Pages

Monday, July 31, 2023

केव्हीकेंची विभागीय कार्यशाळा संपन्न

भा.कृ.अनु.प-अटारी पुणे आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठपरभणी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्रपैठण रोडऔरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे दिनांक 28 ते 30 जुलै, 2023 दरम्यान महाराष्ट्रगुजरात आणि गोवा राज्यातील सर्व कृषि विज्ञान केंद्रांची कार्यशाळा संपन्न झाली.

कार्यशाळेचा उदघाटन समारंभ दिनांक 28 जुलै 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पार पडला व त्यानंतर दिनांक 29 व 30 रोजीचा कार्यक्रम केव्हीकेपैठण रोड (छत्रपती संभाजीनगर) येथे पार पडला. उदघाटन सत्रतांत्रिक सत्र आणि समारोप या मध्ये विविध मान्यवर उपस्थित होते. ज्यामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे डीडीजी (कृषि विस्तार) डॉ.यु.एस.गौतमएडिजी (कृषि विस्तार) डॉ.आर.रॉय बर्मनभारतीय नियोजन आयोगाचे कृषि सल्लागार डॉ.व्ही.व्ही. सदामतेमाजी डीडीजी (कृषि विस्तार) डॉ.पी.दासडॉ.के.डी. कोकाटेकेंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अनुप मिश्राराहुरी कृषि विद्यपिठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाखनवसारी कृषि विद्यपीठाचे कुलगुरू डॉ.झेड पी पटेलविविध कृषि विद्यापीठांचे संचालक विस्तार शिक्षण आणि महाराष्ट्रगुजरात आणि गोवा राज्यातील ८२ कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ सहभागी होते.

कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणि हे होते तर आयसीएआर-सीआयएएच चे संचालक डॉ.जगदीश राणेअटारी पुणेचे संचालक डॉ.एस.के.रॉयमाजी संचालक डॉ.लाखन सिंगवनामकृविपरभणीचे संचालक विस्तार शिक्षण डॉ.डी.बी.देवसरकर आदींची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.इंद्र मणि म्हणाले की,शेतकऱ्यांच्या शेतावर तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यामध्ये केव्हीकेचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे. केव्हीके हे एक प्रभावी माध्यम आहे आणि प्रत्येक विद्यापीठाने देखील केव्हीकेच्या सशक्तीकरण साठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. अशा केंद्रांची विभागीय कार्यशाळा आयोजित करण्याची संधी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास प्राप्त होणे ही अभिमानाची बाब आहे.  कृषि विद्यापीठ देखील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. विद्यापीठातील प्रत्येकाने अत्यंत जबाबदारीने तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात आपला हातभार लावणे आवश्यक आहे. तसेच या कार्यशाळेमध्ये देण्यात आलेल्या सादरीकरणातून उत्कृष्ट शिफारशी देण्यात याव्यात आणि त्यांची अंमलबजावणी प्रत्येक केव्हीकेंनी करावी.

यावेळी डॉ.राणे म्हणाले कीकेव्हीके सोबत काम करणे हा अत्यंत चांगला अनुभव आहे. तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी केव्हीके द्वारे प्रभावी अंमलबजावणी करून घ्यावी. डॉ.लाखन सिंग म्हणाले कीकेव्हीके द्वारे राबवण्यात येणारे तंत्रज्ञान हे शास्त्रीय माहितीवर आधारित व अत्यंत शाश्वत असणे आवश्यक आहे. आणि यासाठी प्रत्येक केव्हीकेनी काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ.रॉय यांनी तीन दिवसीय कार्यशाळेत करण्यात आलेल्या सादरीकरण बद्दल माहिती दिली. तसेच अटारी पुणे अंतर्गत असलेल्या केव्हीकेच्या विविध कार्याबद्दल माहिती दिली. तसेच केव्हीकेंना अटारी द्वारे पूर्णपणे सहकार्य राहील त्यामुळे सर्वांनी प्रभावीपणे कार्य करावे.


कार्यशाळेत जानेवारी ते डिसेंबर 2022 दरम्यान केव्हीके द्वारे करण्यात आलेल्या कार्याचा प्रगती अहवालांचे सादरीकरण करण्यात आले. आणि मान्यवरांनी केव्हीकेच्या पुढील कामासाठी आवश्यक सूचना दिल्या. तसेच यावेळी विविध शास्त्रज्ञांनी विविध विषयांवर तांत्रिक मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमात विविध केव्हिके द्वारे करण्यात आलेल्या सादरीकरणाच्या शेवटी झालेल्या चर्चेत एक मतांनी ठरले की कृषी विज्ञान केंद्रानी त्यांना ठरवुन दिलेल्या काम करत असताना शेतकऱ्यांचे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत असताना येत असलेल्या अडचणी चा विचार करावा आणि सदरील बाबी लिखित स्वरूपात संशोधन संस्थांना शिफारसी करायला हवे. शिवायतंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास जीवनमान उंचावण्यासाठी होत असलेला परिणाम बाबत सुद्धा केव्हिके नी जागरूक असणे आवश्यक आहे. तसेच केव्हीकेचे कार्य हे सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असून त्याचा सर्वच केव्हीकेनी प्रभावीपणे प्रसार करावा. यासाठी केव्हीकेनी संपूर्ण जिल्हा व जिल्ह्यातील प्रत्येक गावात संलग्न होते आवश्यक आहे. तसेच प्रत्येक केव्हीकेनी स्वतःचा निधी उभा करणे आवश्यक आहे तसेच जिल्ह्यातील संलग्नित विभागांसोबत प्रभावीपणे काम करावे. केव्हीके अविरतपणे कार्य करत असते आणि प्रत्येक केव्हीकेंनी त्यांच्या सर्व कामांचा दस्तावेज तयार करणे आवश्यक आहे. केव्हीकेद्वारे प्रसारित करण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येतो व मोठ्या प्रमाणात फायदा होतो अशा शेतकऱ्यांची माहिती जास्तीत जास्तीत शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहचवणे आवश्यक आहे यामुळे कृषि विस्तारात मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे. प्रत्येक केव्हीकेने राज्यातील आदिवासी बहुल क्षेत्रासाठी विशेष मोहिमेची सुरुवात करून या विशेष मोहिमेचा प्रसार प्रभावीपणे करावा व त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. तसेच प्रत्येक केव्हीकेने माहितीचा प्रसार जास्तीत जास्त करण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करावा. तसेच केव्हीकेच्या प्रक्षेत्र हे मॉडेल पद्धतीने विकसित करावेत. तसेच महाराष्ट्रगुजरात व गोवा राज्यातील कृषि विद्यापीठेआयसीएआर आणि अटारी यांनी परस्पर समन्वयाने केव्हीकेंना अधिक सबळ आणि प्रभावीपणे कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्याकरिता पदभरती व गरजेच्या सुविधा पुरवणे आवश्यक आहे.




