Pages

Monday, October 3, 2022

एकाच दिवशी वनामकृविच्‍या वतीने मराठवाडयातील ६४ गावात ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम

उपक्रमात विद्यापीठातील ११५ तज्ञांचा समावेश असलेल्‍या २७ पथकांनी साधला १२८२ शेतकरी बांधवांशी संवाद, माननीय कुुुलगुरू यांनी साधला मौजे कचरेवाडी येथे शेतकरी बांधवाशी संवाद

महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम राबविण्यात येत असुन उपक्रमांतर्गत दिनांक ३ आक्‍टोबर रोजी एकाच दिवशी मराठवाडयातील ६४ गावात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतकरी बांधवाशी संवाद साधला. यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांची २७ पथके तयार करण्‍यात आली होती, यात ११५ शास्‍त्रज्ञाांचा समावेश होता. संपुर्ण दिवसात १२८२ शेतकरी बांधवाशी संवाद साधुन त्‍यांच्‍या कृषि विषयक समस्‍या जाणुन घेण्‍यात आल्‍या, शेतकरी बांधवाच्‍या शेतीस भेट देऊन विविध विषयांवर शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.

सदरिल उपक्रमांर्गत कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी आणि कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मौजे कचरेवाडी (जालना) येथील कार्यक्रमात माननीय कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वखाली विद्यापीठ पथकानी भेट देऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, गावचे सरपंच श्री. प्रवीण ससाने, प्रगतिशील शेतकरी श्री उद्धवराव खेडेकर, कार्यक्रम समन्‍वयक (केव्‍हीके, खरपुडी) डॉ. एस. व्ही. सोनुने, कार्यक्रम समन्वयक (केव्‍हीके,  बदनापुर) डॉ सचिन सोमवंशी आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी  श्री  जगदीश  जाधव यांच्‍या शेतीस  कुलगुरू  यांनी भेट देऊन  कापुस पिकांच्‍या  प्रात्‍यक्षिकाची पाहणी केली.

'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत संपूर्ण मराठवाड्यातील विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आदीं ठिकाणीचे विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि प्राध्‍यापक प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकरी बांधवाच्‍या समस्‍या जाणुन घेतल्‍या व विविध शेती विषयक विषयावर मार्गदर्शन केले. दिनांक १ सप्‍टेबर रोजी उपक्रमाची सुरूवात करण्‍यात आली होती, यावेळी एकाच दिवशी संपूर्ण मराठवाड्यात ८० विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २२ पथकांनी ६० पेक्षा जास्त गावांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून शेतकरी बांधवांच्‍या शेती विषयी तांत्रिक समस्याचे समाधान करण्यात आले. सदरिल उपक्रम कृषि विभागाच्‍या सहकार्यांने हे अभियान राबविण्यात येत आहे.