Pages

Thursday, April 4, 2024

वनामाकृवि अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र तुळजापूर येथे शेतकरी कुटुंब आरोग्य जनजागृती कार्यक्रम संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषि विज्ञान केंद्र तुळजापूरच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील सर्व महिलांच्या आरोग्यात सुधारणा करून जिल्ह्यास “महिला स्वस्थ जिल्हा बनऊ” असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर, एकात्मिक बाल विकास योजना तुळजापूर, संपदा ट्रस्ट तुळजापूर आणि ग्रामऊर्जा फाउंडेशन धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी कुटुंब आरोग्य जनजागृती कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर,  सहयोगी अधिष्ठाता डॉ. मोहन पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी श्री किशोर गोरे, ज्येष्ठ अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ. इंदूमती राठोड, संपदा ट्रस्टचे प्रकल्प समन्वयक श्री विकास गोफणे, ग्राम ऊर्जा फाउंडेशन धाराशिव चे कार्यकारी संचालक दादासाहेब गायकवाड, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे कार्यक्रम समन्वयक इंजि. सचिन सूर्यवंशी आदींची मंचावर उपस्थित होती.

माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, महिला करुणा, दया, प्रेमाची प्रतिकृती असून तिच्यावर सर्व कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी असते. म्हणून महिला स्वतः आरोग्य संपन्न, स्वस्थ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरात सुख, शांती आणि भरभराट हवे असेल त्या घरी महिलांचा मान-सन्मान आणि आदर असणे आवश्यक आहे. आता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विविध पदवी,पदव्युत्तर तथा आचार्य शिक्षणांमध्ये मुलींचे प्रमाण सध्या जवळजवळ ५० % पर्यंत पोहोचले असून हा एक सकारात्मक बदल आहे. तसेच विद्यापीठाने महिलांना पौष्टिक खाद्य पुरवण्याकरिता ज्वारी आणि बाजरीच्या लोह-झिंकयुक्त निरनिराळ्या वाण विकसित केले आहेत. भविष्यात कृषि विज्ञान केंद्राद्वारे जिल्ह्यातील महिलांकरिता एक आरोग्य पत्रिका  बनवून त्यामध्ये वैयक्तिक महिलांच्या आरोग्याची मासिक, त्रैमासिक वर्गीकरण अहवाल करण्यात येईल असे नमूद केले.

        यावेळी संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोखले म्हणाले की महाराष्ट्रात महिला सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सतत काम करत राहतात. सारखे कामात गुंतून राहिल्यामुळे त्यांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून त्याकरिता महिलांना आरोग्य संबंधित प्रशिक्षण देणे खूपच महत्त्वाचे आहे. महिलांमधील हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे आरोग्याविषयी विविध समस्या उत्पन्न होत असून वेळीच त्यावर उपचार न केल्यास महिलांना भविष्यात इतर आजारांना सामोरे जावे लागते. त्याकरिता महिलांनी पौष्टिक, सकस व ताजा आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

 कार्यक्रमामध्ये डॉ. मोहन पाटील, श्री. किशोर गोरे यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक इंजि. सचिन सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीमती वर्षा मरवाळीकर यांनी केले आणि आभार डॉ.विजयकुमार जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते करिता डॉ. भगवान अरबाड, डॉ. दर्शना भुजबळ, डॉ. भैयासाहेब गायकवाड,  श्रीमती कसबे, डॉ. हरवाडीकर, जगदेव हिवराळे, शिवराज रुपनर आदींनी परिश्रम घेतले.