Friday, July 28, 2023

आत्तापासूनच करा सोयाबीन वरील पिवळा मोझॅक (केवडा) रोगाचे व्यवस्थापन

गेल्या वर्षी मराठवाड्यातील बऱ्याच भागात सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता, या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना संपूर्ण पिकचं उपटून टाकावे लागले होते. हा रोग मुंगबीन यलो मोझॅक या विषाणुंमुळे होतो. कडधान्य आणि तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. यावर्षीही हंगामाच्या सुरवातीलाच काही भागात सोयाबीनवर पिवळा मोझॅक (केवडा) या रोगाचा प्रादुर्भाव सुरू झालेला दिसून येतो आहे. या रोगामुळे सोयाबीनमध्ये १५ ते ७५ टक्के पर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.

रोगाची लक्षणे: सोयाबीनच्या पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. काही वेळा जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. अशा झाडांना कालांतराने फुले आणि शेंगा कमी लागतात. किंवा त्यातील दाण्यांचा आकार लहान राहतो किंवा संपूर्ण शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते. तसेच दाण्यांमधील तेलाचे प्रमाण घटते तर प्रथिनांच्या प्रमाणात वाढ होते. हा विषाणू पानातील रसामार्फत पसरतो आणि हा प्रसार मुख्यतः पांढऱ्या माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो. त्यामुळे वेळीच या रोगाला ओळखून तसेच पांढऱ्या माशीचे नियंत्रण करून या रोगाचे व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.

सोयाबीनवरील पांढरी माशी आणि पिवळ्या मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापन

काही सोयाबीन पिकाचे वाण या रोगास लवकर आणि जास्त प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे या रोगास बळी पडणाऱ्या वाणाची लागवड न करता आपल्या भागात विद्यापीठाद्वारे शिफारस केलेल्या सोयाबीन वाणांचीच लागवड करावी. लागवडीनंतर वेळोवेळी पिकाचे कीड व रोगांसाठी निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे. मोझॅक(केवडा) झालेली प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी समूळ काढून नष्ट करावीत जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  थायमिथोक्झाम १२.६ टक्के अधिक लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.६ टक्के झेडसी ५० मिली किंवा असिटामिप्रीड २५ टक्के अधिक बाइफेन्थ्रीन २५ टक्के डब्ल्यूजी १०० ग्रॅम किंवा बीटा साइफ्लुथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के ओडी १४० मिली यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रति एकर याप्रमाणात करावी. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रति एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत. फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळून शिफारसीनुसारच करावा. मूग, उडीद यासारख्या पर्यायी खाद्य वनस्पतीवरून पिवळा मोझॅक रोगाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी अशा पिकावरील पांढरी माशीचे व्यवस्थापन करावे. कमीत कमी पहिले ४५ दिवस पीक तणमुक्त ठेवावे. पावसाचा ताण पडल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे. बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी जेणेकरून किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो आणि पुढील हंगामात पर्यायाने किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो. पांढऱ्या माशीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकता वाटल्यास दहा दिवसानंतर परत एकदा कीटकनाशकांची फवारणी करावी, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ.जी.डी.गडदे, डॉ.डी.डी.पटाईत आणि श्री.एम.बी.मांडगे यांनी दिली असुन अधिक माहितीसाठी विद्यापीठ कृषी वाहिनी ०२४५२ २२९००० यावर संपर्क करावा.


संदर्भ 

वनामकृवि संदेश क्रमांक- 02/2023 ( 27 जुलै 2023), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र , वनामकृवि, परभणी.

वनामकृवित प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी संमेलनाचे थेट प्रक्षेपण

देशाचे माननीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते दिनांक २७ जुलै राजस्थानातील सिकर येथे आयोजित प्रधानमंत्री किसान सन्मान निधी संमेलन मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आणि ग्रामीण महिलांकरिता कार्यशाळेचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने तसेच करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, आत्‍माचे तंत्र व्‍यवस्‍थापक श्रीमती स्‍वाती घोडके, मंडळ कृषि अधिकारी श्रीमती शितल पौळ, अतिक व्‍यवस्‍थापक डॉ गजानन गडदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात नऊ करोड शेतकरी बांधवाच्‍या खात्‍यामध्‍ये किसान सम्‍मान निधि योजनेच्‍या साधारणत: १८ कोटी रूपये जमा करण्‍यात आले. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राजस्‍थान येथील सीकर मध्‍ये १.२५ लाख किसान समृध्दि केंद्राची सुरूवात केली. माननीय पंतप्रधान यांनी थेट प्रक्षेपणाव्‍दारे शेतकरी बांधवाना संबोधीत केले.

