरणार आहे. तसेच तण व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पिक विमा करिता ड्रोन चा वापर होणार आहे. या ड्रोन वापराबाबत राष्‍ट्रीय पातळीवर मानक कार्य पध्दती (एसओपी) निश्चित करण्‍यासाठी देशाच्‍या कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या कृषि, सहकार आणि शेतकरी कल्‍याण विभागाच्‍या वतीने उच्‍चस्‍तरीय समितीचे गठण करण्‍यात आले असुन या समितीच्‍या अध्‍यक्षपदी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. मा डॉ इन्‍द्र मणि यांचा कृषि ड्रोन बाबत मोठा अभ्‍यास असुन त्‍याचा कृषि ड्रोन बाबत राष्‍ट्रीय धोरण ठरविण्‍यासाठी लाभ होणार आहे. सदरिल समिती पीकनिहाय ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या वापरासाठी मानक कार्य पध्‍दतीचा (एसओपी) मसुदा तयार करून दिनांक ३० सप्‍टेंबर पर्यंत देशाच्‍या कृषि मंत्रालयास सादर करणार आहे. सदर समिती शेतीतील निविष्‍ठा व तंत्रज्ञानाचा सुरक्षित, कार्यक्षम आणि प्रभावी वापर यावर अभ्‍यास करून एसओपी निश्चित करेल. समितीत देशातील तज्ञ मंडळीचा समावेश असुन यात नवी दिल्‍ली येथील कृषि मंत्रालयातील उपायुक्‍त इं‍जि. एस आर लोही हे सदस्‍य सचिव असुन समितीत पिक संरक्षण विभागाच्‍या डॉ अर्चना सिन्‍हा, आयसीएआरचे डॉ आर एन साहु, राहुरी कृषि विद्यापीठाचे डॉ सुनिल गोरंटीवार, गुंटुर येथील डॉ ए सामभाय, आयएआरआयचे डॉ दिलीप कुशावाह, कोईम्‍बतुर येथील डॉ एस पाझानिवेलन, हैद्राबाद येथील किटकशास्‍त्रज्ञ डॉ रामगोपाल वर्मा आदींची समावेश आहे. 

Monday, July 25, 2022

शेतकरी देवो भव: मानुन कृषि विद्यापीठाने कार्य केले पाहिजे ...... वनामकृविचे नुतन कुलगुरू मा. प्रा. डॉ. इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या कुलगुरू पदाचा मा. डॉ. इन्‍द्र मणि यांनी स्‍वीकारला पदभार 


शेतकरी स्‍वत: एक संशोधक आहे, आज अनेक प्रगतशील शेतकरी यशस्‍वी शेती करित असुन अनेक शेतकरी बांधवानी स्‍वत:च्‍या अनुभवावर आधारित चांगले कृषि तंत्रज्ञान विकसित केले आहे. अशा शेतकरी बांधवाचा विद्यापीठाच्‍या संशोधनात सहभाग घेण्‍यात येईल. भारतीय संस्‍कृतीत अतिथी देवो भव: असे आपण मानतो, कृषि विद्यापीठाने शेतकरी देवो भव: मानुन कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे नुतन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

विद्यापीठाचे विसावे कुलगुरू म्‍हणुन दिनांक २५ जुलै रोजी मा. प्रा. डॉ. इन्‍द्र मणि यांनी पदाभार स्‍वीकारला, विद्यापीठाच्‍या वतीने आयोजित सत्‍कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्री दिपाराणी देवतराज, डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ एस आर काळबांडे, परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, कृषि तंत्रज्ञान जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांधवापर्यंत पोहचले पाहिजे. शेतकरी समाधानी झाला पाहिजे, तरच समाज समाधानी राहील. विद्यापीठापुढे अनेक आव्‍हाने आहेत. आज कृषि विद्यापीठातील ५० टक्के पेक्षा जास्‍त पदे रिक्‍त असुन नौकर भरती करिता प्रयत्‍न केला जाईल. विद्यापीठातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीचे कार्य महत्‍वाचे आहे. विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी यांनी स्‍वत:ची जबाबदारी प्रामाणिकपणे पुर्ण केली पाहिजे. प्रत्येकांनी स्‍वत:चा क्षमतेचा पुर्णपणे वापर केला पाहिजे. विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ आणि विद्यार्थी यांच्‍या कौशल्‍यवृध्‍दी करिता विशेष प्रयत्‍न केले जातील. विद्यापीठ प्रशासनात प्रामाणिकता, पारदर्शकता, आणि वक्तशीरपणा यास महत्‍व दिले जाईल. कोणतेही कार्य व्‍यक्‍तीभिमुख नसले पाहिजे, यंत्रणाभिमुख असले पाहिजे. आपल्‍या दृष्‍टीकोन सकारात्मक असला पाहिजे, तरच जीवनात यश प्राप्‍त होते. परभणी कृषि विद्यापीठाचे मानांकन वाढीवर भर देण्‍यात येणार असुन सर्वांनी एकत्रित येऊन कार्य करू. कृषि पदवीधर हा नौकरी मिळविणारा नव्‍हे तर नौकरी देणारा उद्योजक बनला पाहिजे, याकरिता विशेष प्रयत्‍न केले जातील, यासाठी कृषि स्‍टार्ट अप, इन्‍कयुबेशन केंद्र लवकरच सुरू करण्‍यात येईल. कृषि उद्योग आणि कृषि विद्यापीठ यांच्‍यातील संबंध दृढ करण्‍याची गरज आहे. कृषि संशोधनाकरिता निधीची कमतरता असुन याकरिता जागतिक व राष्‍ट्रीय संस्‍थेकडुन विविध प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन निधी प्राप्‍त करून कृषि संशोधनास सक्षम करण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येईल.

