अचुक हवामान अंदाज व कृषी सल्लाकरिता तसेच अंतराळ विज्ञानाचा कृषि संशोधनात होणार लाभ
भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेचे (इस्रो) अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्र आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्यात १७ जानेवारी रोजी सामंजस्य करारावर झाला. करारावर कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि आणि अंतरीक्ष उपयोग केंद्राचे संचालक मा डॉ निलेश देसाई यांनी अहमदाबाद येथे स्वाक्ष-या केल्या. यावेळी बीपीएसजीचे समुह संचालक डॉ. बिमल कुमार भट्टाचार्य, परभणीचे कृषि हवामान तज्ञ डॉ. कैलास डाखोरे, बीपीएसजीचे डॉ. राहुल निगम, अँटेना विभागाचे ग्रुप डायरेक्टर डॉ मिलिंद महाजन, ग्रुप डायरेक्टर डॉ रश्मी शर्मा, डॉ गायत्री, डॉ डी आर रजक, डॉ मेहुल पंड्या, श्री विवेक पांडे, श्री अमित जैन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी कुलगुरू मा डॉ. इन्द मणी म्हणाले की, बदलत्या हवामानाचा कृषि क्षेत्रावर मोठा परिणाम होत असुन अचुक हवामान अंदाज व त्या आधारे ठोस कृषी सल्ला तालुकानिहाय शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्याची आवश्यकता आहे. भविष्यात कृषि क्षेत्रात अंतराळ विज्ञानाच्या मोठा वापर होणार असुन अहमदाबाद अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या माध्यमातुन परभणी कृषि विद्यापीठात संशोधनात्मक केंद्र स्थापन होणे गरजेचे आहे. अंतरीक्ष उपयोग केंद्राचे संचालक डॉ निलेश देसाई म्हणाले की, सामजंस्य करारामुळे अंतरिक्ष उपयोग केंद्र व परभणी कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त संशोधन कार्यास चालना मिळणार असुन विद्यापीठातील विद्यार्थी, संशोधक आणि शेतकरी बांधव यांना लाभ होईल, अचुक हवामान अंदाज करिता इस्रोकडील उपग्रह प्राप्त आकडेवारी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. बिमल कुमार भट्टाचार्य यांनी शेतीच्या वास्तविक समस्या ओळखण्यासाठी अॅग्रोमेट युनिटसोबत ड्रोन आधारित तंत्रज्ञान आणि उपग्रह आधारित प्राप्त होणारी आकडेवारीचा शेती क्षेत्रात वापराबाबत विद्यापीठासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तर डॉ. कैलास डाखोरे यांनी परभणी कृषी विद्यापीठाकडुन दर आठवडयास प्रसारीत करण्यात येणारा कृषि हवामान सल्लाचा शेतकरी बांधवा चांगला लाभ होत आहे. भविष्यात इस्रोकडुन उपग्रहाच्या माध्यमातुन येणा-या विविध आकडेवारीचा अतिवृष्टीमुळे शेतमाल उत्पादनाचे अचुक नुकसान ओळखणे शक्य होईल.
सदर सामंजस्य करारामुळे दोन्ही संस्थांना मोठा फायदा होणार असुन मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अचुक व काटेकोरपणे कृषि हवामान अंदाज व त्यावर आधारित कृषी सल्ला सेवा तत्परतेने व प्रभावीपणे देणे शक्य होणार आहे. परभणी विद्यापीठ विभागवार आणि जिल्हानिहाय कृषी हवामान सल्ला तयार करण्यासाठी उपग्रह कडुन प्राप्त विविध स्वरूपाची आकडेवारीचा लाभ होणार आहे. नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील संशोधनासही याचा लाभ होणार आहे. परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना विभागावर आणि जिल्हा स्तरावर २०१९ पासून स्थानिक कृषि सल्ला तयार करते, यास अधिक बळकटी प्राप्त होईल. सदर कराराचा लाभ विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांचे संशोधन कार्य आणि शेतकरी बांधवा होणार आहे.