Pages

Monday, July 24, 2023

मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या कुलगुरूपदाची वर्षपुर्ती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विसावे कुलगुरू म्‍हणुन मा डॉ इन्‍द्र मणि यांनी २५ जुलै २०२३ रोजी पदाची सुत्रे स्‍वीकारली, यास एक वर्ष पुर्ण होत आहेत. देश व राज्‍याच्‍या विकासातील शेती व शेतकरी हेच आधारस्‍तंभ असुन विद्यापीठाने शेतकरी देवो भव:’ भावनेने कार्य करण्‍याचा संकल्‍प त्‍यांनी आपल्‍या पहिल्‍याच भाषणात व्‍यक्‍त केला. विद्यापीठासमोर अनेक समस्‍या समोर असतांना उपलब्‍ध मनुष्‍यबळ आणि साधनसामुग्रीचा कार्यक्षम वापर कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वाखाली कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्‍तार शिक्षण या तिन्‍ही क्षेत्रात विद्यापीठाची घोडदौड सुरू आहे.

लक्ष विद्यापीठ बीजोत्‍पादन दुप्‍पटीचे 

विविध पिकांच्‍या विद्यापीठ विकसित वाणाच्‍या बियाणास शेतकरी बांधवामध्‍ये मोठी मागणी आहे, यात सोयाबीन, तुर, ज्‍वारी आदीच्‍या वाणास शेतकरी बांधवाची विशेष पसंती आहे. विद्यापीठातील मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विभागाकडे स्‍थापनेपासुन मोठया प्रमाणावर जमिनीचे क्षेत्र उपलब्‍ध आहे. या क्षेत्रावर १९७२ ते २००१ दरम्‍यान बीजोत्‍पादन घेतले जात होते, परंतु गेल्‍या काही वर्षापासुन निधी व मनुष्‍यबळ अभावी यातील बहुतांश क्षेत्र लागवडीखाली आणण्‍यात अडचणी निर्माण झाल्‍या. यावर्षी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट करण्‍याच्‍या उद्देश्‍याने मध्‍यवर्ती प्रक्षेत्र विकासाकडे विशेष लक्ष दिले. जास्‍तीत जास्‍त क्षेत्र बीजोत्‍पादनाखाली आणण्‍याकरिता करावयाच्‍या उपाय योजनांवर विचारमंथन करण्‍यात आले. उन्‍हाळयात १२५० पडिक जमीन लागवडीखाली आणण्‍यातील प्रमुख अडसर ठरणा-या क्षेत्रावरील काटेरी झाडेझुडपे काढुण जमिनीची नागंरणीमोगडणीचा-या काढणे इत्‍यादी मशागतीचे कामे करण्‍यात आली. याकरिता विद्यापीठातील विविध प्रकल्‍प व योजनातील ट्रॅक्‍टर्स, आवश्‍यक औजारे, जेसीबी यांचा वापर करण्‍यात आला. मध्‍यवर्ती प्रक्षेत्रावरील जवळपास १२५० एकर जमिन क्षेत्र या खरीप हंगामात पैदासकार बीजोत्‍पादन हाती घेण्‍यात आले आहे. याशिवाय विद्यापीठ परिसर व मराठवाडयातील विद्यापीठाच्‍या उपकॅम्‍पस येथील ३०० एकर जमिनीवर यावर्षी वहती खाली आली असुन यातील २५० एकर वर स्‍मार्ट शेती प्रकल्‍प उभारण्‍यात येणार आहे. विद्यापीठाची इंचनइंच जमीन वापराखाली आणण्‍याचा मानस माननीय कुलगुरू यांनी व्‍यक्‍त केला आहे. तसेच विद्यापीठ परिसरात नवीन चार मोठया क्षमतेची शेततळी निर्माण करण्‍यात आली असुन जुन्या मोठ्या शेततळयाची दुरूस्‍ती करण्‍यात आली आहेया माध्‍यमातुन ८ – ९ कोटी लिटर पाण्‍याची साठवण क्षमता शक्‍य होणार आहे. यामुळे बीजोत्‍पादनाकरिता संरक्षित सिंचन देणे शक्य होणार आहे. विद्यापीठाच्‍या प्रक्षेत्रावर मोठया प्रमाणावर पैदासकार बीजोत्‍पादन कार्यक्रम राबविण्‍यात येत असुन या पैदासकार बियाणे पासुन प्रमाणित व सत्‍यतादर्शन बीजोत्‍पादन मोठया करणे शक्‍य होऊन विद्यापीठ विकसित वाणांचे जास्‍तीत जास्‍त बियाणे शेतकरी बांधवाना उपलब्‍ध होणार आहे. बीजोत्‍पादनाकरिता विद्यापीठातील अधिकारीकर्मचारी व मजुर वर्ग मोठया प्रमाणात परिश्रम घेत असुन माननीय कुलगुरू वेळोवेळी प्रक्षेत्रास भेट देऊन त्‍यांना प्रोत्‍साहित करतात.

