Pages

Monday, June 5, 2023

मौजे आडगाव येथे खरीप हंगाम पूर्व नियोजन कार्यक्रम

वनामकृवितील कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती योजने अंतर्गत राबविण्‍यात आला उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती अंतर्गत परभणी तालुक्यातील मौजे आडगाव येथे दिनांक जुन रोजी “खरीप हंगाम पूर्व नियोजन” या विषयावर कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमात विद्यापीठातील तज्ञांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी डॉ. किशोर कुगने हे होते तर सरपंच श्री. बाळासाहेब ढोले, उपसरपंच रमाकांत पाऊडशेटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.   

अध्यक्षीय भाषणात डॉ. किशोर कुगने यांनी गावात राबविण्यात येत असलेल्या कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती या योजनेचा तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍याचा सल्‍ला दिला.  

मार्गदर्शनात वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदशास्त्र) डॉ. जी. आर. हनवते म्‍हणाले की, रासायनिक खतांचा वापर योग्य वेळी व योग्य जागेत टाकून करावा जेणेकरुन अतिरिक्त खताची मात्रा दिली जाणार नाही. तसेच तणांची वाढ, जमिनीचा सामू वाढणे अशा एक व अनेक जमिनीवर होणारे अनिष्ठ परिणाम होण्यास टाळले जाऊ शकते. शेतात एकात्मिक अन्नद्रव्ये पध्दतीचा वापर करण्यावर भर देण्‍याचा त्‍यांनी सल्‍ला दिला.

वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. ए. के. गोरे यांनी पूर्व मशागत करताना घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, जमिनीच्या उताराला आडवी मशागत करावी जेणेकरुन पावसाच्या पाण्यामध्ये होणारी जमिनीची धूप थांबवली जाईल. पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या बियाण्यांची उगवणक्षमता तपासावी तसेच बियाण्याला बीजप्रक्रिया करण्‍याचा सल्‍ला दिला. तसेच कनिष्ठ शास्त्रज्ञ (मृदशास्त्र) डॉ. पी. एच. गौरखेडे यांनी पिकात वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांचा कमी प्रमाणात वापर, माती परिक्षणानुसार खतांचा वापर करणे व सेंद्रीय खत जसे गांडूळ खत, हिरवळीच्या खतांचा व कंपोस्ट खतांचा वापर यावर माहिती दिली.

कार्यक्रमाचे आयोजक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वा. नि. नारखेडे हे होते, सुत्रसंचलन श्री एम. डब्ल्यू. राठोड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री एम. डब्ल्यू. राठोड, मोतीराम ब्याळे, मल्लिकार्जून ब्याळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मौजे आडगाव या गावातील शेतकरी मंडळी उपस्थित होते.