Pages

Saturday, April 13, 2024

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील वर्षा मुलींच्या वसतिगृहात सलग अठरा तास अभ्यासिकेचे आयोजन

 ज्ञानार्जनासाठी डॉ. आंबेडकर यांच्या  कठोर परिश्रमांचे अनुकरण करणे आवश्यक!... डॉ. उदय खोडके


परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने वर्षा मुलींच्या वसतिगृहामध्ये सलग अठरा तास अभ्यासिकेचे आयोजन दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी ६.०० ते रात्री १२.०० दरम्यान करण्यात आले. या अभ्यासिकेचे उद्घाटन संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यांना विनम्र अभिवादन करून करण्यात आले. यावेळी डॉ. उदय खोडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कठोर परिश्रमातून जागतिक दर्जाचे शिक्षण  प्राप्त केले होते. त्यांनी विकासाच्या सर्व क्षेत्रात अतुलनिय कार्य केले. त्यांच्या कठोर परिश्रमाचे अनुकरण आणि पालन  करत विद्यार्थी आज ज्या अठरा तास अभ्यास उपक्रमात सहभागी झाले यामध्ये त्यांनी सातत्य ठेवावे असे आवाहन केले.अशा कठोर परिश्रमातून सर्वांना निश्चितच यश  मिळेल असे विचार त्यांनी  याप्रसंगी मांडले.याबरोबरच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या थोर कार्यास उजाळा दिला.
तद्नंतर महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी प्रास्ताविकात सलग अठरा तास अभ्यासिकेच्या आयोजनाचे या महाविद्यालयाचे हे १४ वे वर्ष  असल्याचे त्यांनी नमुद केले. आज विद्यार्थ्यांचे पुस्तक वाचन कमी झालेले असून त्यांनी मोबाईल फोनवर अथवा सामाजिक माध्यमावर अधिक वेळ व्यतीत न करता आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यावर भर द्यावा . आपल्याला विकसित भारत घडवण्यासाठी भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगिकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी विशद केले.
या उपक्रमाचे नियोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगी प्राध्यापक तथा वसतिगृह प्रमुख डॉ.नीता गायकवाड यांनी केले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अनुश्री आर के. यांनी केले तर आभार डॉ. नीता गायकवाड यांनी मानले. या उपक्रमात विद्यार्थीनीनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. उद्घाटन कार्यक्रमास डॉ. शंकर पुरी, डॉ. विद्यानंद मनवर आणि श्रीमती रेखा लाड यांची उपस्थिती होती.