Pages

Thursday, October 13, 2022

कठोर मेहनत, शिस्‍त, दृढ इच्‍छा, विचार उच्‍च असतील तर यश तुमचे आहे..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि जिल्‍हा कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने महाराष्‍ट्र स्‍टार्टअप यात्रेचा दुसरा टप्‍पा निमित्‍त जिल्‍हास्‍तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन दिनांक १३ ऑक्‍टोबर रोजी करण्‍यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते झाले. व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, प्रभारी प्राचार्य डॉ कल्‍याण आपेट, जिल्‍हा प्रशिक्षण अधिकारी श्री रामकांत उनवणे, कौशल्‍य विकास रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्‍त श्री प्रशांत खंदारे, महाराष्‍ट्र राज्‍य लघु उद्योजक महामंडळाचे श्री शंकर पवार, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ स्मिता खोडके, डॉ राजेश क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, भारतीय तरूणांमध्‍ये मोठे कौशल्‍य आहे, त्‍यांच्‍यातील उद्योजकता कौशल्‍यास वाव देण्‍याचा प्रयत्‍न स्‍टार्टअप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन होत आहे. या प्रकल्‍पामुळे अनेक युवकांनी आपल्‍या नवकल्‍पनास मुर्त रूप देऊन उद्योगात मोठी भरारी घेतली. यशस्‍वी उद्योजक होण्‍याकरिता चांगले शिक्षण असले पाहिजे असे काही नाही, तर आपल्‍याकडे नवकल्‍पना पाहिजे, त्‍या संकल्‍पना प्रत्‍यक्ष राबविण्‍याकरीता कठोर मेहनत, शिस्‍त, दृढ इच्‍छा, उच्‍च विचार असतील तर यश तुमचेच आहे.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सुत्रसंचालन श्री प्रशांत खंदारे यांनी केले. शहरातील विविध महाविद्यालयातील विद्याथ्‍र्यांनी शिबीरात कृषि, शिक्षण, आरोग्‍य, ई प्रशासन आदी क्षेत्रातील नाविन्‍यपुर्ण व्‍यवसाय संकल्‍पनांचे सादरीकरण जिल्‍हास्‍तरीय तज्ञ समितीसमोर केले.  यातील तीन संकल्‍पनांमधुन राज्‍यसरीय निवड तज्ञ समितीव्‍दारे अंतिम विजेत्‍यांची निवड करण्‍यात येणार आहे.