विद्यापीठात आयोजित थेेट प्रक्षेपण कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, कृषि विकास व शेतकरी कल्‍याणाकरिता भारत सरकार, राज्‍य सरकार, विविध संस्‍था व कृषि विद्यापीठ कार्य करित आहेत. हवामान मराठवाडयातील शेती पुढे अनेक समस्‍या आहेत. शेतकरी बांधवांतील नैराश्‍य कमी करण्‍याकरिता मानसिक, कौटुंबिक व सामाजिक स्‍तरावर प्रयत्‍न होणे गरजेचे आहे. प्रत्‍येकांच्‍या जीवनात चढउतार येत असतात, माणसाचे आयुष्‍य हे संघर्षमय आहे, संघर्षाचा सामना करणे हेच जीवन आहे. कुटुंबातील अविश्‍वासामुळे मनुष्‍य जास्‍त नैराश्‍यात जातो, त्‍यामुळे कुटुंबातील सर्व व्‍यक्‍तींनी एक विश्‍वासाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. समाज सुदृढ बनविण्‍याकरिता सर्वांनी एकत्रित प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे, यात महिलांची भुमिका महत्‍वाची असुन कौटुंबिक वातावरण सुदृढ बनविण्‍याकरिता त्‍यांनी पुढाकार घ्‍यावा.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले. कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी श्री पंडीत थोरात, श्री विलास जावळे, श्री जनार्दन आवरगंड, डॉ डि डि पटाईत आदीसह ६० ग्रामीण महीला व विद्यापीठातील कर्मचारी उपस्थित होते.




Thursday, July 27, 2023

वनामकृवित रेशीम किटक संगोपनावर दहा दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजने अंतर्गत दिनांक ३ ते १२ ऑगष्ट दरम्‍यान दहा दिवसीय “बाल्य रेशीम किटक संगोपन” या विषयावर युवक, शेतकरी व महीलांसाठी स्वयंम रोजगार निर्मीतीसाठी रेशीम उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण सशुल्क असून मराठवाडयातील सर्व जिल्हयातुन 30 रेशीम उद्योजक शेतक­यांची निवड करण्यात येईल. प्रशिक्षणा दरम्यान राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येनार आहे. तरी इच्छुक शेतक­यांनी नाव नोंदणी श्री. धनंजय मोहोड, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, रेशीम संशोधन योजना, वनामकृवि, परभणी मो.न. ९४०३३९२११९ यांच्या कडे करून घ्यावी, अशी मा‍हिती रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ सी बी लटपटे यांनी दिली आहे.

Tuesday, July 25, 2023

गोळेगांव येथील कृषि महाविद्यालयाचा ११ वा वर्धापन दिन उत्‍साहात साजरा

गोळेगांव (ता. औंढा नागनाथ जि. हिंगोली) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या हिंगोली जिल्‍हयातील गोळेगांव येथील  कृषि महाविद्यालयास ११ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने दिनांक २५ जुलै रोजी महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि हे होते तर व्‍यासपीठावर माजी कुलगुरु डॉ. के. पी. गोरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (हिंगोली) श्री. एस. अ. घोरपडे, संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम, नियंत्रक श्री. एन. एम. लांडगे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे, विद्यापीठ अभियंता श्री दिपक काशाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते उत्ती व पाने तपासणी प्रयोगशाळा, सौर ऊर्जा प्रकल्प व विद्यार्थ्यांकरिता बसचे उद्घाटन करण्यात आले.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, कृषि शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातुन येतात. विद्यार्थ्‍यांची शैक्षणिक प्रगती व कला गुणांना व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देण्‍याचे विद्यापीठाचा प्रयत्‍न असुन महाविद्यालयातील प्रयोगशाळेचे बळकटीकरण, सुसज्‍ज वसतीगृह सुविधा पुरविण्‍याकरिता विद्यापीठ कटिबध्‍द आहे.

माजी कुलगुरु डॉ. के. पी. गोरे यांनी गोळेगाव कृषि महाविद्यालय स्थापने विषयीच्या आठवणीना उजळा दिला. तर मनोगतात संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले म्‍हणाले की, गोळेगांव कृषी महाविद्यालयाची स्थापना माजी कुलगुरु डॉ. के. पी. गोरे यांच्‍या पुढाकाराने झाली.

प्रास्‍ताविकात सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी गोळेगांव कृषि महाविद्यालयाच्‍या स्थापनेपासून वाटचाली व विद्यार्थ्‍यांचे यश याविषयी माहिती दिली. सुत्रसंचालन डॉ. प्रविण राठोड यांनी केले तर आभार प्रा.एन.जी.कुऱ्हाडे यांनी मानले.

कार्यक्रमात प्रा डॉ. इन्‍द्र मणि यांना त्यांच्या कुलगुरूपदाच्या कारकिर्दीस एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने त्यांचा महाविद्यालयाच्‍या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.















Celebrated 11th College Foundation Day of College of Agriculture, Golegaon

Inauguration of Leaf tissue analysis Lab, College Bus, 32 KW Solar system by the auspicious hand of  Hon'ble Vice Chancellor Dr Indra Mani.  Director of Instruction and Dean Dr D N Gokhale, Dr K P Gore, Former Vice Chancellor, Registrar Dr Dhirajkumar Kadam, Shri Deepak Kashalkar, University Engineer, Shri Narayan Ladge, Comptroller, Shri S A Ghorpade, DSAO Hingoli, Dr B V Asewar, ADP, Golegaon were present.  Felicitated Hon Vice Chancellor on eve completion of one year as Hon Vice Chancellor of the University.

Monday, July 24, 2023

मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या कुलगुरूपदाची वर्षपुर्ती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विसावे कुलगुरू म्‍हणुन मा डॉ इन्‍द्र मणि यांनी २५ जुलै २०२३ रोजी पदाची सुत्रे स्‍वीकारली, यास एक वर्ष पुर्ण होत आहेत. देश व राज्‍याच्‍या विकासातील शेती व शेतकरी हेच आधारस्‍तंभ असुन विद्यापीठाने शेतकरी देवो भव:’ भावनेने कार्य करण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी आपल्‍या पहिल्‍याच भाषणात व्‍यक्‍त केला. विद्यापीठासमोर अनेक समस्‍या समोर असतांना उपलब्‍ध मनुष्‍यबळ आणि साधनसामुग्रीचा कार्यक्षम वापर कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वाखाली कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्‍तार शिक्षण या तिन्‍ही क्षेत्रात विद्यापीठाची घोडदौड सुरू आहे.