मनोगतात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांनी विद्यापीठ संशोधनाबाबत तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याबाबत माहिती दिली. कार्यक्रमात नुतन कुलगुरू यांचा विद्यापीठ प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी, विविध कर्मचारी संघटना, विद्यार्थी संघटना यांच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम यांनी केले. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

मा. प्रा. डॉ इन्‍द्र मणि यांचा थोडक्यात परिचय

नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे सहसंचालक (संशोधन) म्हणून कार्यरत होते. प्रा. इन्‍द्र मणि यांचे कृषि यांत्रिकीकरणात मोठे योगदान असुन पिक अवशेष व्यवस्थापनकोरडवाहू शेती व भाजीपाला यांत्रिकीकरणलहान शेतातील यांत्रिकीकरण आणि खतांच्या वापराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपकरणे आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर योगदान आहे. त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान देशातील १८ पेक्षा जास्त राज्यांमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी आजपर्यंत संशोधन मार्गदर्शक म्‍हणुन २० आचार्य आणि १२ एम. टेक. पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले असुन त्‍यांची १४० पेक्षा जास्‍त शोधनिबंध आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय नियतकालिकेत प्रकाशित झाले आहेत.

कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी मानक मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी गठित केलेल्‍या समितीचे निमंत्रक म्हणून काम करून भारताच्या कृषी ड्रोन धोरणाच्या विकासात महत्त्वाची भूमिका त्‍यांनी बजावली आहे. भारतीय शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने डिझाइन इनोव्हेशन सेंटरची स्थापना केली आहे. देशातील विविध क्षेत्रांसाठी विशेषतः ईशान्य प्रदेशासाठी यांत्रिकीकरण धोरण तयार करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. उत्तर प्रदेशहरियाणा आणि दिल्ली या राज्यांसह उत्तर पूर्व डोंगराळ प्रदेश आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध कार्यक्रमाचे समन्वयक म्‍हणुन कार्य केले आहे.

त्‍यांना विविध पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले असुन यात आयसीएआर - भारतरत्न सी सुब्रमण्यम उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारएएसएबीई युएसए प्रशस्तिपत्र पुरस्कारआयसीएफए अपोलो टायर्स पुरस्कारएमओडब्‍ल्‍युआर भूजल संवर्धन पुरस्कारआयसीएआर-जवाहरलाल नेहरू पुरस्कारआयएआरआय सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे. डॉ इंद्र मणि यांनी दक्षिण पूर्व आशियाउत्तर अमेरिकाआफ्रिकाजपान आणि युरोपमधील विविध देशांतील विविध संशोधन व शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्‍या आहे. नवोदित उद्योग – संस्था – शेतकरी यांच्‍या संबंध विकसित करण्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. सुमारे ४०० पेक्षा जास्‍त दत्‍तक गावात शेतक-यांचे जीवनमान सुधारणासाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत मेरा गाव मेरा गौरव या उपक्रमाचे नोडल ऑफिसर म्‍हणुन कार्य केले आहे.

Friday, July 22, 2022

उसावरील पायरीला (पाकोळी) किडींचे व्यवस्थापन

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

सध्याचे ढगाळ वातावरण आणि सततचा रिमझिम पाऊस यामुळे बऱ्याच भागात उसावर पायरीला (पाकोळी) या रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन या कीडीचे वेळेवर व्यवस्थापन न केल्यास ही कीड जास्त प्रमाणात नुकसान करू शकते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या उत्पादनात ३१ टक्के पर्यंत तर साखर उताऱ्यामध्ये २ ते ३ टक्के पर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच ह्या किडीला ओळखून खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ जी डी गडदे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ डी डी पटाईत आणि श्री एम बी मांडगे यांनी दिला आहे.

