Pages

Monday, December 12, 2022

महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांनी स्‍वत:तील ऊर्जेचा सकारात्‍मकरित्‍या वापर करावा ....... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवितील परभणी कृषी महाविद्यालयात पदवी अभ्‍यासक्रमास नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांच्‍या उदबोधन कार्यक्रमात प्रतिपादन

महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांमध्‍ये मोठी ऊर्जा असते, या ऊर्जेचा सकारात्‍मकरित्‍या वापर केला पाहिजे. शिस्‍त, कठोर परिश्रम आणि सकारात्‍मकता हेच तुम्‍हाला यशापर्यंत घेऊन जाते. परभणी कृषी विद्यापीठाचे अनेक पदवीधर केवळ देशात आणि राज्‍यात विविध पदावर कार्य करित नसुन विदेशातही संशोधन क्षेत्रात विविध नामांकित संस्‍थेत योगदान देत आहेत. यातील अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असुन अनेक समस्‍यांना तोंड देत त्‍यांनी हे यश संपादन केले आहे. येणा-या काळात देश-विदेशातील नामांकित शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांशी विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यांचा जास्‍तीत जास्‍त संवाद आणि विचारांची देवाणघेवाण व्‍हावा, याकरिता विविध संस्‍थेशी विद्यापीठ सामंजस्‍य करार करित असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयात आयोजित कृषि पदवी अभ्‍यासक्रमास नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांचा उदबोधन कार्यक्रमात (दिनांक १२ डिसेंबर) ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन केंद्राचे व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य तथा प्रयोगशील शेतकरी मा श्री दादाजी लाड होते. व्‍यासपीठावर अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील कृषि आणि जीवशास्‍त्रीय अभियांत्रिकीचे वरीष्‍ठ प्राध्‍यापक डॉ धर्मेद्र सारस्‍वत, आयआयटी मुंबईचे प्रा. ईश्‍वर राजशेखर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, शिक्षण विभागचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात मा दादाजी लाड म्‍हणाले की, भारतात भरपुर सुर्यप्रकाश, समृध्‍द माती आणि मुबलक पाणी उपलब्‍ध आहे. कृषि प्रधान देशात शेतकरी मात्र वैभवशाली झाला नाही. आज चांगले शिक्षण घेणारा युवक शेतीकडे वळत नाही. कृषि हाच देशाचा आत्‍मा आहे, कोरोना काळात देशाची अर्थव्‍यवस्‍थेस शेती क्षेत्रानेच तारले. देशाच्‍या कृषी संस्‍कृतीत कृषी विद्यापीठे हे ज्ञान मंदिरे आहेत, याच ज्ञान मंदिरात आपणास शिक्षण घेण्‍याची संधी प्राप्‍त झाली आहे. आज तंत्रज्ञानधिष्‍ठात शेती करण्‍याकरिता कृषि पदवीधरांनी शेतीकडे वळण्‍याची गरज असल्‍याचे मत मा श्री दादाजी लाड यांनी व्‍यक्‍त केले.

वरीष्‍ठ प्राध्‍यापक डॉ धर्मेद्र सारस्‍वत यांनी विद्यार्थ्‍यांनी महाविद्यालयीन जीवनात आपल्‍या निश्चित केलेल्‍या ध्‍येयावर लक्ष केंद्रीत करण्‍याचा सल्‍ला दिला तर प्रा. ईश्‍वर राजशेखर यांनी विद्यार्थ्‍यांनी मुलभुत ज्ञानाबरोबरच स्‍वत: जास्‍तीत जास्‍त ज्ञान प्राप्‍ती करिता प्रयत्‍न करण्‍याचा सल्‍ला दिला. मार्गदर्शनात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी परभणी कृषी महाविद्यालयास गौरवशाली परंपरा असुन येथे शिकलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चांगले कार्य करित आहेत असे म्‍हणाले.

कार्यक्रमात महाविद्यालयातील विविध परिक्षेत उत्‍कृष्‍ट कामगिरी केलेल्‍या विद्यार्थ्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. तसेच नुतन प्रवेशित विद्यार्थी, पालक यांचेही स्‍वागत करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल यांनी केले. सुत्रसंचालन शिक्षण विभागचे प्रभारी डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार विभाग प्रमुख (कृषि अभियांत्रिकी) डॉ रावसाहेब भाग्‍यवंत यांनी मानले. महाविद्यालयाच्‍या वतीने नुतन प्रवेशित विद्यार्थ्‍यांना शैक्षणिक नियम विविध विषयाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठया संख्‍येने उपस्थित होते.