Pages

Tuesday, May 14, 2024

वनामकृवित खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनीचे आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शनीचे आयोजन शनिवार दिनांक १८ मे रोजी सकाळी ११.०० वाजता कृषि महाविद्यालय परभणी येथील सभागृहात करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे राहणार असुन प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण विभागाचे सचिव माननीय श्री सुनील चव्हाण (भाप्रसे) हे उपस्थित राहणार आहेत तर अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठचे माननीय कुलगुरू डॉ. शरद गडाख, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक माननीय श्री. रावसाहेब भागडे (भाप्रसे), परभणीचे जिल्हाधिकारी मा. श्री. रघुनाथ गावडे (भाप्रसे) आणि मुंबई येथील साविदा कृषि कं. प्रा. लि.चे अध्यक्ष मा. श्री. विवेक दामले हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि वनामकृविचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, बिजोत्पादन संचालक डॉ. देवराव देवसरकर, पुणे येथील कृषि आयुक्तालयातील आत्माचे संचालक श्री. दशरथ तांभाळे, विभागीय कृषि सहसंचालक श्री. साहेबराव दिवेकर, डॉ. तुकाराम मोटे, कृषि परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर आणि फरीदाबाद (हरियाणा) येथील वॉव गो.ग्रीन.एलएलपीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शंकर गोयंका आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
परिसंवादात विद्यापीठ शास्त्रज्ञ विविध खरीप पीक लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन, कापुस, ज्वार, बाजरी, कडधान्य लागवड, भरड धान्याचे महत्व, किड – रोग व्यवस्थारपन आदी विषयावर मार्गदर्शन करणार असुन शेतकरी बांधवाच्या व कृषि विषयक विविध शंकाचे निरासरण करणार आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ शास्त्रज्ञ लिखित विविध घडीपत्रिका, पुस्तिका, शेतीभाती मासिकांचे विमोचन करण्या‍त येणार आहे. यासह विद्यापीठ विकसित तंत्रज्ञान तसेच कंपन्याच्या आणि बचतगटाचे साहित्याचे कृषि प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीने होणार आहे. विक्रीसाठी उपलब्ध बियाणे व त्याचे दर पुढील प्रमाणे आहेत.
तुरीचे बीडीएन-७१६ (लाल), बीडीएन-७११ (पांढरी), ६ किलोच्या बॅगमध्ये तर बीडीएन-१३-४१ गोदावरी (पांढरी) हे वाण ६ आणि २ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून प्रती किलो दर रु २५०/- आहे या बियाणाच्या उपलब्धता बीडीएन-७१६ – (८०० बॅग), बीडीएन-७११ – (३६६ बॅग), बीडीएन-१३-४१ गोदावरी ६ किलोच्या ७०० बॅग व २ किलोच्या ३०० बॅग अशी आहे.
सोयाबीनचे एमएयुएस-१६२, एमएयुएस-१५८, एमएयुएस-७१, एमएयुएस-६१२ हे वाण २६ किलोच्या बॅगमध्ये तर एमएयुएस- ७२५ हा वाण ५ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असुन सर्व वाणाचा प्रती किलो दर हा रु १००/- असुन याची उपलब्धता एमएयुएस-१६२ (१००० बॅग), एमएयुएस-१५८(१५०० बॅग), एमएयुएस-७१ (१७५ बॅग), एमएयुएस-६१२ (१००० बॅग) आणि एमएयुएस- ७२५ (१६०० बॅग) अशी आहे.
ज्वारीचा परभणी शक्ती हा वाण ४ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून या वाणाचा प्रती किलो दर रु १२५/- आहे व या वाणाच्या ३०० बॅगची उपलब्धता आहे. तसेच मुगाचा बीएम -२००३-२ हा वाण ६ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून या वाणाचा प्रती किलो दर रु २२०/- आहे व या वाणाच्या २१६ बॅगची उपलब्धता आहे. बियाणे खरेदीसाठी रोख रक्कम स्विकारण्यात येईल तसेच एका व्यक्तीस एक बियाणे बॅग याप्रमाणे विक्री करण्यात येईल.
सदर परिसंवादाचे थेट प्रक्षेपण https://www.youtube.com/@VNMKV विद्यापीठ युटयुब चॅनेलवर करण्यात येणार आहे. तरी परिसंवादाचा लाभ जास्तीत जास्ते शेतकरी बांधवांनी घ्यावा, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री अनिल गवळी यांनी केले आहे.