Pages

Saturday, February 11, 2023

अमेरिकेतील कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटी आणि वनामकृवि परभणी यांच्‍यात सांमजस्‍य करार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि अमेरिकेतील नामांकित कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटी यांच्‍यात दिनांक १० फेब्रुवारी रोजी सांमजस्‍य करार झाला. विद्यापीठातील जागतिक बॅक आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्‍ली पुरस्‍कृत राष्‍ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत डिजिटल शेतीवर आधारीत प्रकल्‍प राबविण्‍यात येत असुन या प्रकल्‍पांतर्गत डिजिटल शेतीसंबंधीत शैक्षणिक आणि संशोधन कार्याकरिता राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील विविध नामांकित संस्‍थासोबत परस्‍पर सहकार्य प्रस्‍थापित करणे अपेक्षित आहे. या प्रकल्‍पांतर्गत दिनांक १० फेबुवारी रोजी कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटी येथे आयोजित कार्यक्रमात सदर करारावर विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि आणि कन्‍सस स्टेट युनिव्हर्सिटीचे संशोधन उपाध्‍यक्ष मा. डॉ. डेव्हिड व्ही. रोसोव्स्की यांनी स्‍वाक्षरी केली. या सामंजस्य कराराच्‍या माध्‍यमातुन दोन्‍ही संस्‍थेच्‍या वतीने परभणी कृषि विद्यापीठातील संशोधक, प्राध्‍यापक आणि विद्यार्थी याकरिता डिजिटल शेती तंत्रज्ञान क्षेत्रात कौशल्‍य विकासाकरिता वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित करण्‍यास मदत होणार असुन अमेरिकेतील डिजिटल शेतीचे ज्ञान अवगत होणार आहे. करारामुळे दोन्‍हीही विद्यापीठातील शिक्षण व संशोधन क्षेत्रातील ज्ञान व तंत्रज्ञानाचे देवाणघेवाण होणार आहे. तसेच राज्‍यातील व देशातील शेतीत डिजिटल करिता मनुष्‍यबळ निर्मिती करणे आणि शेतक-यांकरिता उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञान विकसित करण्‍यास मदत होणार आहे. याप्रसंगी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि आणि मा. डॉ. डेव्हिड व्ही. रोसोव्स्की यांनी आपआपल्‍या संस्‍थेबाबत माहिती दिली. मनोगतात मा डॉ. इन्‍द्र मणि म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठाच्‍या दृष्‍टीने कन्‍सस स्‍टेट युनिव्‍हर्सिटी व अमेरिकेतील नामांकित विद्यापीठासोबतचे करार हे ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगुन भविष्‍यात याचा मोठा फायदा भारतातील व महाराष्‍ट्रातील शेती विकासास होईल.

कार्यक्रमास कन्‍सस स्टेट युनिव्‍हर्सिटीतील शास्‍त्रज्ञ डॉ. वारा प्रसादडॉ. एमेस्ट मिंटनडॉ. जॅन मिडेनडॉर्फडॉ. नाझा लिलजाडॉ. ग्रँट चॅपमनडॉ. राज खोसलाकेएसयूचे डॉ. कालीरामेश सिलिवेरू आदीसह अनेक शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापक उपस्थित होते. कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे अमेरिकेतील नामांकित इतर विद्यापीठे नेब्रास्का विद्यापीठ, युनिव्‍हर्सिटी ऑफ फ्लोरिडा, वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी यांच्‍याशी डि‍जिटल शेती संशोधन व शिक्षण क्षेत्रात परस्‍पर सहकार्य करीता सामंजस्‍य करार करणार आहेत.