देश-विदेशातील विविध नामांकित संस्‍थासोबत सामंजस्‍य करार

राष्‍ट्रीय व जागतिक स्‍तरावरील कृषि क्षेत्रातील संशोधन व ज्ञानाची माहिती विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व विद्यार्थ्‍यांना अवगत असणे आवश्‍यक आहे. शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदु असुन शेती विकास व शेतकरी कल्‍याणाकरिता सर्व शासकीय व अशासकीय संस्‍थांनी एकत्रित कार्य करण्‍यावर माननीय कुलगुरू यांचा भर असुन त्‍यांच्‍या कार्यकाळात देश – विदेशातील संस्‍थासोबत आजपर्यंत २० सामंजस्‍य करार करण्‍यात आले आहेत. यात जगातील अग्रगण्‍य विद्यापीठे अमेरिकेतील कन्‍सस स्‍टेट युनिवर्सिटी, फ्लोरिडा युनिवर्सिटी यांच्‍या सोबत कृषि शिक्षण व संशोधन करिता करार करण्‍यात आला असुन यामुळे आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील कृषि तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व विद्यार्थी यांच्‍यात कौशल्‍य विकास शक्‍य होणार आहे.

राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग यांच्‍याशी संशोधनाकरिता सामंजस्‍य करार करण्‍यात आला असुन या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांच्‍या नाविण्‍यपुर्ण संशोधनाकरिता परभणी कृषि विद्यापीठास ५० लाख रूपयाचा निधी प्राप्‍त झाला आहे. तरूणांकडे नवनवीन संशोधन संकल्‍पना असतातत्‍यास व्‍यासपीठ देण्‍याचा यामागे हेतु आहे. देशातील कृषि यांत्रिकीकरणात अग्रगण्‍य असलेली नोएडा येथील सीएनएच इंडस्ट्रियल इंडिया (न्‍यु हॉलंड) यांच्‍याशी सामंजस्‍य करार करण्‍यात आला असुन “कौशल्य विकास-कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण” प्रकल्‍पांतर्गत कृषी यांत्रिकीकरणात शेतकरी आणि ग्रामीण युवक यांना प्रशिक्षीत करण्‍यात येत आहे. याकरिता व्यवसाईक सामाजिक जबाबदारी निधी (सीएसआरमधुन ५० लाख रूपये मंजुर झाले आहेत. प्रकल्‍पांतर्गत कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र राहणार असुन खामगाव, औरंगाबाद, तुळजापूर आणि जालना येथील कृषी विज्ञान केंद्राचे उपकेंद्राची स्‍थापना करण्‍यात येत आहे. याव्‍दारे १५०० शेतकरीतंत्रज्ञ आणि ग्रामीण युवकांना प्रशिक्षण देण्‍यात येणार असुन प्रशिक्षणार्थींना ‘आत्मा निर्भार भारत मिशन’ अंतर्गत त्यांचे स्वत:चे उद्योग / सेवा केंद्र सुरू करण्यास प्रोत्साहित करण्‍यात येत आहे. नुकतेच औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात उपकेंद्राची सुरूवात करण्‍यात येऊन तीन दिवसीय प्रशिक्षण पार पडले. 

