Pages

Wednesday, December 14, 2022

मौजे दैठणा व मौजे रूमना येथे माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम

कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्‍या शास्‍त्रज्ञांचा शेतकऱ्यांशी संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या वतीने माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत प्राध्‍यापक व शास्त्रज्ञ यांच्‍या पथकांनी परभणी तालुक्यातील दैठणा व गंगाखेड तालुक्यातील रूमना या गावास भेटी देऊन गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. पथकात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ उदय खोडके, डॉ पंडित मुंडे, प्रा. दत्ता पाटील,  श्री लक्ष्मीकांत राऊतमारे यांचा समावेश होता. यावेळी शास्‍त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन गट चर्चा,  शिवार फेरी व मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनानुसार दर महिन्यात सदरील उपक्रम राबविण्‍यात येत आहे. 

यावेळी मार्गदर्शनात डॉ. खोडके म्‍हणले की, शेतकरी बांधवांनी मुलस्थानी स्थानी जलसंधारण, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर, फळबागांसाठी नवीन लागवड पद्धती, हरित गृहातील शेती गटाद्वारे किमान प्रक्रिया व विक्री व्यवस्था यावर भर दयावा. शेती मधील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. निविष्ठा वरील खर्च कमी करावा व शेतील्तील उत्पन्न वाढवावे असा सल्ला दिला. कृषी क्षेत्रासाठीच्या शासनाच्या उपलब्ध विविध योजनाची माहिती दिली.

डॉ. मुंढे यांनी ट्रक्टर व औजाराद्वारे शेतीतील यांत्रिकीकरण करून वेळ, मजूर आणि श्रम यांची कशी बचत करता येते याविषयीची माहिती दिली. यावेळी मौजे दैठणा येथील शेतकरी श्री मुरली इंगळे यांचे शेतावर पोवेर टिलर यांचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चे मध्ये श्री मुरली इंगळे यांचे कडील फळबाग लागवड, फळ तोडणी व विक्री व्यवस्था, गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय निविष्ठांचा वापार, कृषी औजारे, सिंचन व्यवस्थापन या विषयावर चर्चा करण्यात आली.श्री दत्ता कच्‍छवे यांचेशी निविष्ठा विक्री व शेती व्यवस्थापण तर श्री विष्णू गरुड यांचे शेतावर गहू, हरभरा , कापूस, हळद लागवड व व्यवस्थापन, सिंचन व निचरा, ट्रॅक्टर व बैलचलीत औजारे, पॉवर टिलर  या विषयावर चर्चा झाली. श्री शिवम कछवे यांचे शेतावर तुरीची लागवड, पिकामधील अंतर, आंतर पिक पद्धती आणि तुरीचे व्यवस्थापन यावर चर्चा झाली. प्रक्षेत्र भेटी दरम्‍यान गावातील तरुण शेतक-यांनी मोठया संख्‍येने सहभाग नोंदविला.