Pages

Wednesday, January 25, 2023

सक्षम बालिका सक्षम देश ---------- कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात संपन्न

राष्ट्र उभारणीत नारी शक्तीचा मोठा वाटा आहे. प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असून मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. बालिका जर सक्षम असेल तरच राष्ट्र सक्षम होईल, असे विचार वनामकृविचे  मा. कुलगुरु डॉ. इंद्र मणि यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे आयोजित राष्ट्रीय बालिका दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि हे अभासी पध्दतीने कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीं म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. कैलास तिडके, स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्मिता मगर, सहयोगी अधिष्ठाता (कृषि अभियां‍त्रिकी) डॉ. उदय खोडके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे, व सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. जया बंगाळे हे उपस्थित होते.

मार्गदर्शनात डॉ. धर्मराज गोखले म्‍हणाले की, दिवसेंदिवस विद्यापीठीय शिक्षणामध्ये विद्यार्थीनींची संख्या वाढत असून, येथील अनेक विद्यार्थीनी उच्च पदावर उत्कृष्टपणे कार्य करत आहेत. विद्यापीठातील शिक्षणाचा उच्च दर्जा व अद्ययावत सोयीसुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थीनींनी आपले जीवन उज्ज्वल बनवावे असे ही त्यांनी यावेळी आवाहन केले.

श्री. कैलास तिडके यांनी परभणी जिल्ह्यात बाल  विवाहाचे प्रमाण अधिक असून बाल विवाहासारखी अनिष्ठ प्रथा बंद करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येऊन बाल विवाह मुक्त परभणी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन आपल्या ओघवत्या शैलीत केले. या दिनाचे औचित्य साधून ‘बाल विवाह प्रतिबंधक परभणी’ या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासंबंधी, समाजात प्रचार-प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्मिता मगर यांनी बालिका दिनाचे महत्त्व सांगतांना स्त्रीरोग तज्ज्ञ  या नात्याने त्यांच्या क्षेत्रातील मुलीं विषयीचे अनुभव विषद करत, समाजात मुलींचे संगोपन देखील मुलांप्रमाणे होणे गरजेचे आहे, अशा भावना व्यक्त करुन बालिका दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याचे महत्त्व विषद करतांना डॉ. जया बंगाळे यांनी आजची मुलगी हिच उद्याची माता होणार असल्याने, तिची सर्वतोपरी काळजी घ्यावी, विशेषत: तिचे आरोग्य, पोषण, शिक्षण या विषयी समाज जागरुक असणे नितांत गरजेचे  असल्याचे आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले. कार्यक्रमात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या विविध क्षेत्रातील संपादणूकीसाठी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या मध्ये श्री. शुभम पाचनकर या पदव्यूत्तर विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. कु. दिपाली संगेकर या आचार्य पदवी विद्यार्थीनीची निवड अविष्कार या संशोधनात्मक योजने अंतर्गत राजभवनात संशोधनकार्य सादर करण्यासाठी झाल्याबद्दल तसेच   कु. सुषमा माने या मानव विकास विषयातील पदव्यूत्तर विद्यार्थीनीची निवड बँकॉक येथे संशोधन कार्य करण्यासाठी झाल्याबद्दल या विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता बालविवाह प्रतिबंधक शपथ घेऊन करण्यात आली. कार्यक्रमास डॉ. माधुरी कुलकर्णी, प्रा. निता गायकवाड, डॉ. इरफाना सिद्दीकी, डॉ. विद्यानंद मनवर, डॉ. संतोष फुलारी इत्यादींचे सहकार्य तथा उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. या वेळी विद्यार्थी- विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.