लक्ष विद्यापीठ बीजोत्‍पादन दुप्‍पटीचे 

विविध पिकांच्‍या विद्यापीठ विकसित वाणाच्‍या बियाणास शेतकरी बांधवामध्‍ये मोठी मागणी आहे, यात सोयाबीन, तुर, ज्‍वारी आदीच्‍या वाणास शेतकरी बांधवाची विशेष पसंती आहे. विद्यापीठातील मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विभागाकडे स्‍थापनेपासुन मोठया प्रमाणावर जमिनीचे क्षेत्र उपलब्‍ध आहे. या क्षेत्रावर १९७२ ते २००१ दरम्‍यान बीजोत्‍पादन घेतले जात होते, परंतु गेल्‍या काही वर्षापासुन निधी व मनुष्‍यबळ अभावी यातील बहुतांश क्षेत्र लागवडीखाली आणण्‍यात अडचणी निर्माण झाल्‍या. यावर्षी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍याच्‍या उद्देश्‍याने मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विकासाकडे विशेष लक्ष दिले. जास्‍तीत जास्‍त क्षेत्र बीजोत्‍पादनाखाली आणण्‍याकरिता करावयाच्‍या उपाय योजनांवर विचारमंथन करण्‍यात आले. उन्‍हाळयात १२५० पडिक जमीन लागवडीखाली आणण्‍यातील प्रमुख अडसर ठरणा-या क्षेत्रावरील काटेरी झाडेझुडपे काढुण जमिनीची नागंरणीमोगडणीचा-या काढणे इत्‍यादी मशागतीचे कामे करण्‍यात आली. याकरिता विद्यापीठातील विविध प्रकल्‍प व योजनातील ट्रॅक्‍टर्स, आवश्‍यक औजारे, जेसीबी यांचा वापर करण्‍यात आला. मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावरील जवळपास १२५० एकर जमिन क्षेत्र या खरीप हंगामात पैदासकार बीजोत्‍पादन हाती घेण्‍यात आले आहे. याशिवाय विद्यापीठ परिसर व मराठवाडयातील विद्यापीठाच्‍या उपकॅम्‍पस येथील ३०० एकर जमिनीवर यावर्षी वहती खाली आली असुन यातील २५० एकर वर स्‍मार्ट शेती प्रकल्‍प उभारण्‍यात येणार आहे. विद्यापीठाची इंचनइंच जमीन वापराखाली आणण्‍याचा मानस माननीय कुलगुरू यांनी व्‍यक्‍त केला आहे. तसेच विद्यापीठ परिसरात नवीन चार मोठया क्षमतेची शेततळी निर्माण करण्‍यात आली असुन जुन्या मोठ्या शेततळयाची दुरूस्‍ती करण्‍यात आली आहेया माध्‍यमातुन ८ – ९ कोटी लिटर पाण्‍याची साठवण क्षमता शक्‍य होणार आहे. यामुळे बीजोत्‍पादनाकरिता संरक्षित सिंचन देणे शक्य होणार आहे. विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर मोठया प्रमाणावर पैदासकार बीजोत्‍पादन कार्यक्रम राबविण्‍यात येत असुन या पैदासकार बियाणे पासुन प्रमाणित व सत्‍यतादर्शन बीजोत्‍पादन मोठया करणे शक्‍य होऊन विद्यापीठ विकसित वाणांचे जास्‍तीत जास्‍त बियाणे शेतकरी बांधवाना उपलब्‍ध होणार आहे. बीजोत्‍पादनाकरिता विद्यापीठातील अधिकारीकर्मचारी व मजुर वर्ग मोठया प्रमाणात परिश्रम घेत असुन माननीय कुलगुरू वेळोवेळी प्रक्षेत्रास भेट देऊन त्‍यांना प्रोत्‍साहित करतात.

देश-विदेशातील विविध नामांकित संस्‍थासोबत सामंजस्‍य करार

राष्‍ट्रीय व जागतिक स्‍तरावरील कृषि क्षेत्रातील संशोधन व ज्ञानाची माहिती विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यांना अवगत असणे आवश्‍यक आहे. शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदु असुन शेती विकास व शेतकरी कल्‍याणाकरिता सर्व शासकीय व अशासकीय संस्‍थांनी एकत्रित कार्य करण्‍यावर माननीय कुलगुरू यांचा भर असुन त्‍यांच्‍या कार्यकाळात देश – विदेशातील संस्‍थासोबत आजपर्यंत २० सामंजस्‍य करार करण्‍यात आले आहेत. यात जगातील अग्रगण्‍य विद्यापीठे अमेरिकेतील कन्‍सस स्‍टेट युनिवर्सिटी, फ्लोरिडा युनिवर्सिटी यांच्‍या सोबत कृषि शिक्षण व संशोधन करिता करार करण्‍यात आला असुन यामुळे आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील कृषि तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी यांच्‍यात कौशल्‍य विकास शक्‍य होणार आहे.

राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग यांच्‍याशी संशोधनाकरिता सामंजस्‍य करार करण्‍यात आला असुन या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांच्‍या नाविण्‍यपुर्ण संशोधनाकरिता परभणी कृषि विद्यापीठास ५० लाख रूपयाचा निधी प्राप्‍त झाला आहे. तरूणांकडे नवनवीन संशोधन संकल्‍पना असतातत्‍यास व्‍यासपीठ देण्‍याचा यामागे हेतु आहे. देशातील कृषि यांत्रिकीकरणात अग्रगण्‍य असलेली नोएडा येथील सीएनएच इंडस्ट्रियल इंडिया (न्‍यु हॉलंड) यांच्‍याशी सामंजस्‍य करार करण्‍यात आला असुन “कौशल्य विकास-कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण” प्रकल्‍पांतर्गत कृषी यांत्रिकीकरणात शेतकरी आणि ग्रामीण युवक यांना प्रशिक्षीत करण्‍यात येत आहे. याकरिता व्यवसाईक सामाजिक जबाबदारी निधी (सीएसआरमधुन ५० लाख रूपये मंजुर झाले आहेत. प्रकल्‍पांतर्गत कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र राहणार असुन खामगाव, औरंगाबाद, तुळजापूर आणि जालना येथील कृषी विज्ञान केंद्राचे उपकेंद्राची स्‍थापना करण्‍यात येत आहे. याव्‍दारे १५०० शेतकरीतंत्रज्ञ आणि ग्रामीण युवकांना प्रशिक्षण देण्‍यात येणार असुन प्रशिक्षणार्थींना ‘आत्मा निर्भार भारत मिशन’ अंतर्गत त्यांचे स्वत:चे उद्योग / सेवा केंद्र सुरू करण्यास प्रोत्साहित करण्‍यात येत आहे. नुकतेच औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात उपकेंद्राची सुरूवात करण्‍यात येऊन तीन दिवसीय प्रशिक्षण पार पडले. 