याच प्रमाणे अद्ययावत ट्रक्‍टर आधारित कृषि यांत्रिकीकरणाकरिता टॅफे – जेफार्म सोबत सामंजस्‍य करार करण्‍यात येऊन जेफार्म - यां‍त्रिकीकरण केंद्र (महाराष्‍ट्र) यांची सुरूवात करण्‍यात आली आहे. याव्‍दारे विद्यापीठात आधुनिक वर्क्‍सशॉपच्‍या माध्‍यमातुन शेतकरी व विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षण देणे शक्‍य होणार आहे. कृषि अभियांत्रिकीकरणातील संशोधनास चालना मिळणार असुन याकरिता टॅफे कंपनी देखिल व्यवसाईक सामाजिक जबाबदारी निधी (सीएसआरमधुन २.५० कोटी रूपयाचा मंजुर केला आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडुन व्‍यवसाईक सामाजिक जबाबदारी निधी एवढयाप्रमाणात प्राप्‍त करणारे राज्‍यातील एकमेव विद्यापीठ ठरले असुन माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांनी ही संकल्‍पना कृषि विद्यापीठात रूचविण्‍याचे कार्य केले आहे. यासारख्‍या उपक्रमास नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राधान्‍य देण्‍यात आले आहे.

कृ‍षी क्षेत्रात फोटोव्‍होल्‍टेइक तंत्रज्ञानाच्‍या वापराकरिता वनामकृविचा जर्मनीच्‍या जीआयझेड कंपनीशी सामंजस्‍य करार केला आहे. अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन सौर ऊर्जेतुन वीज निर्मितीसोबत विविध पिकांची लागवड केल्‍यास शेतकरी बांधवाना दुहेरी उत्‍पन्‍न मिळण्‍याचे साधन प्राप्‍त होऊ शकते. हे तंत्रज्ञान भारताकरिता नवीन असुन या तंत्रज्ञानाची मराठवाडयातील पिक पध्‍दतीत कितपत उपयुक्‍त ठरू शकतेयाकरिता संशोधनात परभणी कृषि विद्यापीठाने राज्‍यात पुढाकार घेतला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेचे (इस्रोअहमदाबाद येथील अंतराळ उपयोग केंद्र आणि विद्यापीठ सामंजस्य करार करण्‍यात आला असुन अचुक हवामान अंदाज व त्‍या आधारे ठोस कृषी सल्‍ला तालुकानिहाय शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता मदत होणार आहे. कृषि क्षेत्रात अंतराळ विज्ञानाच्या मोठा वापर होणार असुन अहमदाबाद अंतराळ उपयोग केंद्राच्‍या माध्‍यमातुन परभणी कृषि विद्यापीठात संशोधनात्‍मक केंद्र स्‍थापनाचा प्रयत्‍न केला जात आहे. लुधियाना येथील केंद्रीय काढणी पश्‍चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्‍था यांच्‍याशी सामंजस्‍य करार करण्‍यात आला असुन या कराराच्‍या माध्‍यमातुन दोन्‍ही संस्‍थेतील पदव्‍युत्‍तर आणि आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांचे प्रशिक्षण व संशोधन, अभ्‍यास दौरे आदी सहकार्यात्मक कार्य करण्यात येणार आहे. पिकांचे कापणीनंतरचे नुकसान कमी करणारे तंत्रज्ञान विकासावर भर देण्‍यात येणार आहे.

लखनौ येथील भारतीय ऊस संशोधन संस्‍था यांच्‍याशी ऊस पिकातील प्रशिक्षण आणि दर्जेदार पदव्युत्तर संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करारावर करण्‍यात आला, यामुळे दीर्घकालीन ऊस संशोधनाला चालना मिळणार आहे. संपुर्ण मराठवाडयाकरिता स्‍थळनिहाय डिजिटल मृदा नकाशे तयार करण्‍यात करणे आणि मातीच्‍या प्रकारानुसार पिकांची निवड करण्‍याकरिता शेतकरी बांधवा मदत होण्‍याकरिता नागपुर येथील भाकृअप- राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भुमी उपयोग नियोजन संस्थेशी  सामंजस्‍य करार करण्‍यात आला आहे.

