Pages

Tuesday, January 3, 2023

महिला सक्षम तरच राष्ट्र समृद्ध ..... कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि

वनामकृविच्‍या वतीने बदनापुर येथे आयोजित महिला शेतकरी मेळाव्‍यात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्तार शिक्षण संचालनालय, बदनापुर कृषी विज्ञान केंद्र, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ (जालना) आणि नाबार्ड (जालना) यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त दिनांक ३ जानेवारी रोजी बदनापुर कृषी विज्ञान केंद्रात महिला शेतकरी मेळाव्‍याचे आयोजित करण्यात आला होता.

उदघाटन कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि हे होते तर अन्नमाता-सेंद्रिय शेती संशोधक व प्रसारक श्रीमती ममताबाई भांगरे या उद्घाटक म्हणून उपस्थित होत्‍या. व्‍यासपीठावर विस्‍तार  शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. जया बंगाळे, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी श्री. उमेश कहाते, जिल्हा उप महाव्यवस्थापक श्री. तेजल क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, येणा-या काळात जगात भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून पुढे यावयाचे असेल तर महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे अत्‍यंत आवश्यक आहे. ज्या कुटुंबात महिलांचा मान सन्मान राखला जातो, त्यांच्या प्रगतीकडे विशेष लक्ष दिले जाते, तेच कुटुंब समाजात एक आदर्श कुटुंब म्हणून पुढे येते. येणाऱ्या काळात विविध क्षेत्रात महिलांना संधी उपलब्ध होत आहेत, त्‍याकरिता महीलांनी संघटीत होऊन वाटचाल केली पाहिजे.

मार्गदर्शनात श्रीमती ममताबाई भांगरे यांनी गावरान वाणाचे महत्व, सदरील वाणाच्या संगोपनाची गरज या विषयावर सविस्तर माहिती देतांना म्‍हणाल्‍या की, ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्य विषयक वाढणाऱ्या समस्या लक्षात घेता महिलांनी परसबागेची लागवड करावी, आहारात अधिकतम भाजीपाल्यांचा समावेश करण्‍याचे  आवाहन केले.

मनोगतात श्री. उमेश कहाते यांनी महिलांनी उद्योजिका होणे गरजेचे असल्‍याचे सांगितले तर श्री. तेजल क्षीरसागर यांनी महिला बचत गटात काम करणाऱ्या महिलांचे क्षमता बांधणी आवश्यक असल्‍याचे म्‍हणाले. त्‍यांनी संयुक्त राष्ट्र संघ च्या शाश्वत विकासाच्या १७ विविध बिंदू पैकी गरिबी निर्मुलन, महिला सबलीकरण बाबतीत काम होणे गरजेचे असल्‍याचे मत व्‍यक्‍त केले.  

मेळाव्‍यात विद्यापीठाच्‍या कृषि अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण, संशोधन आणि विस्‍ताराच्‍या माध्‍यमातुन भरीव असे योगदानाबाबत कृषि अभियंता डॉ. स्मिता सोळंकी यांचे उत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन कुलगुरूंच्‍या हस्‍ते गौरविण्यात आले. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतशील शेतकरी महिला आणि महिला उद्योजिका यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. देवराव देवसरकर यांनी केले. सूत्रसंचालन शास्त्रज्ञ (कृषीविद्या) डॉ. दिपाली कांबळे यांनी केले  तर आभार मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ. पी आर. देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास बदनापुर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. राकेश आहिरे, बदनापूर कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दिपक पाटील, मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील आदीचे विशेष सहकार्य लाभले तर कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयक डॉ. एस. डी सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शास्त्रज्ञ (गृह विज्ञान) डॉ. साधना उमरीकर यांच्या समन्वयाने केंद्रातील अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेतले. मेळाव्यास जालना जिल्ह्य़ातील शेतकरी महिलां मोठ्या संख्येने उपस्थित होत्‍या.