याच प्रमाणे अद्ययावत ट्रक्‍टर आधारित कृषि यांत्रिकीकरणाकरिता टॅफे – जेफार्म सोबत सामंजस्‍य करार करण्‍यात येऊन जेफार्म - यां‍त्रिकीकरण केंद्र (महाराष्‍ट्र) यांची सुरूवात करण्‍यात आली आहे. याव्‍दारे विद्यापीठात आधुनिक वर्क्‍सशॉपच्‍या माध्‍यमातुन शेतकरी व विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण देणे शक्‍य होणार आहे. कृषि अभियांत्रिकीकरणातील संशोधनास चालना मिळणार असुन याकरिता टॅफे कंपनी देखिल व्यवसाईक सामाजिक जबाबदारी निधी (सीएसआरमधुन २.५० कोटी रूपयाचा मंजुर केला आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडुन व्‍यवसाईक सामाजिक जबाबदारी निधी एवढयाप्रमाणात प्राप्‍त करणारे राज्‍यातील एकमेव विद्यापीठ ठरले असुन माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांनी ही संकल्‍पना कृषि विद्यापीठात रूचविण्‍याचे कार्य केले आहे. यासारख्‍या उपक्रमास नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.

कृ‍षी क्षेत्रात फोटोव्‍होल्‍टेइक तंत्रज्ञानाच्‍या वापराकरिता वनामकृविचा जर्मनीच्‍या जीआयझेड कंपनीशी सामंजस्‍य करार केला आहे. अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन सौर ऊर्जेतुन वीज निर्मितीसोबत विविध पिकांची लागवड केल्‍यास शेतकरी बांधवाना दुहेरी उत्‍पन्‍न मिळण्‍याचे साधन प्राप्‍त होऊ शकते. हे तंत्रज्ञान भारताकरिता नवीन असुन या तंत्रज्ञानाची मराठवाडयातील पिक पध्‍दतीत कितपत उपयुक्‍त ठरू शकतेयाकरिता संशोधनात परभणी कृषि विद्यापीठाने राज्‍यात पुढाकार घेतला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेचे (इस्रोअहमदाबाद येथील अंतराळ उपयोग केंद्र आणि विद्यापीठ सामंजस्य करार करण्‍यात आला असुन अचुक हवामान अंदाज व त्‍या आधारे ठोस कृषी सल्‍ला तालुकानिहाय शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता मदत होणार आहे. कृषि क्षेत्रात अंतराळ विज्ञानाच्या मोठा वापर होणार असुन अहमदाबाद अंतराळ उपयोग केंद्राच्‍या माध्‍यमातुन परभणी कृषि विद्यापीठात संशोधनात्‍मक केंद्र स्‍थापनाचा प्रयत्‍न केला जात आहे. लुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्‍चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्‍था यांच्‍याशी सामंजस्‍य करार करण्‍यात आला असुन या कराराच्‍या माध्‍यमातुन दोन्‍ही संस्‍थेतील पदव्‍युत्‍तर आणि आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांचे प्रशिक्षण व संशोधन, अभ्‍यास दौरे आदी सहकार्यात्मक कार्य करण्यात येणार आहे. पिकांचे कापणीनंतरचे नुकसान कमी करणारे तंत्रज्ञान विकासावर भर देण्‍यात येणार आहे.

लखनौ येथील भारतीय ऊस संशोधन संस्‍था यांच्‍याशी ऊस पिकातील प्रशिक्षण आणि दर्जेदार पदव्युत्तर संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करारावर करण्‍यात आला, यामुळे दीर्घकालीन ऊस संशोधनाला चालना मिळणार आहे. संपुर्ण मराठवाडयाकरिता स्‍थळनिहाय डिजिटल मृदा नकाशे तयार करण्‍यात करणे आणि मातीच्‍या प्रकारानुसार पिकांची निवड करण्‍याकरिता शेतकरी बांधवा मदत होण्‍याकरिता नागपुर येथील भाकृअप- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भुमी उपयोग नियोजन संस्थेशी  सामंजस्‍य करार करण्‍यात आला आहे.

या व्‍यतिरिक्‍त मुंबई येथील केंद्रीय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्‍था, ग्‍लोबल विकास ट्रस्‍ट, महिको लि., पाणी फाऊंटेशन, रिलायन्‍स फाऊंटेशन, ॲडराईज इंडिया, दुर्गा अॅग्रो वर्क्‍स, मे. अॅक्वॅटीक रेमीडीज् ली. मुंबई आदींशी सामजंस्‍य करार केले गेले आहेत. मराठवाडयातील कृषि विकासाकरिता शासनकृषि विद्यापीठकृषी विभागशासकीय संस्‍था, अशासकीय संस्‍थाकृषि क्षेत्रातील खासगी कंपन्‍या आणि शेतकरी बांधव यांनी सर्वांना एकत्रित कार्य करण्‍याची माननीय कुलगुरू यांचा प्रयत्‍न आहे.  

