Pages

Wednesday, June 7, 2023

आयआयटी खरगपुर येथे आयोजित तंत्रज्ञान व्हिजन २०४७ कार्यशाळेत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांचे मार्गदर्शन

देशातील अग्रगण्‍य संस्‍था खरगपूर येथील आयआयटी संस्‍था आणि तंत्रज्ञान माहिती अंदाज आणि मूल्यांकन परिषद यांच्‍या  वतीने तंत्रज्ञान व्हिजन २०४७  आणि हवामान बदल या विषयावर १ ते २ जून या कालावधीत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. सदर कार्यशाळेचे उदघाटन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते उदघाटन करण्‍यात आले. व्‍यासपीठावर खरगपूर आयआयटीचे संचालक प्रा. व्ही के तिवारी, परिषदेचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. गौतम गोस्वामी, आयोजक आयआयटीचे प्रा. जी. पी. राजा शेखर, हेल्थकेअर सेंटर ऑफ एक्सलन्सचे अध्यक्ष प्रा. गौतम साहा, आयआयटी खरगपूर येथील भूविज्ञान आणि भूभौतिकशास्त्राचे प्रा.अभिजित मुखर्जी आदींची उपस्थिती होती.

या दोन दिवसीय तांत्रिक सत्रात देशातील अग्रगण्‍य संशोधक विचारमंथन करून आत्‍मनिर्भर विकसित भारत करिता हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान निर्मिती यावर तंत्रज्ञान व्हिजन २०४७ मसुदा तयार करण्‍यात येणार आहे. कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट हे देशाला तंत्रज्ञान विकासात जगात नेतृत्‍व करण्‍याच्‍या दृष्‍टीने मूलभूत आणि उपयोजित भविष्यातील संशोधन क्षेत्रे ओळखणे असुन २०४७ पुढील तंत्रज्ञान निर्मितीबाबत नियोजन करणे, काटेकोर कृषी आणि अन्न पोषण सुरक्षा, ऊर्जा आणि पर्यावरण, किफायतीशीर आरोग्य सेवा, अत्‍याधुनिक साहित्य आणि वाहतूक आदी विषयावर कार्यशाळेत चर्चा करण्‍यात येऊन तंत्रज्ञान विकासाचा मसुदा करण्‍यात येणार आहे.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, हवामान बदलाचा शेतीवर विपरित परिणाम होत असुन अन्‍न पोषण सुरक्षे करिता सर्वांनी एकत्रित प्रयत्‍न करणे गरजेचे आहे. बदलत्‍या हवामानात अनुकूल पिकांची वाण निर्मिती व तंत्रज्ञान निर्मितीत देशातील विद्यापीठ संशोधनात भर देत आहे.  ग्रीन ऊर्जा व पर्यावरण संतुलन याकरिता किफायतीशीर तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे असल्‍याचे ते म्‍हणाले. कार्यशाळेत देशातील विविध संस्‍थेतील संशोधक सहभागी झाले होते.