Pages

Tuesday, November 8, 2022

मानवी समाजाच्‍या उन्‍नतीचा शेतकरी हाच केंद्रबिंदु ........... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या वतीने संपुर्ण मराठवाडयातील ६० पेक्षा जास्‍त गावात राबविण्‍यात आला  ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम

उपक्रमांतर्गत  कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि मौजे मंगरूळ येथील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर भेट साधला संवाद

शेती विकास आणि शेतकरी कल्‍याण यात शासन, कृषि विभाग, कृषि विद्यापीठ आणि स्‍वत: शेतकरी हे महत्‍वाचे खांब असुन सर्वांनी एकत्रित कार्य केल्‍यास शेतकरी बांधवाची मोठी प्रगती शक्‍य आहे. करोना रोगाच्‍या काळात संपुर्ण जगात कृषि क्षेत्राची ताकद सर्वांनी अनुभवली असुन कृषिक्षेत्रानेच देशाची अर्थव्‍यवस्‍थेस व मानवी जीवनास तारले आहे. मानवी समाजाच्‍या उन्‍नतीचा शेतकरी हाच केंद्रबिंदु आहे, हे सिध्‍द होते, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रम राबविण्यात येत असुन उपक्रमांतर्गत दिनांक ८ नोव्‍हेंबर रोजी एकाच दिवशी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ संपुर्ण  मराठवाडयातील ६० पेक्षा जास्‍त गावात जाऊन शेतकरी बांधवाशी संवाद साधला. सदरिल उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे मानवत तालुक्‍यातील मौजे मंगरूळ येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर भेट देऊन संवाद साधला. कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक भारतीय किसान संघाचे सरसंघटनमंत्री मा श्री दादा लाड, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, प्रगतशील शेतकरी श्री अशोक दशमाने, श्री मधुकर जाधव, तालुका कृषि अधिकारी श्री प्रदिप कच्‍छवे, रेशीम शास्‍त्रज्ञ डॉ सी बी लटपटे, डॉ अनंत लाड, श्री गुलाब शिंदे, श्री रघुवीर नाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि पुढे म्‍हणाले की, पिक उत्‍पादन वाढीत शुध्‍द बियाणे, दर्जेदार कृषि निविष्‍ठा सोबत सुधारित पिक व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाची जोड आवश्‍यक आहे. अनेक शेतकरी स्‍वत: शेतीत नवनवीन प्रयोग करित आहेत. प्रयोगशील शेतकरी मा श्री दादा लाड यांनी विकसित केलेले कापुस लागवड तंत्रज्ञान अनेक शेतकरी स्‍वत: अवलंब करून या तंत्रज्ञानाची उपयुक्‍तता अधोरेखित केली आहे.  

मा श्री दादा लाड यांनी कापुस लागवड तंत्रज्ञानाबाबत माहिती देतांना म्‍हणाले की, कपासातील दोन झाडे आणि दोन ओळीतील आंतर कमी करून झाडांची संख्‍या योग्‍य राखणे आवश्‍यक आहे. झाडाच्या खालच्या गळफांद्या काढल्याने दाटी कमी होते. गळफांद्या काढल्यावर खोड शेंड्यापर्यंत जाड बनते. गळफांद्या काढल्याने बोंडाचा आकार मोठा होण्‍यास मदत होते. एकरी झाडांची संख्या वाढल्याने उत्पादनात वाढ होते असे ते म्‍हणाले.

डॉ देवराव देवसरकर यांनी आपल्‍या भाषणात विद्यापीठ विकसित विविध वाण आणि विद्यापीठ प्रकाशनाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात श्री प्रदिप कच्‍छवे यांनी केले तर मुख्‍य अतिथीचा परिचय डॉ अनंत लाड यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका तंत्र सहाय्यक श्री योगेश पवार यांनी केले. यावेळी मान्‍यवरांनी प्रगतशील शेतकरी मधुकर जाधव आणि अशोक दशमाने यांच्‍या श्री दादा लाड कापुस तंत्रज्ञान प्रक्षेत्रास भेट दिली. प्रक्षेत्राच्‍या शिवार पर्यंत माननीय कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि मा श्री दादा लाड यांनी बैलगाडीतुन प्रवास केला. या कार्यक्रमास परिसरातील ८६ गावातील शेतकरी उपस्थित होते.

दिनांक ८ नोव्‍हेंबर रोजी राबविण्‍यात आलेल्‍या उपक्रमाकरिता विद्यापीठ शास्‍त्रज्ञांची २५ पथके तयार करण्‍यात आली होती, यात १२५ पेक्षा शास्‍त्रज्ञांचा समावेश होता. संपुर्ण दिवसात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतकरी बांधवाशी संवाद साधुन त्‍यांच्‍या कृषि विषयक समस्‍या जाणुन घेऊन शेतकरी बांधवाच्‍या शेतीस भेट देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात आले. सदर उपक्रमांची सुरूवात दिनांक १ सप्‍टेबर रोजी करण्‍यात आली असुन दिनांक १ सप्‍टेंबर रोजी संपूर्ण मराठवाड्यात ८० विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २२ पथकांनी ६० गावांत तर दिनांक ३ ऑक्‍टोबर रोजी ११५ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २७ पथकांनी ६४ गावांत भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांच्‍या शेती विषयी तांत्रिक समस्याचे समाधान करण्यात आले. सदरिल उपक्रम कृषि विभागाच्‍या सहकार्यांने राबविण्यात येत आहे.