Pages

Saturday, August 13, 2022

अन्‍नतंत्र महाविद्यालयात उभारण्‍यात येणा-या इन्‍क्‍युबेशन केंद्रामुळे अन्‍न प्रक्रिया उद्योग विकासास चालना मिळेल ..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवितील परभणी येथील अन्‍नतंत्र महाविद्यालयात सामा‍ईक इन्क्यूबेशन सेंटर उभारणीचे काम  सुरू

कृषि व सलग्‍न शाखेतील पदवीधर नौकरी मिळविणारे नव्‍हे तर नौकरी देणारे उद्योजक झाले पाहिजे. याकरिता अन्‍नतंत्र महाविद्यालयात उभारण्‍यात येणारे सामाईक इन्‍क्‍युबेशन केंद्र अन्‍न प्रक्रिया उद्योग विकासास चालना मिळेल, असे मत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी व्‍यक्‍त केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयात नवी दिल्‍ली येथील केंद्रीय अन्‍न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्‍या प्रधानमंत्री लघु अन्‍न प्रक्रिया उद्योग नियमन योजना (PMFME) अंतर्गत सामाईक इन्‍क्‍युबेशन केंद्र उभारण्‍यास मान्‍यता मिळालेली असुन दिनांक १० ऑगस्ट रोजी या केंद्राच्‍या उभारणीच्‍या कार्याची सुरूवात विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आली. यावेळी व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, प्राचार्य डॉ उदय खोडके व कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्या डॉ जया बंगाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, शेतकरी बांधवानी उत्‍पादीत केलेल्‍या शेतमालावर प्रक्रिया केल्‍यास निश्चितच अधिक लाभ होऊन शेतक-यांचे उत्‍पन्‍न वाढ होऊ शकेल. मराठवाडा विभागात शेतमाल प्रक्रिया उद्योग वाढीस मोठा वाव आहे. विद्यापीठातील अन्‍नतंत्र महाविद्यालयातील पदवीधर, नवउद्योजग, शेतकरी, शेतकरी उत्‍पादक कंपनी, बचत गटातील सदस्‍य भविष्‍यात या इन्‍क्‍युबेशन केंद्रात प्रशिक्षित होऊन मराठवाडयातील शेतमाल प्रक्रिया उद्योग विकासात मोलाचा हातभार लावतील. शेतमाल प्रक्रिया उद्योगातुन आपण आत्‍मनिर्भर भारताचे स्‍वप्‍न साकार करू शकु, असे ते म्‍हणाले.

प्रास्‍ताविकात प्राचार्य व मूख्य कार्यकारी अधिकारी डॉ उदय खोडके यांनी सदर केंद्राचा परिसरातील शेतकरी बांधव, नव उद्योजक यांना होणार असून या ठिकाणी निर्माण झालेल्या सुविधेचा शेतकऱ्यांना लाभ होईल असे सांगितले. तर केंद्राबाबत सविस्‍तर माहिती देतांना केंद्राचे समन्‍वयक डॉ राजेश क्षीरसागर म्‍हणाले की, गुळ व गुळापासुन विविध पदार्थ, मसाले प्रक्रिया उद्योग, ऊसाच्‍या रसापासुनचे विविध पेय पदार्थ आदी उद्योग विकासावर भर देण्‍यात येणार असुन एक जिल्‍हा एक उत्‍पादन संकल्‍पना राबविण्‍यात येणार आहे.  यावेळी प्रा दिलीप मोरे यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले.

राज्याचे कृषी आयुक्त श्री धीरज कुमार आणि नोडल ऑफिसर संचालक श्री सुभाष नागरे यांच्या मार्फत महाराष्ट्रात पीएमएफएमई योजना राबविण्यात येत असुन त्यांचे सदर प्रकल्‍पास मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर इन्‍क्‍युबेशन केंद्र उभारण्‍यास केंद्र सरकार कडुन ३.२९५ कोटीचा निधीस मंजुरी मिळाली असुन प्राप्‍त निधी केंद्राची स्‍वतंत्र नवीन इमारत, प्रक्रिया उपकरणे, गुणवत्‍ता नियंत्रण प्रयोगशाळा विकासाकरिता खर्च करण्‍यात येणार आहे. या केंद्राचा वापर व्‍यापारी तत्‍वावर करण्‍यात येणार असुन लहान उद्योजक, शेतकरी उत्‍पाक कंपन्‍या, बजत गट आदींना प्रशिक्षीत करून त्‍याच्‍या व्‍दारे उद्योजकता विकास करण्‍यात येणार आहे. शेतकरी बांधवाना भाडे तत्‍वावर सदर केंद्रातील सुविधा पुरविण्‍यात येणार असुन यामुळे शेतमाल प्रक्रिया स्‍टार्ट अप उद्योगास चालना मिळणार आहे. लहान उद्योजकांनी सामाईक इनक्‍युबेशन केंद्राची सुविधा पुरवुन त्‍यांच्‍या वरील आर्थिक भार कमी करणे हा सुध्‍दा त्‍याचा उद्देश आहे. बारामती येथील कृषि विज्ञान केंद्र हे राज्‍य नोडल एजन्‍सी म्‍हणुन कार्य करणार असुन जालना येथील रसायन तंत्रज्ञान संस्‍थेचे संचालक डॉ उदय अन्‍नापुरे हे मार्गदर्शक म्‍हणुन कार्य करणार आहे. 

कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाच्‍या विद्यार्थीनी अनुभव आधारीत शिक्षण कार्यक्रमांतर्गत तयार केलेले विविध प्रक्रियायुक्‍त अन्‍न पदार्थाचे प्रदर्शनीची पाहणी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ अनुप्रिता जोशी यांनी केले तर आभार डॉ बी एस आगरकर यांनी मानले. कार्यक्रमास प्रयोगशील शेतकरी श्री नरेश शिंदे, परभणीतील मसाला प्रक्रिया उद्योजक श्री नंदकुमार भारती,  महाविद्यालयातील डॉ हेमंत देशपांडे, डॉ कैलास गाडे, प्रा विजया पवार, प्रा सदावर्ते आदीसह प्राध्‍यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.