Pages

Wednesday, March 8, 2023

देश घडविण्‍यात अनेक थोर महिलांचा सिंहाचा वाटा ........ कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवित जागतिक महिला दिन साजरा

भारत देश घडविण्‍यात अनेक थोर महिलांचा सिंहाचा वाटा असुन आज प्रत्‍येक क्षेत्रात महिला आपले योगदान देत आहेत. कौटुबिंक व सामाजिक पातळीवर महिला आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. जीवनात यशस्‍वी होण्‍याकरिता महिलांना पुरूषांपेक्षा जास्‍त संघर्ष करावा लागतो. समाजात आजही महिलांना पुरूषांच्‍या तुलनेत कमी प्राधान्‍य दिले जाते, समाजात स्‍त्रीयांना पुरूषांइतकाच सन्‍मान मिळाला पाहिजे. समाजातील स्‍त्री विरोधी विकृती कमी करण्‍याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्‍त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमास विशेष अतिथी म्‍हणुन जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल, परभणी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा श्रीमती रश्‍मी खांडेकर, माननीय कुलगुरू यांच्‍या सुविद्य पत्‍नी माननीय श्रीमती जयश्री मिश्रा, विद्यापीठ नियंत्रिका मा श्रीमती दीपाराणी देवतराज, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ सय्यद इस्‍माईल, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ जया बंगाळे आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात मा श्रीमती आंचल गोयल म्‍हणाल्‍या की, विद्यापीठातील शिक्षणास पोषक व सुरक्षीत वातावरणामुळे कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहे. परभणी जिल्‍हयात बालविवाहाचे प्रमाण मोठे असुन बालविवाह टाळण्‍याकरिता जनजागृतीच्‍या माध्‍यमातुन प्रशासन प्रयत्‍न करित आहे, कृषि विद्यापीठाने या जनजागृती कार्यक्रमात सहभाग घ्‍यावा. स्‍त्रीयांचा सभाव सहज समजणारा नसतो, त्‍या प्रसंगी कठोर तर काही प्रसंगी हळव्‍या होतात.

श्रीमती रश्‍मी खांडेकर म्‍हणाल्‍या की, महिलांनी समाजातील व कुंटुबातील स्‍वत:चे महत्‍व ओळखले पाहिजे. आज बचत गटाच्‍या माध्‍यमातुन शेतकरी महिला सक्षम होत असुन त्‍या स्‍वत:च्‍या पायावर उभी राहत आहे. महिलांनी शासकीय योजना लाभ घ्‍यावा.

कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिर्मित्‍त विद्यापीठाच्‍या वतीने प्रशासकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देण्‍या-या जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल, परभणी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा श्रीमती रश्‍मी खांडेकर, विद्यापीठ नियंत्रिका मा श्रीमती दीपाराणी देवतराज, आणि माननीय कुलगुरू यांच्‍या सुविद्य पत्‍नी माननीय श्रीमती जयश्री मिश्रा यांचा विशेष सत्कार करून सन्‍मान करण्‍यात आला. तसचे क्रीडा व कला क्षेत्रात यश प्राप्‍त केलेल्‍या विद्यार्थीनी सिध्‍दी देसाई, ज्‍योती लगड, पुजा पदमगीरवार, तालुका कृषि अधिकारी म्‍हणुन नवनियुक्‍ती झालेल्‍या मंजुश्री कवडे, आविष्‍कार स्‍पर्धेत राजभवनात संशोधन प्रकल्‍प सादर करणारी दिपाली संगेकर, कृषि अभियंता डॉ स्मिता सोळंकी यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला.

प्रास्‍ताविकात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी भारतीय इतिहासात महिलांच्‍या योगदानाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ माधुरी कुलकर्णी यांनी केले तर आभार सहयोगी अधिष्‍ठाता डॉ जया बंगाळे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, संशोधक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.