पायरी किडीची ओळख - या किडीची मादी दिवसाच्या वेळी शक्यतो सावलीमध्ये आणि आडोशाला पानांच्या खालच्या बाजूला शिरेजवळ ४-५ ओळीत पुंजक्यामध्ये पांढरट ते हिरवट पिवळ्या रंगाची अंडी घालते, एका पुंजक्यामध्ये ३० ते ४० अंडी असतात. अंड्यावर मेणचट दोऱ्यासारखे आवरण असते. अशा अंड्यातून पांढरट रंगाची पिल्लं बाहेर पडतात ज्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर शरीरापेक्षा जास्त लांबीचे तंतुमय अवयव असतात आणि शरिरावर मेणचट आवरण असते. तर प्रौढ फिकट पिवळसर रंगाची आणि पाचरीच्या आकाराची असतात.

नुकसानीचा प्रकार व प्रादुर्भावाची लक्षणे - ही कीड वर्षभर सक्रिय असते परंतु वाढीसाठी सर्वात जास्त अनुकूल काळ जुलै ते सप्टेंबर या महिन्यात असतो. या किडीची पिल्ले आणि प्रौढ उसाच्या पानातील रस शोषून घेतात त्यामुळे उसाच्या पानाचा हिरवेपणा कमी होऊन पाने निस्तेज व पिवळी पडतात, तसेच हि किड पानावर एक प्रकारचा चिकट व गोड पदार्थ तिच्या शरीरातून बाहेर सोडते त्यामुळे पानावर काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन काजळी पडल्यासारखा रंग चढून पानांची अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते आणि उसाची पाने वाळू लागतात आणि ऊसातील साखरेचे प्रमाण घटते. वाढीच्या अवस्थेत जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास उसाच्या उत्पादनात घट होते तर पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव दिसून आल्यास साखर उताऱ्यात घट होते.

पायरी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन  

ü उसाची लागवड पट्टा अथवा रुंद सरी पद्धतीने करावी त्यामुळे कीडनाशकांची फवारणी किंवा धुरळणी करणे सोयीचे होईल.

ü ऊसात पाणी साचत असल्यास चर काढून पाण्याचा निचरा करावा आणि पाण्याचा जास्त ताण पडल्यास पाणी द्यावे.

ü नत्रयुक्त खतांचा जास्त वापर करू नये.

ü जुनी वाळलेली पाने वेळोवेळी जमा करून नष्ट करावीत जेणेकरून पुढे होणारा प्रादुर्भाव कमी करता येईल.

ü पानावर अंडी पुंज आढळून आल्यास अशी पाने अंडी पुंजासह जमा करून नष्ट करावीत

ü निरिक्षणासाठी व मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति पाच एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या अर्धा फूट उंचीवर लावून सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चालू ठेवावा.

ü वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

ü व्हर्टिसिलियम लिकॅनी अथवा मेटाराझीयम ॲनोसोप्ली  या जैविक बुरशीची ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ü इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या परोपजीवी मित्र कीटकांचे व इतर मित्र कीटकांचे संवर्धन करावे जेणेकरून नैसर्गिकरित्या किडींचे व्यवस्थापन होईल त्याकरीता रासायनिक कीटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी.

ü उपलब्ध झाल्यास इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या परोपजीवी मित्र कीटकांचे ४००० ते ५००० कोष अथवा ४  ते ५ लाख अंडी शेतामध्ये सोडावीत.

ü रासायनिक व्यवस्थापनकरिता प्रति पान ३ ते ५ पिल्लं किंवा प्रौढ अथवा १ अंडीपुंज दिसून आल्यास क्लोरोपायरीफॉस २० टक्के ६०० मिली किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के २०० मिली प्रति एकर  फवारावे.

आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर दुसरी फवारणी करावी. कीटकनाशकाची फवारणी आलटून-पालटून करावी, असा वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांनी दिला आहे. अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२ २२९००० यावर कार्यालयीन वेळेत करावा.

