Pages

Tuesday, May 21, 2024

वनामकृवि विकसित बियाणे खरेदीस शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

  शेतकऱ्यांना बियाणे उपलब्धतेसाठी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि सतत प्रयत्नशील


खरीप हंगामाच्या नियोजनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे बियाणे खरेदी. यावर्षी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ विकसित सोयाबीन, तूर, ज्वार आणि मुगाचे बियाणे खरेदी करण्यासाठी प्रथम पसंती दिली आणि दिनांक १८ मे रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप पीक परिसंवाद आणि कृषि प्रदर्शनाच्या दिवशी बियाणे विक्रीस सुरुवात होणार असल्यामुळे कार्यक्रमामध्ये मुख्यतः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यासह महाराष्ट्रातून जवळपास ५००० शेतकऱ्यांनी सहभागी नोंदविला आणि यापैकी १८०० शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. विद्यापीठाद्वारे यावर्षी प्रथमच ११७८ क्विंटल खरीप पिकांचे सत्‍यतादर्शक बियाणे (७९५७ बॅग) उपलब्ध करून देण्यात आलेले होते. विद्यापीठाची परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्राची जमीन पेरणी योग्य केल्यामुळे बीजोत्‍पादनात वाढ झाली.  कृषि विद्यापीठाने मूलभूत आणि पैदासकार बियाणे उत्पादित करून, त्याचा पुरवठा महाबीज, राष्ट्रीय बीज निगम, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांना करावा. जेणेकरून या कंपन्या मूलभूत आणि पैदासकार बियाण्यांपासून पायाभूत व प्रमाणित बियाणे उत्पादित करून त्याचा शेतकऱ्यांना पुरवठा करतील, या पद्धतीने विद्यापीठाची बियाणे विक्री केली जाते. यादृष्टीने विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे शेतकरी देवो भव या भावनेने व शेतकऱ्यांचे हित प्रथम पाहून कार्यपद्धती अवलंबून असल्यामुळे विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाद्वारे अधिकाधिक बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत.
याकरिता विद्यापीठाने २६२ महाबीज सह इतर बियाणे कंपन्या आणि शेतकरी उत्पादक कंपन्यासोबत सामंजस्य करार केलेले आहेत. विद्यापीठाने आजपर्यंत सोयाबीनचे १३ वाण विकसित केलेले असून मराठवाड्यामध्ये विद्यापीठाच्या सोयाबीनच्या वाणाखाली ४० ते ५० टक्के क्षेत्र आहे तर तुरीचा बीडीएन-७११ या अतिशय नावाजलेल्या वाणाची ५०% पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी केली जाते. या वाणासह इतर सर्व वाणांच्या बीजोत्पादनसाठी यावर्षी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, बीजोत्पादन संचालक डॉ. देवराव देवसरकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली बीजोत्पादन सहसंचालक डॉ. एस. पी. मेहेत्रे, मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. व्ही. के. खर्गखराटे,  प्रभारी अधिकारी डॉ. संतोष शिंदे, डॉ. भानुदास भोंडे, डॉ. अमोल मिसाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन करून बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून दिले.
बियाणे विक्रीच्या पहिल्या दिवशी (दि. १८ मे) १८०० शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ४१८.२६ क्विंटल बियाणे खरेदी केले तर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक २० मे रोजी १९६.५२ क्विंटल बियाण्याची खरेदी केली आणि दिनांक २१ मे रोजी ५६३.२२ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना खरेदीसाठी उपलब्ध राहिले आहे यामध्ये सोयाबीन पिकाचे एमएयुएस १५८ आणि एमएयुएस १६२ हे वाण उपलब्ध असून तुरीचा बीडीएन-१३-४१ ( गोदावरी), ज्वारीचा परभणी शक्ती आणि मुगाचा बीएम २००३-२ हे वाण उपलब्ध आहेत.