डि‍जिटल शेती व कृषि ड्रोन तंत्रज्ञान विकासाकरिता विद्यापीठाचे विशेष प्रयत्‍न

कृषी क्षेत्रात काटेकोर आणि अचूक पद्धतीने विविध कामे करण्याकरिता ड्रोनचा वापर वाढणार असुन विविध पिकात किड-रोग व्‍यवस्‍थापनअन्‍नद्रव्‍य  व्‍यवस्‍थापनपाणी व्यवस्थापनशेतातील माहिती संकलन यासाठी ड्रोनचा

वापर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ड्रोन चालवण्यासाठी ड्रोन पायलट परवाना आवश्‍यक असुन अधिकृत 

ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्‍था विद्यापीठात स्‍थापन करण्‍या‍च्‍या दृष्‍टीने विद्यापीठ आणि आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्‍यात करार करण्‍यात आला. सद्यस्थिती विद्यापीठाकडे चांगल्‍या दर्जाची चार ड्रोन उपलब्‍ध असुन ड्रोन प्रात्‍यक्षिके आयोजित करण्‍यात येत आहेत. भाडेतत्‍वावर आधारीत ड्रोन केंद्र (कस्टम हायरिंग सेंटर) स्‍थापन करण्‍यात येणार असुन शेतकरी बांधवा ड्रोन सुविधेचा लाभ होणार आहे. कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली असलेल्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील समितीने विविध पिकांतील ड्रोन वापराच्‍या अन्‍नद्रव्‍य, किटकनाशके यांच्‍या सुरक्षित व कार्यक्षम वापराबाबतचे मार्गदर्शक तत्‍वे नुकतेच देशाच्‍या कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या कृषि, सहकार आणि शेतकरी कल्‍याण विभागास सादर केलेला अहवाल प्रसिध्‍द करण्‍यात आला आहे.

नाहेप प्रकल्‍पाच्‍या अंतर्गत दोन ग्राफिटींग रोबोट विद्यापीठाकडे उपलब्‍ध झाली असुन याचा उपयोग रोपांचे कलमीकरण सुलभ होणार आहे, ही सुविधा देखिल शेतकरी बांधवाना उपलब्‍ध केली जाणार आहे. डिजिटल शेती तंत्रज्ञानावरील एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम निश्चित झाला असुन लवकरच सदर प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात येणार आहे. 

विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांच्‍या कौशल्‍य विकासावर भर

नाहेप प्रकल्‍पांतर्गत कौशल्‍य विकासाकरिता देश - विदेशातील अग्रगण्‍य संस्‍थेकडुन विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्‍यापक व संशोधक यांना प्रशिक्षण व अभ्‍यास दौ-याचे नियोजन करण्‍यात आले, यात विद्यापीठातील दोन प्राध्‍यापक अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठात डिजिटल तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण पुर्ण केले, तर विद्यापीठातील २६ विद्यार्थी तसेच एक प्राध्‍यापक थायलंड येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि स्पेन येथे प्रशिक्षण पुर्ण केले. लवकरच विद्यार्थ्‍यांची दुसरी तुकडी विदेशातील नामांकित संस्‍थेत पाठविण्‍याची कार्यवाही सुरू आहे. याप्रकारे विद्यार्थी व प्राध्‍यापकांना विदेशात प्रशिक्षणास पाठविण्‍याची विद्यापीठाच्‍या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. विद्यापीठातील ६० विद्यार्थी आयआयटी खरगपुर आणि मुंबई येथे प्रशिक्षण पुर्ण केले असुन देशातील अग्रगण्‍य संस्‍थेत आयोजित करण्‍यात आलेल्‍या विविध परिषदा, कार्यशाळेत सहभागी होण्‍याकरिता माननीय कुलगुरू विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांना नेहमीच प्रोत्‍साहीत करतात.

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम

कृषि तंत्रज्ञान शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता विद्यापीठाव्‍दारे विविध उपक्रम राबविण्‍यात येतातच, परंतु याची व्‍याप्‍ती व गती वाढविण्‍याकरिता प्रयत्‍न केला जात आहे. सप्‍टेंबर २०२२ मध्ये महाराष्‍ट्र शासनाच्‍या मार्गदर्शनानुसार “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” उपक्रमातंर्गत मराठवाडा विभागातील ३५० पेक्षा जास्त गावात राबविण्‍यात आला, यात विद्यापीठ शास्त्रज्ञाच्या पथकांनी गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांच्या शेती विषयक समस्या समजुन घेतल्या व पीक लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केलेहा उपक्रम भविष्यातही राबवण्यात येणार असून प्रत्‍येक महिन्यात एक दिवस विद्यापीठातील शास्त्रज्ञ व प्राध्यापक सहभागी होणार आहेत. यामुळे शेतकरी बांधवाशी विद्यापीठाची नाळ अधिक मजबूत होण्‍यास मदत होत आहे. उपक्रमांतर्गत माननीय कुलगुरू स्वत: मराठवाडयातील विविध गावात सहभागी होऊन शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करित आहेत.

विद्यापीठ विकसित वाण व तंत्रज्ञान केवळ मराठवाडा किंवा राज्‍यापुरते उपयुक्‍त नसुन देशातील अनेक राज्‍यातील शेतकरी बांधवाकरीता उपयुक्‍त आहे. उत्‍तर प्रदेशातील गोरखपुर येथील कृषि प्रदर्शनीत विद्यापीठ विकसित बैलचलित कृषि अवजारे शेतकरी बांधवाकरिता आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली. उत्‍तर प्रदेशचे माननीय मुख्‍यमंत्री यांनीही याची दखल घेतली. विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत  संशोधन  प्रकल्प  पशुशक्‍तीचा  योग्य  वापर  योजना  आणि  राणी  सावरगांव  येथील  श्री छत्रपती  शिवाजी  महाराज  गोशाळा  यांचे  संयुक्त  विद्यामाने  राणीसावरगांव  (तागंगाखेड जिपरभणीयेथे  विद्यापीठ विकसित बैलचलित  अवजारांचा समावेश  असलेले  भाडेतत्वावर  कृषि  अवजारे  सेवा  केंद्राचे ( कस्टम  हायरिंग  सेंटर स्‍थापन करण्‍यात आले असुन याचा लाभ परिसरातील शेतकरी बांधव घेत आहेत.

विद्यापीठाच्‍या वाणांचा भारताच्‍या राजपत्रात समावेश

केंद्रीय बियाणे अधिनियम१९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारसीनुसार वनामकृवि विकसित करडई पिकांच्‍या पीबीएनएस १८४देशी कापसाच्‍या पीए ८३७, खरीप ज्‍वारीच्‍या परभणी शक्‍ती, तुरीचा वाण बीडीएन-२०१३-२ (रेणुका), सोयाबीनचे एमएयुएस-७२५ आणि करडई पिकाचे पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णाया वाणांचा समावेश केला आहे. यामुळे या वाणांचा प्रचार  प्रसार मोठया प्रमाणावर होण्‍यास मदत होणार आहे.

दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित सोयाबीन वाण एमएयुएस-७३१ सह ४२ विविध तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता प्राप्‍त झाली. तर राहुरी ये‍थील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित सहा वाण, ३ तीन कृषी औजारे सह ३६ विविध तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता प्राप्‍त झाली आहे.

अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयात नवी दिल्‍ली येथील केंद्रीय अन्‍न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्‍या प्रधानमंत्री सुक्ष्‍म अन्‍न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत सामाईक उष्मायन केंद्र (कॉमन इन्‍क्‍युबेशन सेंटरउभारणीचे काम अंतिम टप्‍पात आहे, यामुळे अन्‍न प्रक्रिया उद्योजक शेतकरी बांधवा लाभ होणार आहे.

प्रगतशील शेतकरीनन्‍मोषक कृषी उद्योजक, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ यांचा सन्‍मान - विद्यापीठाच्‍या वतीने आयोजित विविध पातळीवर शेतकरी, कृषि उद्योजक, कृषि शास्‍त्रज्ञ यांना सन्‍माननीत करण्‍यात येऊन त्‍यांना प्रोत्‍साहन देण्‍यात येत आहे. कोणताही मेळावा व कार्यशाळा असो शेतकरी बांधव व महिला प्रतिनिधीस सन्‍मानाने व्‍यासपीठावर स्‍थान दिले पाहिजे, असा आग्रह माननीय कुलगुरू यांचा असतो.   

आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्ष

वर्ष २०२३ हे संयुक्‍त राष्‍ट्र संघटनेने आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्ष म्‍हणुन घोषित केले असुन विद्यापीठाने बाजरी व ज्‍वारी पिकांच्‍या अनेक चांगले वाण विकसित केले आहेत. यामुळे आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्षात विद्यापीठाची भुमिक महत्‍वाची आहे. आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने मानवी आहारात भरड धान्‍याचा वापर वाढीकरिता विद्यापीठ वर्षभर जनजागृती करिता विविध उपक्रम राबवित असुन भरड धान्‍य मुल्‍यवर्धनावर विद्यापीठ कार्य करीत आहे. यात ज्‍वारी व बाजरी पिकांच्‍या अनेक वाणाचा प्रसार व प्रचारावर भर देण्‍यात येत आहे. विद्यापीठाने विकसित केलेला देशातील ज्वारीचा पहिला जैवसंपृक्‍त वाण परभणी शक्ती आणि बाजरी पिकाचे एएचबी १२०० व एएचबी १२६९ ही जैवसंपृक्त वाणे शेतक-यांसाठी उपयुक्त ठरतील, या वाणात लोह व जस्ताचे प्रमाण इतर वाणांपेक्षा अधिक आहे. या माध्‍यमातुन महिलांतील रक्‍तक्षय, लोहाची कमतरता यावर मात करणे शक्‍य होऊ शकते.

सन्‍मान व पुरस्‍कार माध्‍यमातुन प्रोत्‍साहन  

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि नेहमीच विद्यार्थी, शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांंच्‍या चांगल्‍या कामाबाबत प्रात्‍साहित करतात. विद्यापीठातील संशोधन केंद्र, शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांना आंतरराष्‍ट्रीय, राष्‍ट्रीय व राज्‍य पातळीवर सन्‍माननीत करण्‍यात आले. नुकतेचकृषि विद्यापीठास ग्रीन मेंटर्स संस्‍थेचा प्रतिष्ठित आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ जाहीर झाला असुन सदर पुरस्‍कार दिनांक १५ सप्‍टेंबर २०२३ रोजी न्‍युयॉर्क ये‍थे आयोजित ७ व्‍या एनवायसी ग्रीन स्कुल कॉन्‍फरन्‍समध्‍ये ७८ व्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशना प्रसंगी प्रदान केला जाणार आहे.

अमेरिकेतील फ्लोरिड विद्यापीठात मुख्‍यालय असलेल्‍या कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्‍य वैज्ञानिक संस्‍थेचे फेलो म्‍हणुन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची निवड झाली, जपान मधील क्‍योटो येथे आयोजित विसावी सीआयजीआर जागतिक परिषदेत त्‍यांना फेलो  म्‍हणु अकादमीच्‍या वतीने

सन्‍माननित करण्‍यात  आलेही विद्यापीठाकरिता अभिमानाची बाब आहे.  

विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील गळीतधान्ये संशोधन केंद्राच्‍या अखिल भारतीय समन्वीत संशोधन (सूर्यफुल) प्रकल्प आणि औरंगाबाद येथील बाजरा संशोधन प्रकल्‍पास उत्‍कृष्‍ट संशोधन केंद्र पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रास सेंद्रीय शेती संशोधनातील पुढाकार व सेंद्रीय शेतीसाठी दिलेले प्रोत्साहन व योगदान याकरिता शासकीय संस्था या वर्गातुन दिला जाणारा जैविक इंडीया पुरस्कार -२०२२ प्राप्त झाला आहे.

वनामकृविचे शास्‍त्रज्ञ डॉ खिजर बेग व डॉ दिपक पाटील यांना उत्‍कृष्‍ट कृषी संशोधक पुरस्‍कारांने राज्‍य शासनाने सन्‍माननीत केले तर वसंतराव नाईक स्‍मृती प्रतिष्‍ठान पुसदच्‍या वतीने विद्यापीठातील सोयाबीन पैदासकार डॉ शिवाजी म्‍हेत्रे यांना उत्‍कृष्‍ट कृषी शास्‍त्रज्ञ पुरस्‍काराने सन्‍माननीत करण्‍यात आले. विद्यापीठस्‍तरावरील उत्‍कृष्‍ट महिला शास्‍त्रज्ञ म्‍हणुन कृषि अभियंता डॉ स्मिता सोळंकी यांना सन्‍माननीत करण्‍यात आले.