संदर्भ - वनामकृवि संदेश क्रमांक ०३/२०२२ (२२ जूलै २०२२)



Saturday, July 16, 2022

सतत आणि अति पाऊसाच्‍या परिस्थितीत खरीप पिकांची घ्यावयाची काळजी

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा खरीप पिकांचे व्‍यवस्‍थापनाबाबत सल्‍ला

मराठवाडयात मागील पाच ते सहा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे, सुर्यदर्शन सुद्धा झाले नाही. त्यामुळे खरीपातील पिके जसे की सोयाबीन, कापूस आणि तुर यांची वाढ खुंटली असुन पाने पिवळे पडत आहेत. अशा परीस्थितीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तो रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच अशा परिस्थितीमध्ये  सोयाबीन, कापुस आणि तुर पिकांमध्‍ये पुढील प्रमाणे उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ गजानन गडदे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ दिगंबर पटाईत आणि श्री मधुकर मांडगे यांनी दिला आहे.

सोयाबीन मध्‍ये करावयाचे व्‍यवस्‍थापन

सध्या सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे, मुख्‍यत: चुनखडीयुक्त जमिनीत किंवा पांढरीच्या जमिनीत लागवड केलेल्या ठिकाणी सोयाबीनची पाने पिवळी पडत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे पिकाला सुर्यप्रकाश मिळत नसल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावली आहे आणि जमिनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. अशा परिस्थीतीमध्ये सर्व प्रथम शेतामधून पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावे. वापसा परिस्थिती आल्यावर कोळपणी करावी, यामुळे पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होते तसेच काही प्रमाणात तण व्यवस्थापन ही होते. या व्यतिरीक्त सुक्ष्मअन्नद्रव्य ग्रेड-२ ची ५० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी करावी. पहिल्या फवारणीने जर सोयाबीनची पाने हिरवी नाही झाली तर परत आठ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

पावसामुळे वाणी किंवा पैसा या किडीचा नैसर्गिकरीत्या बंदोबस्त होतो परंतु शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव यामुळे वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी अशा शंखी गोगलगायी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात. गोगलगायीच्या नियंत्रणाकरीता दाणेदार मेटाल्डीहाईड हे गोगलगाय नाशक २ किलो प्रति एकर याप्रमाणे शेतामध्ये, बांधाच्या कडेला आणि बांधावर सायंकाळच्या वेळी पसरवून द्यावे. पाणी साचलेल्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी विद्यापीठ निर्मीत उपयुक्त सुक्ष्मजीवयुक्त बायोमिक्स औषधाची ४ किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.

सोयाबीन मध्ये खोडमाशी व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोफेनोफॉस ५० टक्के २० मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के अधिक थायमिथोक्झाम १२.६ टक्के ५० मिली प्रति एकर फवारावे.

कापूस पिकात करावयाचे व्‍यवस्‍थापन

कापूस पिकामध्ये पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी शेतात प्रत्येक एक ओळ सोडून लहान चर काढावेत. आकस्मिक मर किंवा मूळकूज दिसू लागल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम अधिक युरीया २०० ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेवून हे द्रावण झाडांच्या मुळांजवळ प्रति झाड १०० मिली द्यावे.

तसेच पीक ३० ते ४० दिवसाचे झाले असल्यास दोन टक्के युरीयाची फवारणी करावी यासाठी २०० ग्रॅम युरीया प्रति १० लिटर पाणी असे प्रमाण वापरावे. पिकाची वाढ पुर्ववत होऊन पात्या लागण होण्यासाठी पिक ४० ते ४५ दिवसाचे झाल्यावर नत्राचा पहिला हप्ता द्यावा. त्यासाठी कोरडवाहू कपाशीकरीता ३१ किलो तर बागायती कपाशीकरीता ५१ किलो निमकोटेड यूरीया प्रति एकरी द्यावा. खत पाण्याचा निचरा झाल्यावरच द्यावे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात लागवड केलेला कापूस सध्या पाते अवस्थेत असल्यास आणि अशा परिस्थितीत जर पातेगळ होत असेल तर याच्या नियंत्रणाकरीता एनएए या संजीवकाची ४० मिली प्रति १८० लिटर पाणी या प्रमाणे प्रति एकरी किंवा २.५ मि.ली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी यामुळे पातेगळ थांबण्यास मदत होते.

कपाशीवर रसशोषण करणा-या किडी विशेषत: मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्क किंवा व्हर्टीसिलीअम लिकॅनी ४० ग्रॅम किंवा अॅसीटामाप्रीड २० टक्के ६० ग्रॅम किंवा डायमिथोएट ३० टक्के २६० मिली प्रती एकर फवारावे.

तुर पिकात करावयाचे व्‍यवस्‍थापन

तुर हे पीक अति पाऊसास संवेदनशील आहे. म्हणूनच तुरीच्या शेतातील साचून राहीलेले पाणी ताबडतोब शेताबाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे.

