Pages

Tuesday, August 22, 2023

मौजे आडगांव येथे पशुधन व्‍यवस्‍थापन शिबिर संपन्‍न, ४०० जनावरांचे करण्‍यात आले लसीकरण

लम्पीग्रस्त जनावरांचे लसीकरण व विलगीकरण महत्वाचे  …….. पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश सावणे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने  कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती (RIFS)” या योजनेअंतर्गत दिनांक १८ ऑगस्‍ट रोजी मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे "पशुधन व्यवस्थापन : लम्पी जागृती व लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री बालासाहेब ढोले, हे होते तर तांत्रिक मार्गदर्शक म्हणून पशुधन विकास अधिकारी (वि.) डॉ. प्रकाश सावणे, अ.भा.स. कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ (कृषिविद्या) डॉ. आनंद गोरे, डॉ. शिवाली पाटील, डॉ. अनिल डांगे, उपसरपंच श्री. रमाकांत पौडशेट्टे, श्री. उमाकांतराव ब्याळे, पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी व गावातील शेतकरी उपस्थित होते.

मार्गदर्शनात डॉ. प्रकाश सावणे म्‍हणाले की, सद्यस्थितीत लम्पी रोगाचा वाढता प्रभाव पाहता पशुपालकांनी त्यांच्याकडील जनावरांचे लम्पी लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पी रोगाकरीता जनावरांना मोफत व प्रगतीपथावर लसीकरण करण्यात येत आहे. लम्पीग्रस्त जनावरांचे विलगीकरणही तेवढेच महत्वाचे आहे कारण लम्पी हा रोग संसर्गजन्य असुन हा रोग वेगाने पसरण्याची शक्यता अधिक वाढते. लस पुर्णपणे शरीरात भिनन्याकरीता २१ दिवसाचा काळ लागतो. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी वेळेत लसिकरण करणे आवश्यक आहे.

डॉ. आनंद गोरे यांनी पावसाच्या खंडकाळामध्ये पिकांसाठी घ्यावयाची काळजी यावर माहीती देतांना पोटॅशियम नायट्रेट १०० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्‍याचा सल्‍ला दिला तसेच उपलब्धतेनुसार आच्छादनाचा वापर करावा व कापूस व तुरीमध्ये ते ओळीनंतर आणि सोयाबीनमध्ये प्रत्येकी ओळीनंतर आंतरमशागतेची कामे झाल्यानंतर बळीराम नांगराच्या सहाय्याने जलसंधारण सरी पाडून घ्याव्यात असे सांगितले.

शिबीरा दरम्यान पशुसंवर्धन विभागाअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहीती उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाअंतर्गत ४०० जनावरांचे लसिकरण करण्यात आले व १४ लम्पीग्रस्त जनावरांवर प्रतिजैविके व रोगप्रतिकारात्मक शक्ती वाढविणाऱ्या लसी देवून उपचार करण्यात आले. याप्रसंगी लसीकरण कार्यक्रमास व तांत्रिक चर्चासत्रास मोठ्या संख्येने शेतकरी व पशुपालक उपस्थित होते. शिबिराचे आयोजन संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. आनंद गोरे, श्री. मोहन गवळी, श्री. सुमित सुर्यवंशी व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.