या व्‍यतिरिक्‍त मुंबई येथील केंद्रीय कापुस तंत्रज्ञान संशोधन संस्‍था, ग्‍लोबल विकास ट्रस्‍ट, महिको लि., पाणी फाऊंटेशन, रिलायन्‍स फाऊंटेशन, ॲडराईज इंडिया, दुर्गा अॅग्रो वर्क्‍स, मे. अॅक्वॅटीक रेमीडीज् ली. मुंबई आदींशी सामजंस्‍य करार केले गेले आहेत. मराठवाडयातील कृषि विकासाकरिता शासनकृषि विद्यापीठकृषी विभागशासकीय संस्‍था, अशासकीय संस्‍थाकृषि क्षेत्रातील खासगी कंपन्‍या आणि शेतकरी बांधव यांनी सर्वांना एकत्रित कार्य करण्‍याची माननीय कुलगुरू यांचा प्रयत्‍न आहे.  

डि‍जिटल शेती व कृषि ड्रोन तंत्रज्ञान विकासाकरिता विद्यापीठाचे विशेष प्रयत्‍न

कृषी क्षेत्रात काटेकोर आणि अचूक पद्धतीने विविध कामे करण्याकरिता ड्रोनचा वापर वाढणार असुन विविध पिकात किड-रोग व्‍यवस्‍थापनअन्‍नद्रव्‍य  व्‍यवस्‍थापनपाणी व्यवस्थापनशेतातील माहिती संकलन यासाठी ड्रोनचा

वापर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ड्रोन चालवण्यासाठी ड्रोन पायलट परवाना आवश्‍यक असुन अधिकृत 

ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्‍था विद्यापीठात स्‍थापन करण्‍या‍च्‍या दृष्‍टीने विद्यापीठ आणि आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्‍यात करार करण्‍यात आला. सद्यस्थिती विद्यापीठाकडे चांगल्‍या दर्जाची चार ड्रोन उपलब्‍ध असुन ड्रोन प्रात्‍यक्षिके आयोजित करण्‍यात येत आहेत. भाडेतत्‍वावर आधारीत ड्रोन केंद्र (कस्टम हायरिंग सेंटर) स्‍थापन करण्‍यात येणार असुन शेतकरी बांधवा ड्रोन सुविधेचा लाभ होणार आहे. कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या अध्‍यक्षतेखाली असलेल्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील समितीने विविध पिकांतील ड्रोन वापराच्‍या अन्‍नद्रव्‍य, किटकनाशके यांच्‍या सुरक्षित व कार्यक्षम वापराबाबतचे मार्गदर्शक तत्‍वे नुकतेच देशाच्‍या कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या कृषि, सहकार आणि शेतकरी कल्‍याण विभागास सादर केलेला अहवाल प्रसिध्‍द करण्‍यात आला आहे.

नाहेप प्रकल्‍पाच्‍या अंतर्गत दोन ग्राफिटींग रोबोट विद्यापीठाकडे उपलब्‍ध झाली असुन याचा उपयोग रोपांचे कलमीकरण सुलभ होणार आहे, ही सुविधा देखिल शेतकरी बांधवाना उपलब्‍ध केली जाणार आहे. डिजिटल शेती तंत्रज्ञानावरील एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम निश्चित झाला असुन लवकरच सदर प्रमाणपत्र अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात येणार आहे. 

विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांच्‍या कौशल्‍य विकासावर भर

नाहेप प्रकल्‍पांतर्गत कौशल्‍य विकासाकरिता देश - विदेशातील अग्रगण्‍य संस्‍थेकडुन विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्‍यापक व संशोधक यांना प्रशिक्षण व अभ्‍यास दौ-याचे नियोजन करण्‍यात आले, यात विद्यापीठातील दोन प्राध्‍यापक अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठात डिजिटल तंत्रज्ञानावरील प्रशिक्षण पुर्ण केले, तर विद्यापीठातील २६ विद्यार्थी तसेच एक प्राध्‍यापक थायलंड येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि स्पेन येथे प्रशिक्षण पुर्ण केले. लवकरच विद्यार्थ्‍यांची दुसरी तुकडी विदेशातील नामांकित संस्‍थेत पाठविण्‍याची कार्यवाही सुरू आहे. याप्रकारे विद्यार्थी व प्राध्‍यापकांना विदेशात प्रशिक्षणास पाठविण्‍याची विद्यापीठाच्‍या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. विद्यापीठातील ६० विद्यार्थी आयआयटी खरगपुर आणि मुंबई येथे प्रशिक्षण पुर्ण केले असुन देशातील अग्रगण्‍य संस्‍थेत आयोजित करण्‍यात आलेल्‍या विविध परिषदा, कार्यशाळेत सहभागी होण्‍याकरिता माननीय कुलगुरू विद्यार्थी, प्राध्‍यापक व शास्‍त्रज्ञांना नेहमीच प्रोत्‍साहीत करतात.