विद्यापीठाच्‍या वतीने कापुस लागवडीत नवीन तंत्रज्ञान विकसित केलेल्‍या मा श्री दादा लाड तसेच युवा प्रयोगशील शेतकरी श्री दत्‍तात्रय कदम यांना गौरविण्‍यात आले. हैद्राबाद येथील भारतीय तेलबीया संशोधन संस्‍थेच्‍या वतीने वनस्‍पती तेल याविषयावर आंतरराष्‍ट्रीय परिषदेत लातूर जिल्‍हयातील तेलबीया पिक उत्‍पादक शेतकरी मौजे मुरूड येथील श्री संजय नाडे आणि जवस उत्‍पादक शेतकरी मौजे चौर येथील श्री अशोक चिंते यांना पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. तर भारतीय समन्वित कृषि हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍प निक्रा अंतर्गत  हवामान आधारीत कृषी सल्‍ला पत्रिकेनुसार आधुनिक पध्‍दतीने शेती तसेच फळबागेचे  व्‍यवस्‍थापन करत या तंत्रज्ञानाचा शेतक-यांमध्‍ये प्रसार केल्‍याबद्दल दामपुरी ता परभणी येथील प्रगतशील शेतकरी श्री अशोक सालगोडे यांना हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍थेच्‍या सेंद्रल इन्स्टिटयुट ऑफ ड्रायलॅन्‍ड अॅग्रिकल्‍चर क्रीडा ३९ व्‍या स्‍थापना दिनानिमित्‍त उत्‍कृष्‍ट शेतकरी पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍यात आले.

विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वांगिन विकासाकरिता शिक्षणासोबतच कला व सांस्‍कृतिक कलागुणांना वाव देणे आवश्‍यक असुन त्‍यांना प्रोत्‍साहित करण्‍याची एकही संधी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि सोडत नाहीत. विद्यार्थ्‍यांच्‍या गुणांना वाव देण्‍याकरिता वेळोवेळी सांस्कृतिक व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देण्‍यात येत आहेत. बंगलोर येथील जैन विद्यापीठात ३६ वा आंतर विद्यापीठ राष्‍ट्रीय युवा महोत्‍सव – जैन उत्‍सव २०२३ स्‍पर्धेत मेंदी कला प्रकारात लातुर कृषि महाविद्यालयाची विद्यार्थींनी सिध्‍दी देसाई हिने कांस्‍य पदक पटकावले. तर आयसीएआर अॅग्री युनीफेस्‍ट मध्‍ये फाईन ऑर्ट मध्‍ये चॅपियन ट्रॉफी प्राप्‍त केली. एकविसाव्‍या अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्‍पर्धेत व्‍हॉलीबॉल मध्‍ये विद्यापीठ संघाने सुवर्ण पदक प्राप्‍त केले. 

मुलभुत सोयी सुविधा बळकटकरण्‍याकरिता प्रयत्‍न

विद्यापीठातील गेस्‍ट हाऊस सुविधा, विद्यार्थी व विद्यार्थीनीनीं वसतीगृहाच्‍या चांगल्‍या सुविधा पुरविण्‍याकरिता माननीय कुलगुरू नेहमीच आग्रही असतात, सद्यस्थितीत या वसतीगृहाचे नुतनीकरणाचे काम युध्‍द पातळीवर सुरू आहे. केवळ परभणी मुख्‍यालयीच नव्‍हे तर गोळेगांव, लातुर, बदनापुर येथील वसतीगृहाचे नुतनीकरण चालु आहे. निवृत्‍त कर्मचा-यांचे निवृत्‍ती वेतनाचा प्रश्‍न त्‍यांनी तत्‍परतेने हाताळुन त्‍यांना त्‍यांचा हक्क मिळवुन दिला. विद्यापीठात विविध बांधकामाचा दर्जा राखण्‍याकरिता माननीय कुुलगुरू स्‍वत: जातीने लक्ष देतात.

संपुर्ण देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राबविण्‍यास सुरूवात झाली असुन सदर धोरण कृषि विद्यापीठात प्रभावीपणे राबविण्‍याकरिता माननीय कुलगुरू यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध पातळीवर कार्य चालु आहे. यात ऑनलाईन शैक्षणिक व्‍यवस्थापन प्रणाली, अॅकाडेमिक बैंक ऑफ क्रेडिट, डि‍जीलॉकर, ब्‍लेंडेड लर्निन आदी उपक्रम सुरू करण्‍यात आले आहेत.

महाराष्‍ट्र शासनाने यावर्षी संशोधन प्रकल्‍पाकरिता २५ कोटीचे अनुदान दिले असुन सिल्‍लोड तालुक्‍यातील मौजे कोटनांद्रा व डोईफोडा येथे मका संशोधन केंद्र स्‍थापनेस मंजुरी दिली आहे. संशोधन क्षेत्रात शेतकरी बांधवाकरिता उपयुक्‍त संशोधन करणे हा प्रमुख उद्देश्‍य विद्यापीठाचा असुन बदलत्‍या हवामानानुसार संशोधनास गती देण्‍याचे कार्य माननीय कुलगुरू यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुरू आहे. सद्यस्थितीत विद्यापीठात मनुष्‍यबळांचा विचार करता पन्‍नास टक्के पेक्षा जास्‍त पदे रिक्‍त असतांना विद्यापीठाचा दर्जा राष्‍ट्रीय पातळीवर उंचावण्‍याचे मोठे आव्‍हान विद्यापीठा समोर आहे. विद्यापीठाचे नामांकन उच्‍चांवण्‍याकरिता दर्जेदार संशोधनाची आवश्‍यकता असुन याकरिता देश पातळीवरील विविध संस्‍थेकडुन निधी प्राप्‍त करण्‍याकरिता यावर्षी मोठया प्रमाणात संशोधन प्रकल्‍प सादर करण्‍यात आले आहेत. आंतरराष्‍ट्रीय उच्‍च दर्जेचे संशोधनात्‍मक लेखांचे प्रमाण वाढीवर भर देण्‍यात येत आहे. 

येणा-या काळात माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वात परभणी कृषि विद्यापीठात आमुलाग्र बदल होऊन देशातील एक अग्रगण्‍य कृषि विद्यापीठ म्‍हणुन नावारूपाला येईल, हे निश्चित ।

डॉ प्रविण कापसेे, जनसंपर्क अधिकारी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी