Pages

Thursday, December 7, 2023

परळी येथील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात वनामकृवि अंतर्गत दोन नुतन महाविद्यालये आणि एक संशोधन उपकेंद्राचे लोकार्पण

बीड जिल्ह्यातील परळी येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे दिनांक ५ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे माननीय मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार, कृषी मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे, माजी आमदार मा पंकजाताई मुंडे आदीसह अनेक मान्‍यवर नेते उपस्थित होते. कार्यक्रमात बीड जिल्‍हयातील अनेक प्रस्‍तावित योजनांचे भुमिपूजन आणि लोकार्पण मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पार पडलं. यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत जिरेवाडी (ता. परळी) येथील कृषि महाविद्यालय आणि कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन महाविद्यालय तसेच धर्मापुरी (ता. परळी) येथील सोयाबीन संशोधन, प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र याचे लोकार्पण करण्‍यात आले.

नुकतेच महाराष्‍ट्र शासनाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत चार नवीन शासकीय महाविद्यालय व एक संशोधन उपकेंद्रास मान्‍यता दिली. यात सोयगांव (छत्रपती संभाजीनगर) येथे शासकीय कृषि महाविद्यालय, मौजे जिरेवाडी (ता परळी जि बीड) येथे शासकीय कृषि महाविद्यालय आणि कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन महाविद्यालय, नांदेड येथे कृषि महाविद्यालय तसेच धर्मापुरी (ता. परळी) येथे सोयाबीन संशोधन, प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र स्‍थापनेस महाराष्‍ट्र शासनाने मंजुरी दिली आहे.


विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाच्‍या वतीने सदर महाविद्यालये आणि संशोधन उपकेंद्राचे प्रस्‍ताव सादर करण्‍यात आले होते. राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री धंनजय मुंढे यांच्‍या पाठबळामुळे सदर प्रस्‍तावास महाराष्‍ट्र शासनाची मंजुरी प्राप्‍त झाली. याबाबत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी राज्‍याचे माननीय मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार, कृषी मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे आदींचे आभार व्‍यक्‍त केले.