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम

कृषि तंत्रज्ञान शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्‍याकरिता विद्यापीठाव्‍दारे विविध उपक्रम राबविण्‍यात येतातच, परंतु याची व्‍याप्‍ती व गती वाढविण्‍याकरिता प्रयत्‍न केला जात आहे. सप्‍टेंबर २०२२ मध्ये महाराष्‍ट्र शासनाच्‍या मार्गदर्शनानुसार “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” उपक्रमातंर्गत मराठवाडा विभागातील ३५० पेक्षा जास्त गावात राबविण्‍यात आला, यात विद्यापीठ शास्त्रज्ञाच्या पथकांनी गावांना भेटी देऊन शेतकरी बांधवांच्या शेती विषयक समस्या समजुन घेतल्या व पीक लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केलेहा उपक्रम भविष्यातही राबवण्यात येणार असून प्रत्‍येक महिन्यात एक दिवस विद्यापीठातील शास्त्रज्ञ व प्राध्यापक सहभागी होणार आहेत. यामुळे शेतकरी बांधवाशी विद्यापीठाची नाळ अधिक मजबूत होण्‍यास मदत होत आहे. उपक्रमांतर्गत माननीय कुलगुरू स्वत: मराठवाडयातील विविध गावात सहभागी होऊन शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करित आहेत.

विद्यापीठ विकसित वाण व तंत्रज्ञान केवळ मराठवाडा किंवा राज्‍यापुरते उपयुक्‍त नसुन देशातील अनेक राज्‍यातील शेतकरी बांधवाकरीता उपयुक्‍त आहे. उत्‍तर प्रदेशातील गोरखपुर येथील कृषि प्रदर्शनीत विद्यापीठ विकसित बैलचलित कृषि अवजारे शेतकरी बांधवाकरिता आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरली. उत्‍तर प्रदेशचे माननीय मुख्‍यमंत्री यांनीही याची दखल घेतली. विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत  संशोधन  प्रकल्प  पशुशक्‍तीचा  योग्य  वापर  योजना  आणि  राणी  सावरगांव  येथील  श्री छत्रपती  शिवाजी  महाराज  गोशाळा  यांचे  संयुक्त  विद्यामाने  राणीसावरगांव  (तागंगाखेड जिपरभणीयेथे  विद्यापीठ विकसित बैलचलित  अवजारांचा समावेश  असलेले  भाडेतत्वावर  कृषि  अवजारे  सेवा  केंद्राचे ( कस्टम  हायरिंग  सेंटर स्‍थापन करण्‍यात आले असुन याचा लाभ परिसरातील शेतकरी बांधव घेत आहेत.

विद्यापीठाच्‍या वाणांचा भारताच्‍या राजपत्रात समावेश

केंद्रीय बियाणे अधिनियम१९६६ नुसार भारत सरकारने केंद्रीय बियाणे समितीच्‍या शिफारसीनुसार वनामकृवि विकसित करडई पिकांच्‍या पीबीएनएस १८४देशी कापसाच्‍या पीए ८३७, खरीप ज्‍वारीच्‍या परभणी शक्‍ती, तुरीचा वाण बीडीएन-२०१३-२ (रेणुका), सोयाबीनचे एमएयुएस-७२५ आणि करडई पिकाचे पीबीएनएस-१५४ (परभणी सुवर्णाया वाणांचा समावेश केला आहे. यामुळे या वाणांचा प्रचार  प्रसार मोठया प्रमाणावर होण्‍यास मदत होणार आहे.

दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित सोयाबीन वाण एमएयुएस-७३१ सह ४२ विविध तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता प्राप्‍त झाली. तर राहुरी ये‍थील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठात आयोजित संयुक्‍त कृषि संशोधन आणि विकास बैठकीत विद्यापीठ विकसित सहा वाण, ३ तीन कृषी औजारे सह ३६ विविध तंत्रज्ञान शिफारशींना मान्‍यता प्राप्‍त झाली आहे.

अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयात नवी दिल्‍ली येथील केंद्रीय अन्‍न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्‍या प्रधानमंत्री सुक्ष्‍म अन्‍न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत सामाईक उष्मायन केंद्र (कॉमन इन्‍क्‍युबेशन सेंटरउभारणीचे काम अंतिम टप्‍पात आहे, यामुळे अन्‍न प्रक्रिया उद्योजक शेतकरी बांधवा लाभ होणार आहे.

प्रगतशील शेतकरीनन्‍मोषक कृषी उद्योजक, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ यांचा सन्‍मान - विद्यापीठाच्‍या वतीने आयोजित विविध पातळीवर शेतकरी, कृषि उद्योजक, कृषि शास्‍त्रज्ञ यांना सन्‍माननीत करण्‍यात येऊन त्‍यांना प्रोत्‍साहन देण्‍यात येत आहे. कोणताही मेळावा व कार्यशाळा असो शेतकरी बांधव व महिला प्रतिनिधीस सन्‍मानाने व्‍यासपीठावर स्‍थान दिले पाहिजे, असा आग्रह माननीय कुलगुरू यांचा असतो.   

आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्ष

वर्ष २०२३ हे संयुक्‍त राष्‍ट्र संघटनेने आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्ष म्‍हणुन घोषित केले असुन विद्यापीठाने बाजरी व ज्‍वारी पिकांच्‍या अनेक चांगले वाण विकसित केले आहेत. यामुळे आंतरराष्‍ट्रीय भरड धान्‍य वर्षात विद्यापीठाची भुमिक महत्‍वाची आहे. आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने मानवी आहारात भरड धान्‍याचा वापर वाढीकरिता विद्यापीठ वर्षभर जनजागृती करिता विविध उपक्रम राबवित असुन भरड धान्‍य मुल्‍यवर्धनावर विद्यापीठ कार्य करीत आहे. यात ज्‍वारी व बाजरी पिकांच्‍या अनेक वाणाचा प्रसार व प्रचारावर भर देण्‍यात येत आहे. विद्यापीठाने विकसित केलेला देशातील ज्वारीचा पहिला जैवसंपृक्‍त वाण परभणी शक्ती आणि बाजरी पिकाचे एएचबी १२०० व एएचबी १२६९ ही जैवसंपृक्त वाणे शेतक-यांसाठी उपयुक्त ठरतील, या वाणात लोह व जस्ताचे प्रमाण इतर वाणांपेक्षा अधिक आहे. या माध्‍यमातुन महिलांतील रक्‍तक्षय, लोहाची कमतरता यावर मात करणे शक्‍य होऊ शकते.

सन्‍मान व पुरस्‍कार माध्‍यमातुन प्रोत्‍साहन  

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि नेहमीच विद्यार्थी, शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांंच्‍या चांगल्‍या कामाबाबत प्रात्‍साहित करतात. विद्यापीठातील संशोधन केंद्र, शास्‍त्रज्ञ व शेतकरी यांना आंतरराष्‍ट्रीय, राष्‍ट्रीय व राज्‍य पातळीवर सन्‍माननीत करण्‍यात आले. नुकतेचकृषि विद्यापीठास ग्रीन मेंटर्स संस्‍थेचा प्रतिष्ठित आंतरराष्‍ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्‍कार २०२३ जाहीर झाला असुन सदर पुरस्‍कार दिनांक १५ सप्‍टेंबर २०२३ रोजी न्‍युयॉर्क ये‍थे आयोजित ७ व्‍या एनवायसी ग्रीन स्कुल कॉन्‍फरन्‍समध्‍ये ७८ व्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशना प्रसंगी प्रदान केला जाणार आहे.

अमेरिकेतील फ्लोरिड विद्यापीठात मुख्‍यालय असलेल्‍या कृषी आणि जैवप्रणाली अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्‍य वैज्ञानिक संस्‍थेचे फेलो म्‍हणुन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची निवड झाली, जपान मधील क्‍योटो येथे आयोजित विसावी सीआयजीआर जागतिक परिषदेत त्‍यांना फेलो  म्‍हणु अकादमीच्‍या वतीने

सन्‍माननित करण्‍यात  आलेही विद्यापीठाकरिता अभिमानाची बाब आहे.  

