Pages

Wednesday, December 27, 2023

हवामान अनूकुल स्मार्ट शेती तंत्रज्ञान विकसित करण्‍याकरिता विद्यापीठ प्रयत्‍नशील ..... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

नाहेप अंतर्गत स्मार्ट शेती याविषयावर दोन दिवसीय आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन, अमेरिकेतील  शास्त्रज्ञ करणार मार्गदर्शन  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्‍पाच्‍या वतीने अन्न सुरक्षा आणि शाश्‍वतता करिता हवामान अनूकुल स्मार्ट शेतीयाविषयावर दोन दिवसीय आंतरराष्‍ट्रीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक २६ आणि २७ डिसेंबर दरम्‍यान करण्‍यात आले असुन दिनांक २६ डिसेंबर रोजी कार्यशाळेचे उदघाटन झाले. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुणे अमेरिकेतील नेब्रासका विद्यापीठातील जैवप्रणाली व कृषी अभियांत्रिकी विभागाचे शास्‍त्रज्ञ डॉ संतोष पिटला, विशेष अतिथी म्हणून मिसिसिपी राज्य विद्यापीठ (अमेरिका) कृषी हवामानशास्त्र, वनस्पती आणि माती विज्ञान विभागाचे तज्ञ डॉ. प्रकाश कुमार झा हे होते. व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, कार्यशाळा आयो‍जक सहयोगी अधिष्‍ठाता डॉ भगवान आसेवार, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, सहयोगी अधिष्‍ठाता डॉ सय्यद ईस्‍माइल आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले, विकसित राष्‍ट्रात डि‍जिटल शेती तंत्रज्ञानाचा वापर मोठा प्रमाणात आहे, या डिजिटल तंत्रज्ञानाचा मराठवाडा व राज्‍यातील शेतकरी बांधवा व्‍हावा, याकरिता परभणी कृषी विद्यापीठ प्रयत्‍नशील आहे. विद्यापीठाने अनेक आतंरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय संस्‍थेशी सामंजस्‍य करार केले असुन जास्‍तीत जास्‍त विद्यापीठ प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व आचार्य संशोधक विद्यार्थ्‍यांना देश – विदेशात प्रशिक्षणास पाठविले आहे. आजपर्यंत ५५ पदव्‍युत्‍तर विद्यार्थी व २५ प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञांना दहा पेक्षा जास्‍त देशात पाठविण्‍यात आले असुन देशातील अग्रगण्‍य संस्‍था आयआयटि मुंबई, आयआयटी खरगपुर यासारख्‍या संस्‍थेत तीनशे पेक्षा जास्‍त विद्यार्थ्‍यांना प्रशिक्षीत करण्‍यात आले. विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांनी बदलत्या हवामान अनुकुल स्मार्ट शेती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, आयओटी आदींचे ज्ञान अवगत करून शेतकरी बांधवाच्‍या समस्येचे व्यवस्थापन करण्यासाठी संशोधन कार्य करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

अमेरिकेतील शास्‍त्रज्ञ डॉ संतोष पिटला म्‍हणाले की, अमेरिकेत हवामान स्मार्ट शेतीसाठी तंत्रज्ञानाची साधने म्हणून रोबोटिक्सचा वापर शेतीत विविध कार्यासाठी केला जातो. भारतात ही शेती क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठा वापर भविष्‍यात होणार असुन देशातील शेतकरी बांधवांना उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञान वापराबाबत विद्यापीठातील शास्‍त्रज्ञ व आचार्य पदवीचे संशोधकांनी पुढाकार घ्‍यावा. तर तज्ञ डॉ. प्रकाश कुमार झा यांनी पदवीसाठी आणि पदव्‍युत्‍तर शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशात विविध पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमात प्रवेशाच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षण संचालक डॉ उदय खोडके यांनी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व आचार्य पदवीचे विद्यार्थ्‍यांनी हवामान आधारित नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्याच्या संशोधन  कार्य मध्ये करावे असे सुचवले.

प्रास्‍ताविकात कार्यशाळेचे आयोजक सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. भगवान असेवार कार्यशाळेबा‍बत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनीता पवार यांनी केले आभार इंजी.एस एन पवार यांनी मानले. सदरील प्रशिक्षणासाठी ८० प्राध्यापक, कर्मचारी तसेच विद्यापीठातील शास्त्रज्ञ, पदव्युत्तर, आचार्य ‍विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना तसेच कृषी अधिका-यांना बदलत्या हवामान आणि अन्न सुरक्षेसाठी संबंधीत नवीन तंत्र विकसित करणे आणि आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाबाबत अवगत करणे हा आहे. दोन दिवसीय कार्यशाळेसाठी अमेरिकेतील नेब्रासका विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ डॉ संतोष पिटला, मिसिसिपी राज्‍य विद्यापीठातील डॉ. प्रकाश कुमार झा, कान्‍सास राज्‍य विद्यापीठातील डॉ अजय शारदा, मुबई येथील सिफाचे संचालक डॉ सय्यद इस्माईल आदींचे मार्गदर्शन होणार आहे.

कार्यशाळेचे आयोजन सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. भगवान असेवार, नाहेप मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे, डॉ. विशाल इंगळे, डॉ.सुनीता पवार, इंजी.एस एन पवार, डॉ.दयानंद टेकाळे यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाहेप प्रकल्पातील कर्मचारी इंजी. शिवानंद शिवपुजे, इंजी. अपुर्वा देशमुख , डॉ प्रतीक पोदार,इंजी. पौर्णिमा राठोड, इंजी तेजस्विनी कुमावत, इंजी. गोपाळ रनेर, इंजी. तनजीम खान, इंजी विशाल गायकवाड ,इंजि अक्षय गायकवाड, श्री. रामदास शिंपले, श्री. नितीन शहाणे, सौ नमिता वाडीकर, मुक्ता शिंदे, श्री. गंगाधर जाधव, श्री. मारोती रनेर, श्री. जगदीश माने आदींनी परिश्रम घेतले.