Pages

Wednesday, March 6, 2024

वनामकृवि विकसित जैविक निविष्‍ठा उपलब्‍ध होणार मराठवाडयातील सहा जिल्‍हयात

वनामकृविस राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून जैविक निविष्ठा उत्पादन प्रकल्पास मंजुरी

किफायतशीर शेती उद्योगात जैविक निविष्ठा महत्त्वाच्या..... कुलगुरू डॉ.  इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी द्वारा विकसित विविध पिकाकरिता उपयुक्त जैविक निविष्ठा उत्पादने तयार केली जातात. विद्यापीठ उत्पादित जैविक निविष्ठा मराठवाडा तसेच महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी मागणी असते. यांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना परभणी येथे यावे लागत असे. यासाठी शेतकऱ्यांना येण्या-जाण्याचा अतिरिक्त खर्च सहन सहन करून वेगळा वेळ द्यावा लागे. याबाबीं लक्षात घेऊन माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या संकल्‍पनेतुन सदरील जैविक उत्पादने शेतकऱ्यांना शासकीय दरात मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विद्यापीठांतर्गत असलेले कृषि विज्ञान केंद्रे व संशोधन योजनेद्वारे उत्पादित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनास "मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जैविक कीटकनाशके, जैविक बुरशीनाशके, जैविक खते आणि जैविक घटक यांचे उत्पादन योजना" बाबत चा प्रस्ताव दाखल केला होता, त्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली असुन आवश्यक असलेला निधी रुपये ७८४.६१५ (अक्षरी रुपये सात कोटी, चौ-याऐंशी  लाख एकसष्ट हजार पाचशे) विद्यापीठास दिला. याबाबत माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले असुन या प्रकल्‍पामुळे शाश्वत पीक उत्पादनासाठी महत्त्वाचे घटक असलेले द्रवरूप जिवाणू घटक (NPK) यामध्ये जैविक बुरशीनाशके, जैविक कीटकनाशके, परोपजीवी किडी कार्ड (ट्रायको कार्ड्स), जैविक खते तसेच  बायोमिक्स विद्यापीठ अंतर्गत मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड (छत्रपती संभाजी नगर), कृषि विज्ञान केंद्र, (बदनापूर, जालना), कृषि विज्ञान केंद्र, (खामगाव, बीड), कृषि विज्ञान केंद्र (तुळजापूर, धाराशीव) व कापूस संशोधन केंद्र (नांदेड) येथे उत्पादित करण्यात येतील. सदर जैविक निविष्ठांच्‍या वापरामुळे शेतकऱ्यांचे रासायनिक घटकावरील खर्च कमी होऊन पीक लागवड खर्चामध्ये बचत होईल, पीक उत्पादनात वाढ होण्‍यास मदत होऊन किफायतशीर शेती उद्योग होईल, अशी आशा मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केली.

सदर निविष्‍ठांचा भाजीपाला पिके, फळपिके, तृणधान्य, गळीत धान्य, कापूस, ऊस यासारख्या पिकासाठी या मिश्रणाचा उपयोग होतो तसेच या जैविक घटकांद्वारे पिकांची रोपाव्यवस्थेतील मर, आले व हळदीवरील कंदकुज व पानावरील करपा या रोग व्‍यवस्‍थापन तसेच बियाणाद्वारे उत्पन्न होणाऱ्या विविध बुरशीजन्य रोगाचा प्रतिबंध होण्यास आणि झाडांची व रोपांची वाढ चांगल्या प्रकारे होऊन झाड सशक्त बनण्यासाठी प्रभावी उपयोग होतो.