Pages

Saturday, December 24, 2022

वनामकृवित अन्‍न प्रक्रियावर आधारीत सामाईक उष्मायन केंद्राच्‍या इमारतीचे भुमिपुजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयात नवी दिल्‍ली येथील केंद्रीय अन्‍न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्‍या प्रधानमंत्री सुक्ष्‍म अन्‍न प्रक्रिया उद्योग योजने (PMFME) अंतर्गत सामाईक उष्मायन केंद्र (कॉमन इन्‍क्‍युबेशन सेंटर) उभारण्‍यास मान्‍यता मिळालेली असुन दिनांक २० डिसेंबर रोजी या केंद्राच्‍या इमारत बांधकामाचे भुमिपुजन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, विद्यापीठ वास्तुविशारद श्री युनूस आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, कृषि व सलग्‍न शाखेतील पदवीधर नौकरी मिळविणारे नव्‍हे तर नौकरी देणारे उद्योजक झाले पाहिजे,  याकरिता अन्‍नतंत्र महाविद्यालयात उभारण्‍यात येणाऱ्या सामाईक इन्‍क्‍युबेशन केंद्रामुळे अन्‍न प्रक्रिया उद्योग विकासास चालना मिळेल. शेतकरी बांधवानी उत्‍पादीत केलेल्‍या शेतमालावर प्रक्रिया केल्‍यास निश्चितच अधिक लाभ होऊन शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. मराठवाडा विभागात शेतमाल प्रक्रिया उद्योग वाढीस मोठा वाव आहे. विद्यापीठातील अन्‍नतंत्र महाविद्यालयातील पदवीधर, नवउद्योजक, शेतकरी, शेतकरी उत्‍पादक कंपनी, बचत गटातील सदस्‍य भविष्‍यात या इन्‍क्‍युबेशन केंद्रात प्रशिक्षित होऊन मराठवाडयातील शेतमाल प्रक्रिया उद्योग विकासात मोलाचा हातभार लावतील. यामुळे एक जिल्‍हा एक उत्‍पादन संकल्‍पनेस चालना मिळेल.

प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर यांनी सदर केंद्राचा परिसरातील शेतकरी बांधव, नव उद्योजक यांना उपयोग होणार असून गुळ व गुळापासुन विविध पदार्थ, मसाले प्रक्रिया उद्योग, ऊसाच्‍या रसापासुनचे विविध पेय पदार्थ आदी उद्योग विकासावर भर देण्‍यात येणार असल्‍याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ अनुप्रिता जोशी यांनी केले तर आभार डॉ प्रविण घाटगे यांनी मानले. कार्यक्रमास अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयातील विभाग प्रमुख प्रा. दिलीप मोरे, प्रा. हेमंत देशपांडे, डॉ कैलास गाढे, डॉ. पवार, डॉ भारत आगरकर आदीसह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

राज्याचे कृषी आयुक्तालय येथील नोडल ऑफिसर व संचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन) श्री सुभाष नागरे आणि उपसंचालक (कृषी प्रक्रिया व नियोजन) श्री वराळे साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्रात पीएमएफएमई योजना राबविण्यात येत असुन त्यांचे सदर प्रकल्‍पास मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर इन्‍क्‍युबेशन केंद्र उभारण्‍यास केंद्र सरकार कडुन ३.२९५ कोटीच्या निधीस मंजुरी मिळाली असुन प्राप्‍त निधी केंद्राची स्‍वतंत्र नवीन इमारत, प्रक्रिया उपकरणे, गुणवत्‍ता नियंत्रण प्रयोगशाळा विकासाकरिता खर्च करण्‍यात येणार आहे. या केंद्राचा वापर व्‍यापारी तत्‍वावर करण्‍यात येणार असुन लहान उद्योजक, शेतकरी उत्‍पाक कंपन्‍या, बजत गट आदींना प्रशिक्षीत करून त्‍याच्‍या व्‍दारे उद्योजकता विकास करण्‍यात येणार आहे. शेतकरी बांधवाना भाडे तत्‍वावर सदर केंद्रातील सुविधा पुरविण्‍यात येणार असुन यामुळे शेतमाल प्रक्रिया स्‍टार्ट अप उद्योगास चालना मिळणार आहे. लहान उद्योजकांना सामाईक इनक्‍युबेशन केंद्राची सुविधा पुरवुन त्‍यांच्‍या वरील आर्थिक भार कमी करणे हा सुध्‍दा त्‍याचा उद्देश आहे. यासाठी कृषी आयुक्तालय पुणे हे राज्‍य नोडल एजन्‍सी म्‍हणुन कार्य करणार असुन जालना येथील रसायन तंत्रज्ञान संस्‍थेचे संचालक डॉ उदय अन्‍नापुरे हे मार्गदर्शक म्‍हणुन कार्य करणार आहे.