Pages

Tuesday, November 29, 2022

वनामकृविस राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्‍या पथकाची भेट व शास्‍त्रज्ञांना मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २९ नोव्‍हेबर रोजी वैज्ञानिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते तर राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे सचिव प्रा.नरेंद्र शाह, माजी सचिव डॉ ए व्‍हि सप्रे, शास्‍त्रज्ञ अधिकारी डॉ नविद पटेल, समन्‍वय अधिकारी प्राचार्य डॉ उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

मार्गदर्शनात डॉ नरेंद्र शाह म्‍हणाले की, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्‍या माध्‍यमातुन नाविण्‍यपुर्ण संशोधनाकरिता परभणी कृषि विद्यापीठास ५० लाख रूपयाचा निधी मंजुर करण्‍यात आला आहे. संशोधन एकाच संस्थेत केंद्रीत न होता, विकेंद्रीत स्‍वरूपात व्‍हावा हा दृष्‍टीकोन आयोगाचा आहे. यात तरूण संशोधकांना मोठी संधी असुन तरूणांकडे नवनवीन संशोधन संकल्‍पना असतात, त्‍यास व्‍यासपीठ देण्‍याचा आयोगाचा हेतु आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्‍या वापरातुन समाजातील विविध समस्‍या व विकासात्‍मक कामांसाठी सदर आयोगाची स्‍थापना करण्‍यात आली असुन विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकांपर्यंत नेण्‍यासाठी आयोग प्रयत्‍नशील आहे.

डॉ ए व्हि सप्रे म्‍हणाले की, आयोग सामाजिक आर्थिक विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्‍या अभिनव संशोधन प्रस्‍तावास निधी उपलब्‍ध करून देते, याचा लाभ विद्यापीठातील आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांना घेता येईल.

प्रास्‍ताविकाता प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाकडे संशोधन प्रकल्‍प सादर करण्‍याबाबतचे प्रारूप व प्रस्‍ताव तयार करण्‍यासाठीची मा‍हिती देऊन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनानुसार या उपक्रमास गती प्राप्‍त झाली असल्‍याचे ते म्‍हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल यांनी मानले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग यांच्‍यात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या पुढाकाराने दिनांक ३१ ऑक्‍टोबर २०२२ रोजी सामंजस्‍य करार झाला, या करार प्रस्‍तावांची देवाणघेवाण कार्यक्रमात करण्‍यात आली. कार्यक्रमास विविध महावि़द्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते, यात प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ बाबासाहेब ठोंबरे, प्राचार्य डॉ राकेश अहिरे, प्राचार्य डॉ जगदिश जहागिरदार, प्राचार्य डॉ राजेश्‍वर क्षीरसागर, प्राचार्या डॉ माधुरी कुलकर्णी, प्राचार्य डॉ गिरिधर वाघमारे, प्राचार्य प्रा हेमंत पाटील आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्‍यापक उपस्थित होते. याप्रसंगी मान्‍यवरांनी विद्यापीठातील मृदा विज्ञान व रसायनशास्‍त्र विभाग, अ‍न्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय, किटकशास्‍त्र विभाग, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, नाहेप प्रकल्‍पातील विविध संशोधनात्‍मक उपक्रमास भेटी दिल्‍या.