विद्यापीठांतर्गत असलेल्‍या लातुर येथील गळीतधान्ये संशोधन केंद्राच्‍या अखिल भारतीय समन्वीत संशोधन (सूर्यफुल) प्रकल्प आणि औरंगाबाद येथील बाजरा संशोधन प्रकल्‍पास उत्‍कृष्‍ट संशोधन केंद्र पुरस्‍कार प्राप्‍त झाला आहे. विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रास सेंद्रीय शेती संशोधनातील पुढाकार व सेंद्रीय शेतीसाठी दिलेले प्रोत्साहन व योगदान याकरिता शासकीय संस्था या वर्गातुन दिला जाणारा जैविक इंडीया पुरस्कार -२०२२ प्राप्त झाला आहे.

वनामकृविचे शास्‍त्रज्ञ डॉ खिजर बेग व डॉ दिपक पाटील यांना उत्‍कृष्‍ट कृषी संशोधक पुरस्‍कारांने राज्‍य शासनाने सन्‍माननीत केले तर वसंतराव नाईक स्‍मृती प्रतिष्‍ठान पुसदच्‍या वतीने विद्यापीठातील सोयाबीन पैदासकार डॉ शिवाजी म्‍हेत्रे यांना उत्‍कृष्‍ट कृषी शास्‍त्रज्ञ पुरस्‍काराने सन्‍माननीत करण्‍यात आले. विद्यापीठस्‍तरावरील उत्‍कृष्‍ट महिला शास्‍त्रज्ञ म्‍हणुन कृषि अभियंता डॉ स्मिता सोळंकी यांना सन्‍माननीत करण्‍यात आले.

विद्यापीठाच्‍या वतीने कापुस लागवडीत नवीन तंत्रज्ञान विकसित केलेल्‍या मा श्री दादा लाड तसेच युवा प्रयोगशील शेतकरी श्री दत्‍तात्रय कदम यांना गौरविण्‍यात आले. हैद्राबाद येथील भारतीय तेलबीया संशोधन संस्‍थेच्‍या वतीने वनस्‍पती तेल याविषयावर आंतरराष्‍ट्रीय परिषदेत लातूर जिल्‍हयातील तेलबीया पिक उत्‍पादक शेतकरी मौजे मुरूड येथील श्री संजय नाडे आणि जवस उत्‍पादक शेतकरी मौजे चौर येथील श्री अशोक चिंते यांना पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले. तर भारतीय समन्वित कृषि हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍प निक्रा अंतर्गत  हवामान आधारीत कृषी सल्‍ला पत्रिकेनुसार आधुनिक पध्‍दतीने शेती तसेच फळबागेचे  व्‍यवस्‍थापन करत या तंत्रज्ञानाचा शेतक-यांमध्‍ये प्रसार केल्‍याबद्दल दामपुरी ता परभणी येथील प्रगतशील शेतकरी श्री अशोक सालगोडे यांना हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन संस्‍थेच्‍या सेंद्रल इन्स्टिटयुट ऑफ ड्रायलॅन्‍ड अॅग्रिकल्‍चर क्रीडा ३९ व्‍या स्‍थापना दिनानिमित्‍त उत्‍कृष्‍ट शेतकरी पुरस्‍कार देऊन सन्‍मानित करण्‍यात आले.

विद्यार्थ्‍यांच्‍या सर्वांगिन विकासाकरिता शिक्षणासोबतच कला व सांस्‍कृतिक कलागुणांना वाव देणे आवश्‍यक असुन त्‍यांना प्रोत्‍साहित करण्‍याची एकही संधी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि सोडत नाहीत. विद्यार्थ्‍यांच्‍या गुणांना वाव देण्‍याकरिता वेळोवेळी सांस्कृतिक व्‍यासपीठ उपलब्‍ध करून देण्‍यात येत आहेत. बंगलोर येथील जैन विद्यापीठात ३६ वा आंतर विद्यापीठ राष्‍ट्रीय युवा महोत्‍सव – जैन उत्‍सव २०२३ स्‍पर्धेत मेंदी कला प्रकारात लातुर कृषि महाविद्यालयाची विद्यार्थींनी सिध्‍दी देसाई हिने कांस्‍य पदक पटकावले. तर आयसीएआर अॅग्री युनीफेस्‍ट मध्‍ये फाईन ऑर्ट मध्‍ये चॅपियन ट्रॉफी प्राप्‍त केली. एकविसाव्‍या अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्‍पर्धेत व्‍हॉलीबॉल मध्‍ये विद्यापीठ संघाने सुवर्ण पदक प्राप्‍त केले. 

