Pages

Friday, May 26, 2023

मौजे सोन्‍ना येथे पर्यावरण पुरक जीवन पध्‍दती कार्यशाळा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पांतर्गत असलेला हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रमांतर्गत परभणी तालुक्यातील मौजे सोन्ना येथे दिनांक २५ मे रोजी बदलत्या वातावरणाशी निगडीत “पर्यावरण पुरक जीवन पध्दती” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्‍न झाली. कार्यक्रमात कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदशास्त्र) डॉ. जी. आर. हनवतेकनिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. जी. आर. हनवते यांनी दैनंदीन जीवनातील वापरात असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तुंचा व वाहनांचा पर्यावरणावर व मानवी जीवनावर होणारा परिणाम यावर मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, मातीचे आरोग्‍य हे मानवाच्‍या आरोग्‍यावर परिणाम करते. शेतात सेंद्रीय निविष्ठांचा वापर वाढविण्यात भर देणे आवश्‍यक असुन यामुळे मानवी जीवन निरोगी सदृढ होण्यास मदत होईल.

डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी पर्यावरणातील होणाऱ्या बदलाचा मातीवर होणारे अनिष्ठ परिणाम व त्यावरील उपाययोजना सुचविल्या तसेच त्यांनी एकात्मिक पध्दतीने पिकांवर होणाऱ्या कीड व रोगांचा नायनाट करण्यावर भर देण्यास सुचविले व रासायनिक खतांचा, कीड व रोग नाशकांचा वापर हा कमी प्रमाणात करावा असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री एम. डब्ल्यू. राठोड, यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. एस. एस. सुर्यवंशी, माजी पोलीस पाटील आवडाजी गमे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मौजे सोन्ना या गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.