Pages

Thursday, August 4, 2022

मौजे मुरूंबा येथे आयोजित शेतकरी मेळाव्‍यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी केले मार्गदर्शन

परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेले परभणी कृषी महाविद्यालय व उती संवर्धन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मौजे मुरुंबा येथे दिनांक 3 ऑगस्ट रोजी खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्‍याच्‍या अध्यक्षस्थानी सरपंच कांताबाई सोपान खंदारे या होत्‍या तर उद्घाटक उपसरपंच प्रियंका गजानन झाडे या होत्या. व्‍यासपीठावर विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ गजानन गडदे, रावे सहसमन्वयक डॉ प्रवीण कापसे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ दिगंबर पटाईत, कार्यक्रम अधिकारी डॉ रमेश पाटील, डॉ मिर्झा आय ए बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्‍यात डॉ. गजानन गडदे यांनी सद्यस्थितीत शेतीमध्ये करावयाची कामे यावर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, ज्‍या ठिकाणी सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे पाने पिवळी पडली असतील तर वापसा परिस्थिती आल्यावर कोळपणी करावी, यामुळे पिकाची वाढ चांगली होण्यास मदत होते तसेच काही प्रमाणात तण व्यवस्थापन ही होते. तसेच सुक्ष्मअन्नद्रव्य ग्रेड-२ ची ५० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून एक फवारणी करावी. पहिल्या फवारणीने जर सोयाबीनची पाने हिरवी नाही झाली तर परत आठ दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

डॉ डिगंबर पटाईत यांनी खरीप पिकांतील किड व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, सोयाबीन मध्ये खोडमाशी व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रोफेनोफॉस ५० टक्के २० मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के अधिक थायमिथोक्झाम १२.६ टक्के ५० मिली प्रति एकर फवारावे.

डॉ प्रविण कापसे यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याबद्दल माहिती दिली तर डॉ रमेश पाटील यांनी पशुसंवर्धन व दुग्धशास्त्राबद्दल माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांच्‍या शेती विषयक प्रश्‍नांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी उत्‍तरे दिली. सदरिल शेतकरी मेळावा प्राचार्य डॉ सय्यद ईस्माईल, रावे समन्‍वयक डॉ राजेश कदम, केंद्र प्रमुख डॉ आनंद दौंडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिदूत अभिजित आव्हाड याने केले तर आभार अभिजीत गारवे याने मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कृषीदूत असोला व मुरुंबा तसेच ग्रामस्थ मुरुंबा यांनी प्रयत्न केले.