Pages

Thursday, January 11, 2024

"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

मौजे सातेफळ व मौजे खंदारबन (ता.वसमत जि.हिंगोली) येथे राबविण्‍यात आला उपक्रम

संपुर्ण मराठवाडा विभागात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या संकल्‍पनेतुन विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रम दिनांक १ सप्‍टेंबर २०२२ पासुन राबविण्‍यात येत आहे, या उपक्रमात संपुर्ण मराठवाडयातील आठही जिल्‍हयात दर महिन्‍याच्‍या दुस-या बुधवारी शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापक प्रत्‍यक्ष शेतकरी बांधवाच्‍या शेतात जाऊन त्‍यांच्‍या समस्‍या जाणुन घेऊन मार्गदर्शन करतात. यात विद्यापीठातील सर्व कृषी विज्ञान केंद्रेे, महाविद्यालयेे, संशोधन केंद्रे, विभागीय विस्‍तार शिक्षण केंद्रे येथील संशोधक व प्राध्‍यापक सहभाग राहतो. याचा भाग म्‍हणुन दिनांक १० जानेवारी रोजी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्‍या वतीने दिनांक १० जानेवारी रोजी "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" उपक्रम अंतर्गत विद्यापीठ शास्त्रज्ञांनी मौजे सातेफळ येथे श्री. रंगनाथ स्वामी व मौजे खंदारबन ता.वसमत जि.हिंगोली येथे श्री. सदाशिव पाटील यांच्या शेतावर भेटी देऊन उपस्थित शेतकरी बांवधाना विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.खंदारे, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ.जी.डी.गडदे, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, उद्यान तज्ञ डॉ.बी.एम.कलालबंडी, किटकशास्‍त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, तालुका कृषी अधिकारी श्री सुनील भिसे, श्री.मधुकर मांडगे आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. धर्मराज गोखले म्‍हणाले की, पेरू व करवंद या पिकाची फक्त लागवड न करता योग्य भाव मिळण्यासाठी या फळपिकांची प्रक्रिया करून विक्री करावी. विद्यापीठामार्फत करवंदावरील प्रक्रियेविषयी शेतकऱ्यांना कुठलीही समस्या आल्यास अथवा प्रक्रियेविषयी प्रशिक्षण हवे असल्यास त्यांनी  विद्यापीठाशी संपर्क करण्‍याचे आवाहन केले.

 डॉ.जी.डी.गडदे यांनी माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाची माहिती देतांना म्‍हणाले की, सदरील कार्यक्रम महाराष्ट्र शासनातर्फे मागील वर्षी राबविण्यात आला होता, विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांच्या सूचनेनुसार व संचालक विस्तार शिक्षण डॉ.डी.एन.गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालय, संशोधन केंद्र व प्रत्येक कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन राबविण्यात येतो.

डॉ. व्ही. एस. खंदारे यांनी करवंदावर तसेच इतर फळांवर करावयाच्या प्रक्रियेविषयी आणि डॉ. बी. एम. कलालबंडी यांनी करवंद लागवड याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.डी.डी.पटाईत यांनी केले. यावेळी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी तूर, हळद, कांदा, केळी, करवंद व पेरू अशा विविध पिकांची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना योग्य उपाययोजना सुचविल्या. या उपक्रमांतर्गत ज्ञानदिप हायटेक नर्सरी, वसमत यांच्यामार्फत शेतकऱ्यांसाठी करवंद लागवड या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमास परिसरातील साधारणत:  ५० शेतकरी उपस्थिती लाभली.