Pages

Friday, August 12, 2022

कसे कराल कपाशीवरील रसशोषण करणा-या किडींचे व्यवस्थापन

मावा, पांढरीमाशी व तुडतुडे किडींच्‍या व्‍यवस्‍थापनाबाबत वनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला 

मावा किड

सद्य परिस्थितीत कपाशी पिकावर मावा, पांढरीमाशी व तुडतुडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन या रसशोषक किडींचे व्‍यवस्‍थापन न केल्‍यास कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या किडींच्या व्यवस्थापनासाठी थेट रासायनिक कीटकनाशकाचा वापर न करता एकात्मिक कीड व्यवस्थपनाचा अवलंब केला पाहिजे. 

मावा : हि किड रंगाने पिवळसर किंवा फिकट हिरवी असुन आकाराने अंडाकृती असते. मावा व त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजुने आणि कोवळया शेंडयावर समुहाने राहून त्यातील रस शोषण करतात. अशी पाने निस्तेज होउन आकसतात व खालच्या बाजुस मुरगळलेली दिसतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. मावा आपल्या शरिरातुन गोड चिकटद्रव बाहेर टाकतो त्यामुळे पानावरील भाग चिकट बनतो कालांतराने त्यावर काळी बुरशी वाढून पानावर काळा थर जमा झालेला दिसतो. त्यामूळे पानाच्या अन्न निर्माण प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.

पांढरीमाशी : प्रौढ माशी आकाराने लहान व पंख पांढरे असून शरीरावर पिवळसर झाक असते, डोक्यावर दोन तांबडे ठिपके असतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून रसशोषण करतात अशी पाने कोमेजतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने लालसर ठिसूळ होऊन शेवटी वाळतात याशिवाय पिल्ले आपल्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात त्यामुळे पानावर काळी बुरशी वाढते. तसेच पांढरीमाशी रोगाचा प्रसार करते. या किडीचा प्रादुर्भाव कोरडवाहू कपाशीवर सप्टेंबर महिन्यापासून सुरु होतो व नोव्हेंबर महिन्यात अधिकतम प्रादुर्भाव दिसून येतो.

तुडतुडे : प्रौढ व पिल्ले फिकट हिरव्या रंगाचे असुन पाचरीच्या आकाराचे असतात. त्यांच्या समोरच्या पंखावर एक काळा ठिपका असतो. तुडतुडयांच्या पिल्लांना पंख नसतात. तुडतुडयांचे एक वैशिष्ठ म्हणजे ते नेहमी तिरके चालतात व चटकन उडी मारतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजुने राहून त्यातील रस शोषण करतात. अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होउन नंतर तपकिरी रंगाची होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपुर्ण पाने लाल तांबडी होउन त्यांच्या कडा मुरगळतात. परिणामी झाडांची वाढ खुंटते. अशा झाडांना पाते, फुले आणि बोंडे फारच कमी प्रमाणात लागतात.

या रसशोषण करणा-या कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन पुढील प्रमाणे करावे

वेळोवेळी  प्रादुर्भावग्रस्त फांदया, पाने व इतर पालापाचोळा जमा करुन नष्ट करावा. खुरपणी, कोळपणी करुन पिक तणविरहीत ठेवावे. माती परिक्षणानुसार नत्र खतांचा योग्य वापर करावा, जेणेकरुन कपाशीची अनावश्यक कायीक वाढ होणार नाही. अशा पिकावर किड कमी प्रमाणात राहील. कपाशीमध्ये चवळी, मुग, उडीद यांचे आंतर पिक घेतल्यास मित्रकिटकांचे संवर्धन होईल. निसर्ग:त रसशोषण करणा-या किडीवर उपजिवीका करणारे मित्र किटक उदा. ढालकिडा, सिरफिड माशी, क्रायसोपा, ॲनसियस हि परोपजीवी किटक आढळून आल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळावा. पांढरीमाशीच्या नियंत्रनासाठी पिवळे चिकट सापळे लावावे. पिक वाढीच्या सुरुवातीपासून ५ टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

आर्थिक नुकसान पातळी : झाडावरील प्रति पान १० मावा किडींची संख्‍या,  ते १० प्रौढ पांढरीमाशी किंवा २० पिल्ले तसेच तुडतुडयाचे प्रमाण प्रति पान २ ते ३ आढळून आल्यास किडींची ही आर्थिक नुकसान पातळी ओळांडल्‍यास रासायनिक किटकनाशकाचा वापर करावा.


किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास पुढील पैकी कोणत्याही एका रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

फ्लोनिकामाइड ५० टक्के डब्लुजी ३ ग्रॅम किंवा थायमिथोक्झाम २५ टक्के डब्लुजी ग्रॅम किंवा डायफेन्थीरॉन ५० टक्के १२ ग्रॅम किंवा बुप्रोफेजीन २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा फिप्रोनील ५ टक्के प्रवाही ३० मिली किंवा ॲसीफेट ५० टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १.एसपी २० ग्रॅम किंवा प्रति १० लिटर पाण्यातुन फवारणी करावी. सदर किटकनाशकांचे प्रमाण साधा फवारणी पंपाकरिता असुन पॉवर स्‍प्रेअर पंपाकरिता किटकनाशकांचे प्रमाण तिप्‍पट करावे. 

अशा प्रकारे एकात्मिक किड व्यवस्थापनाचा अवलंब करण्‍याचे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. पी.एस. नेहरकर, डॉ. ए.जी. लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. योगेश मात्रे आदींनी केले आहे.

पांढरीमाशी
तुडतुडे