मुलभुत सोयी सुविधा बळकटकरण्‍याकरिता प्रयत्‍न

विद्यापीठातील गेस्‍ट हाऊस सुविधा, विद्यार्थी व विद्यार्थीनीनीं वसतीगृहाच्‍या चांगल्‍या सुविधा पुरविण्‍याकरिता माननीय कुलगुरू नेहमीच आग्रही असतात, सद्यस्थितीत या वसतीगृहाचे नुतनीकरणाचे काम युध्‍द पातळीवर सुरू आहे. केवळ परभणी मुख्‍यालयीच नव्‍हे तर गोळेगांव, लातुर, बदनापुर येथील वसतीगृहाचे नुतनीकरण चालु आहे. निवृत्‍त कर्मचा-यांचे निवृत्‍ती वेतनाचा प्रश्‍न त्‍यांनी तत्‍परतेने हाताळुन त्‍यांना त्‍यांचा हक्क मिळवुन दिला. विद्यापीठात विविध बांधकामाचा दर्जा राखण्‍याकरिता माननीय कुुलगुरू स्‍वत: जातीने लक्ष देतात.

संपुर्ण देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० राबविण्‍यास सुरूवात झाली असुन सदर धोरण कृषि विद्यापीठात प्रभावीपणे राबविण्‍याकरिता माननीय कुलगुरू यांच्‍या मार्गदर्शनाखाली विविध पातळीवर कार्य चालु आहे. यात ऑनलाईन शैक्षणिक व्‍यवस्थापन प्रणाली, अॅकाडेमिक बैंक ऑफ क्रेडिट, डि‍जीलॉकर, ब्‍लेंडेड लर्निन आदी उपक्रम सुरू करण्‍यात आले आहेत.

महाराष्‍ट्र शासनाने यावर्षी संशोधन प्रकल्‍पाकरिता २५ कोटीचे अनुदान दिले असुन सिल्‍लोड तालुक्‍यातील मौजे कोटनांद्रा व डोईफोडा येथे मका संशोधन केंद्र स्‍थापनेस मंजुरी दिली आहे. संशोधन क्षेत्रात शेतकरी बांधवाकरिता उपयुक्‍त संशोधन करणे हा प्रमुख उद्देश्‍य विद्यापीठाचा असुन बदलत्‍या हवामानानुसार संशोधनास गती देण्‍याचे कार्य माननीय कुलगुरू यांच्‍या नेतृत्‍वाखाली सुरू आहे. सद्यस्थितीत विद्यापीठात मनुष्‍यबळांचा विचार करता पन्‍नास टक्के पेक्षा जास्‍त पदे रिक्‍त असतांना विद्यापीठाचा दर्जा राष्‍ट्रीय पातळीवर उंचावण्‍याचे मोठे आव्‍हान विद्यापीठा समोर आहे. विद्यापीठाचे नामांकन उच्‍चांवण्‍याकरिता दर्जेदार संशोधनाची आवश्‍यकता असुन याकरिता देश पातळीवरील विविध संस्‍थेकडुन निधी प्राप्‍त करण्‍याकरिता यावर्षी मोठया प्रमाणात संशोधन प्रकल्‍प सादर करण्‍यात आले आहेत. आंतरराष्‍ट्रीय उच्‍च दर्जेचे संशोधनात्‍मक लेखांचे प्रमाण वाढीवर भर देण्‍यात येत आहे. 

येणा-या काळात माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वात परभणी कृषि विद्यापीठात आमुलाग्र बदल होऊन देशातील एक अग्रगण्‍य कृषि विद्यापीठ म्‍हणुन नावारूपाला येईल, हे निश्चित ।

डॉ प्रविण कापसेे, जनसंपर्क अधिकारी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी