Pages

Thursday, December 22, 2022

कृषि ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेच्‍या उभारणीकरिता वनामकृविचा सामजंस्‍य करार

कृषि ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेच्‍या उभारणीकरिता वनामकृविचा सामजंस्‍य करार

कृषी क्षेत्रात काटेकोर आणि अचूक पद्धतीने विविध कामे करण्याकरिता ड्रोनचा वापर वाढणार असुन विविध पिकात किड-रोग व्‍यवस्‍थापन, अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन, पाणी व्यवस्थापनासाठी, शेतातील माहिती संकलन यासाठी ड्रोनचा वापर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ड्रोनचा वापर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने ड्रोन वापराबाबत नियम आखुन दिलेले आहेत. त्यानुसार ड्रोन चालवण्यासाठी ड्रोन पायलट परवाना आवश्‍यक आहे. हा परवाना नागरी विमान वाहतूक संचालनालयाने अधिकृत केलेल्‍या ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्थेकडून घ्यावा लागतो. 

अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्‍था वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात स्‍थापन करण्‍या‍च्‍या दृष्‍टीने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि गुरूग्राम (हरियाणा) येथील आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्‍यात दिनांक २० डिसेंबर रोजी सामजंस्‍य करार करण्‍यात आला. सामजंस्‍य करारावर कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि आणि आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेडचे संचालक श्री. अनुपकुमार उपाध्‍याय तसेच विद्यापीठामार्फत डॉ उदय खोडके आणि डॉ विशाल इंगळे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रिका श्रीमती दिपाराणी देवतराज, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ उदय खोडके, नाहेप प्रकल्‍प मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे, डॉ विशाल इंगळे, डॉ दत्‍ता पाटील, आदींची उपस्थिती होती. सामजंस्‍य कराराचा आराखडा कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ उदय खोडके यांनी तयार केला आहे.

सदर करारामुळे पिकनिहाय ड्रोन वापराच्‍या संशोधनास चालना मिळणार असुन ड्रोन आधारित शास्‍त्रशुध्‍द पध्‍दतीने फवारणी करणे, फवारणी करिता विविध प्रकाराचे नोझल तयार करणे, कृत्रिम बुध्‍दीमत्‍ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून योग्‍य गतीने आणि काटेकोरपणे फवारणी करणे याबाबत  प्रशिक्षण व संशोधन कार्यास चालना मिळणार आहे.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली असलेल्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील समितीने नुकतेच नऊ पिकांतील ड्रोन वापराच्‍या सुरक्षित व कार्यक्षम वापराबाबतचे मार्गदर्शक तत्‍वे देशाच्‍या कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या कृषि, सहकार आणि शेतकरी कल्‍याण विभागास सादर केले असुन मृदा आणि पिक अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शक तत्‍वे तयार करण्‍याकरिता मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली नवीन समितीचे गठण करण्‍यात आले आहे. सदरील समिती विविध पिकांमध्‍ये ड्रोन वापराबाबत  मार्गदर्शक तत्‍वे तयार करणार आहेत.