तुर पिकात फायटोप्थेरा मर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास मर ग्रस्त झाडे काढून टाकावीत व त्याठिकाणी तसेच चारी बाजूनी एक मिटर अंतरावर कार्बेडेंझीम २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. तसेच जिथे कुठे मर रोगाची सुरूवात होत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम अधिक युरीया २०० ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेवून झाडांच्या मुळांना प्रति झाड १०० मिली द्यावे.

ज्या ठिकाणी हुमणी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास मेटारायझीयम ४ किलो प्रति एकर या प्रमाणे जमिनीतून द्यावे.

 

सौजन्‍य

डॉ.गजानन गडदे (विस्तार कृषि विद्यावेत्ता),

डॉ.दिगंबर पटाईत (किटकशास्‍त्रज्ञ) आणि श्री.मधुकर मांडगे (वरिष्ठ संशोधन सहाय्यक)

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

Thursday, July 14, 2022

वनामकृविच्या कुलगुरूपदी मा डॉ इन्‍द्र मणि



नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संशोधन सहसंचालक प्रा. डॉ इन्‍द्र मणि यांची परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि.१४) डॉ इन्‍द्र मणि यांची नियुक्ती जाहीर केली. कुलगुरू  मा डॉ अशोक ढवण यांचा कार्यकाळ दिनांक ६ मे  २०२२ संपल्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरुपद रिक्त झाले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु मा डॉ. प्रमोद येवले  यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.  मा डॉ इन्‍द्र मणि यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेतुन कृषी अभियांत्रिकी या विषयात पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवी प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासकीय कार्य व कृषी विस्तार सेवेचा व्यापक अनुभव आहे. कुलगुरू नियुक्तीसाठी माननीय राज्यपाल यांनी एनसीईआरटीचे निवृत्‍त महासंचालक प्रा. जगमोहन सिंह राजपुतयांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. यात भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ ए के सिंह व राज्याच्या कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले हे सदर समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी मा डॉ इंद्र मणी मिश्रा यांच्या निवडीची घोषणा केली. 
मा. प्रा. डॉ इन्‍द्र मणि यांचा थोडक्यात परिचय

नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे सहसंचालक (संशोधन) म्हणून कार्यरत आहेत. प्रा. इन्‍द्रा मणि यांचे कृषि यांत्रिकीकरणात मोठे योगदान असुन पिक अवशेष व्यवस्थापन, कोरडवाहू शेती व भाजीपाला यांत्रिकीकरण, लहान शेतातील यांत्रिकीकरण आणि खतांच्या वापराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपकरणे आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर योगदान आहे. त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान देशातील १८ पेक्षा जास्त राज्यांमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी आजपर्यंत संशोधन मार्गदर्शक म्‍हणुन २० आचार्य आणि १२ एम. टेक. पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले असुन त्‍यांची १४० पेक्षा जास्‍त शोधनिबंध आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय नियतकालिकेत प्रकाशित झाले आहेत.

कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी मानक मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी गठित केलेल्‍या समितीचे निमंत्रक म्हणून काम करून भारताच्या कृषी ड्रोन धोरणाच्या विकासात महत्त्वाची भूमिका त्‍यांनी बजावली आहे. भारतीय शेतकऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने डिझाइन इनोव्हेशन सेंटरची स्थापना केली आहे. देशातील विविध क्षेत्रांसाठी विशेषतः ईशान्य प्रदेशासाठी यांत्रिकीकरण धोरण तयार करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्ली या राज्यांसह उत्तर पूर्व डोंगराळ प्रदेश आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी विविध कार्यक्रमाचे समन्वयक म्‍हणुन कार्य केले आहे.

त्‍यांना विविध पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले असुन यात आयसीएआर - भारतरत्न सी सुब्रमण्यम उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, एएसएबीई युएसए प्रशस्तिपत्र पुरस्कार, आयसीएफए अपोलो टायर्स पुरस्कार, एमओडब्‍ल्‍युआर भूजल संवर्धन पुरस्कार, आयसीएआर-जवाहरलाल नेहरू पुरस्कार, आयएआरआय सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे. डॉ इंद्र मणि यांनी दक्षिण पूर्व आशिया, उत्तर अमेरिका, आफ्रिका, जपान आणि युरोपमधील विविध देशांतील विविध संशोधन व शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्‍या आहे. नवोदित उद्योग – संस्था – शेतकरी यांच्‍या संबंध विकसित करण्यात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. सुमारे ४०० पेक्षा जास्‍त दत्‍तक गावात शेतक-यांचे जीवनमान सुधारणासाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत मेरा गाव मेरा गौरव या उपक्रमाचे नोडल ऑफिसर म्‍हणुन कार्य केले आहे.