Pages

Thursday, December 21, 2023

मातीचे आरोग्‍य अबाधित राखण्‍यासाठी विशेष लक्ष देण्‍याची गरज ....... डॉ एस के चौधरी

दोन दिवसीय मृदाशास्‍त्रज्ञाच्‍या राज्‍यस्‍तरीय परिसंवादाचे उदघाटन प्रसंगी प्रतिपादन 

महाराष्‍ट्र ठिंबक सिंचन, तुषार सिंचन व सुक्ष्‍म सिंचन पध्‍दतीचा शेतकरी बांधव मोठा प्रमाणात वापर करित आहेत. रासा‍यनिक खतांचा वापर मर्यादित करण्‍याकरिता पर्याय दयावा लागेल. दरवर्षी विविध कारणांमुळे जमिनीची धूप होत असल्‍याने मातीचा -हास होत आहे. मातीचे आरोग्‍य अबाधित राखण्‍यासाठी विशेष लक्ष देण्‍याची गरज आहे. बदलत्‍या हवामान परिस्थितीत माती व पाणी यांच्‍या स्‍वरूपात होणारे बदल लक्षात घेऊन संशोधनाला प्राधान्‍य द्यावे लागेल. कृ‍षीच्‍या विद्यार्थ्‍यांतुन चांगले शास्‍त्रज्ञ घडले पाहिजेत, त्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न करण्‍याची गरज , असे प्रतिपादन नवी दिल्‍ली येथील नैसर्गिक स्‍त्रोत व्‍यवस्‍थापन संस्‍थेचे उपमहानिर्देशक डॉ एस के चौधरी यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भारतीय मृद विज्ञान संस्था, शाखा परभणीच्या वतीने २१ व २२ डिसेंबर रोजी अन्‍न सुरक्षा आणि कृषी शाश्‍वततेसाठी मातीचे आरोग्‍य पुर्नेजीवन यावरील मृदाशास्त्रज्ञांच्या राज्यस्तरीय परिसंवादाच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि होते, प्रमुख पाहूणे कृषि शास्त्रज्ञ भरती मंडळाचे सदस्‍य डॉ. बी. एस. व्दिवेदी, हैद्राबाद येथील इक्रीसॅटच्‍या जागतिक संशोधन कार्यक्रमाचे संचालक डॉ. एम. एल. जाट हे उपस्थित होते तर व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ सय्यद ईस्‍माईल, आयोजक विभाग प्रमुख डॉ प्रविण वैद्य, सचिव डॉ अनिल धमक आदींची उपस्थिती होती. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, नैसर्गिक साधनसंपत्‍ती पाणी, माती, ऊर्जा यांचे संवर्धन करण्‍याची जबाबदारी प्रत्‍येकाची आहे. बदलत्‍या हवामानामुळे शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. शेतकरी बांधवाना शेतीत जोखिम व्‍यवस्‍थापन शिकण्‍याची आवश्‍यकता आहे. 

डॉ एम एल जाट यांनी जगात शांतता व अखंडता राखण्‍याकरिता मातीचे आरोग्‍य टिकविणे आवश्‍यक असल्‍याचे म्‍हणाले. तर डॉ बी एस व्दिवेदी यांनी धोरणकर्ते, उद्योजक, शासन, विद्यापीठ आणि शेतकरी यांनी एकत्रितपणे मृदा आरोग्‍य जपण्‍याकरिता काम करण्‍याची गरज असल्‍याचे म्‍हणाले.

कार्यक्रमात अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे मृदा शास्‍त्रज्ञ डॉ एन एम कोंडे यांना भारतीय मृदा विज्ञान संस्‍थेतर्फे मृदगंध पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी सिताराम देशमुख, प्रताप काळे, प्रकाश स्‍वामी, मिलिंद दामले आणि सेवानिवृत्‍त मृदाशास्‍त्रज्ञ यांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ प्रविण वैद्य यांनी केले. सुत्रसंचालन डॉ पपिता गौरखेडे यांनी केले तर आभार डॉ अनिल धमक यांनी मानले.

परिसंवादात महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठातील तसेच भारतीय कृषि अनुसंधान संस्थातील १४७ शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला असुन अन्न सुरक्षा आणि कृषि शाश्वतेसाठी मातीचे आरोग्य पुनरर्ज्जीवित करणे या विषयावर परिसंवादात सहभागी मृदाशास्‍त्रज्ञ विविध सत्रात विचारमंथन करण्‍यात आले.