Pages

Saturday, May 4, 2024

वनामकृवि, सिंजेंटा फाउंडेशन आणि सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार

अल्पभूधारक शेतकरी व कृषि पदविकाधारक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदलासाठी दिशादर्शक करार – मा. कुलगुरू डॉ. इन्द्र  मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, सिंजेंटा फाउंडेशन इंडिया पुणे आणि सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये त्रिपक्षीय सामंजस्य करार मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठामार्फत संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली, तर सिजेंटा फाउंडेशन इंडिया लिमिटेड पुणे यांच्यामार्फत संचालक श्री राजेंद्र जोग यांनी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी केली.
या सामंजस्य करारानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, सिंजेंटा फाउंडेशन पुणे व सिंजेंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या तिन्ही संस्था सांघिकरित्या, सहकार्यातून सुसंवादांच्या मार्गाने ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व पदविका धारक विद्यार्थी यांचे जीवनमान उंचावण्याचा सर्वंकष प्रयत्न करतील, याकरिता शिक्षण, संशोधन यात परस्पर सहकार्य तसेच एकूणच मनुष्यबळाचे क्षमता विकास करणे हे प्राथमिक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून त्यासाठी आय राईज प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले आहे.
याद्वारे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व कृषि पदविकाधारक विद्यार्थी यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडून येतील अशी आशा यावेळेस बोलत असताना मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी व्यक्त केली, तसेच ते यापुढे बोलत असताना म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार मायबोलीतून शिक्षण अनिवार्य असल्याकारणाने सदर सामंजस्य करारा अन्वये राबवण्यात येणाऱ्या आय राईज प्रकल्पा मुळे पदविका विद्यार्थ्यांना एक नवी उमेद मिळेल. आय राईज प्रकल्पाद्वारे कृषि तंत्र पदविकेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मायबोलीतून औद्योगिक क्षेत्रास आवश्यक असणाऱ्या अशा अनुरूप कृषि तंत्रज्ञानाचे शिक्षण हे एक महिन्याच्या प्रशिक्षणातून प्राप्त होणार आहे व प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून कार्यानुभवाची संधी मिळणार असून त्यानंतर इच्छुक उमेदवारांना औद्योगिक क्षेत्रात रोजगार प्राप्त करण्याकरिता तसेच स्वयंरोजगाराच्या संधीसाठी त्रिपक्षीय मदत मिळणार आहे. या सामंजस्य करारासाठी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे व सिंजेटा फाउंडेशन इंडियाचे श्री विक्रम बोराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक, डॉ. धर्मराज गोखले, संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, एनबीएसएसएलयुपी, नवी दिल्लीचे विभाग प्रमुख डॉ. जे.पी. शर्मा, आयडीआयएआरआय, नवी दिल्लीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मान सिंग, महाराष्ट्र राज्य कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विभाग प्रमुख डॉ.डी.एस. पेरके व प्राचार्य डॉ. नरेशकुमार ई. जायेवार उपस्थिती होती.