Pages

Friday, January 13, 2023

विचारास कृतीची जोड देणारा खरा चिरतरूण ....... प्रसिध्‍द कवि श्री केशवजी खटींग

राष्‍ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ आणि स्‍वामी विवेकानंद यांची जयंती वनामकृवित उत्‍साहात साजरी   

समाजात अनेकजण केवळ विचार मांडतात, परंतु कृती करत नाहीत तसेच अनेकजण विचार न करता कृती करतात. जे विचारास कृतीची जोड देतात आणि समाजहिताकरिता काम करतात तेच खरे चिरतरूण असुन त्‍यांच्‍या कार्याची नोंद समाज घेतो, असे प्रतिपादन प्रसिध्‍द कवि श्री केशवजी खटींग यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजने अंतर्गत दिनांक १२ जानेवरी रोजी राष्‍ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ जयंती आणि स्‍वामी विवेकानंद जयंती निमित्‍त राष्‍ट्र बांधणीमध्‍ये युवकांची भुमिका याविषयावर व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास अध्‍यक्ष म्‍हणुन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती, तर व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ गिरीधर वाघमारे, प्राचार्य डॉ राजेश क्षीरसागर, प्राचार्या डॉ जया बंगाळे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कव‍ि श्री केशवजी खटींग पुढे म्‍हणाले की, कृषि विद्यापीठाचे अनेक पदवीधर देशात व राज्‍यात विविध पदावर कार्यरत असुन कृषि पदवीधरांना शेतकरी कल्‍याणाकरिता कार्य करण्‍याची मोठी संधी आहे. स्‍वत: करिता व कुटुंबा करिता सर्वच काम करतात परंतु समाजाकरिता व राष्‍ट्राकरिता कार्य करणा-यांनाच समाज स्‍मरण करतो. जोपर्यंत सुर्य व चंद्र आहेत, तोपर्यंत राजमाता जिजाऊ आणि स्‍वामी विवेकानंद यांचे विचार व कार्य समाज स्‍मरण करणार, असे ते म्‍हणाले.     

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि म्‍हणाले की, राजमाता जिजाऊ आणि स्‍वामी विवेकांनद यांचे चरित्र युवकांकरिता प्रेरणादायी आहे. युवक हेच देशाचे भविष्‍य आहे, युवकांनी ज्ञानी, गुणवंत आणि जबाबदार व्‍यक्‍ती बनण्‍याकरिता प्रयत्‍न करावा. युवकांनी आपल्‍या जीवनातील ध्‍येय निश्चित करावे, ध्‍येय प्राप्‍ती करिता कठोर परिश्रम, सातत्‍य आणि संयम या गुणाचा अंगीकार करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा अधिकारी डॉ आशाताई देशमुख यांनी केले तर आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ रवि शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, कृषि महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय येथील प्राध्‍यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी, रासेयोचे स्‍वयंसेवक मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता क्रीडा अधिकारी प्रा डि एफ राठोड, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ प्रविण घाडगे, डॉ रवि शिंदे, डॉ संजय पवार, डॉ गजभई, डॉ विद्याधर मनवर आदींनी परिश्रम घेतले.