Pages

Saturday, June 15, 2024

वनामकृविच्या कृषि महाविद्यालय परभणीचे कृषिदुत व कृषिकन्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यासाठी सज्ज

 शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषिदुत व कृषिकन्या यांनी कार्य करावे.... मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, परभणीच्या  बी.एस्सी.(ऑनर्स) कृषि अभ्यासक्रमास शिक्षण घेत असलेल्या सातव्या सत्रातील ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम-२०२४ च्या विद्यार्थ्यांचा उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन कृषि विस्तार शिक्षण विभागाद्वारे दिनांक १३ जून रोजी आयोजित करण्यात आले होता. कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते.  ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमाच्या विद्यार्थ्यांना कृषिदुत व कृषिकन्या असे संभोधण्यात येते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, कृषिदुत व कृषिकन्या यांनी स्वावलंबी व निडर होऊन शेतक­यांच्या बरोबरीने या कार्यक्रमांतर्गत काम करावे आणि विद्यापीठाचे संशोधन शेतक­यांच्या शेतापर्यंत पोहचवुन त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी दुत म्हणुन कार्य करावे. शेतकरी आपल्यासाठी सर्वस्व आहेत असे समजुन त्यांच्या कल्याणासाठी आत्मयतीने काम करणे गरजेचे आहे.

या कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद ईस्माइल यांनी माती परीक्षण करण्याबाबत मार्गदर्शन करुन सर्व शेतक­यांची माती परीक्षण करुन त्यांनी माती परीक्षणाच्या अहवालानुसार पिकांची लागवड करावी असे आवाहन केले. विद्यापीठाचे  रावे समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम यांनी बी.एस्सी. (ऑनर्स) कृषि पदवी अभ्यासक्रमामध्ये सहाव्या सत्रापर्यंत विद्यार्थ्यांनी विविध कृषि विषयांचे ज्ञान प्राप्त केले त्याच ज्ञानाचा शेतक­यांच्या शेतावर प्रात्यक्षित स्वरुपात अवलंब करण्याची वेळ आली असून शेतावर विविध पिक लागवडीसाठी करावा. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञानाबरोबर शेतक­यांच्या समस्यांचा जवळून अभ्यास करण्याची याद्वारे संधी उपलब्ध होत आहे. कृषि पदवीच्या विद्यार्थ्यांनी स्वत:चे कृषि संलग्न व्यवसाय सुरु करुन इतर युवकांना काम देण्याचे कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कृषि अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख, डॉ. आर. जी. भाग्यवंत यांनी विद्यार्थ्यांना विविध कृषि व्यवसायिक संस्थामध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होत असुन त्या संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घेऊन स्वत: सुधा कृषि व्यवसायिक संस्था स्थापन करावी असे नमुद केले. कृषि अर्थशास्त्रचे विभाग प्रमुख, डॉ. डी. एस. पेरके यांनी विविध पिकांच्या विक्री व्यवस्थापनासंबंधीत मार्गदर्शन करुन विद्यापीठातील विविध युनिटला भेट देऊन विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती करुन घ्यावी, अशी सुचना केली. किटकशास्त्रचे विभाग प्रमुख, डॉ. पी. एस. नेहरकर यांनी मराठवाडयातील विविध किड व रोगाविषयी मार्गदर्शन करुन मित्रकीडी व शत्रुकीडी कश्या ओळखाव्यात याबाबचे प्रात्यक्षिक करुन दाखविले व शेतक­यांच्या शेतावर संभाव्य कीड व रोगाबद्दल शेतक­यांना मार्गदर्शन करावे, असे सुचित केले.

कार्यक्रमास विषय विशेषज्ञ संघ प्रमुख डॉ. पी. आर. झंवर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. ए. एस. लाड यांनी कृषि विस्तार शिक्षण, डॉ. एस. एन. पवार यांनी कृषि अभियांत्रिकी, डॉ. डी. टी. पाथ्रीकर, कृषि अर्थशास्त्र, डॉ. आर. ए. पाटील यांनी पशुसंवर्धन दुग्धशास्त्र, डॉ. एस. पी. झाडे यांनी मृदशास्त्र व कृषि रसायनशास्त्र, डॉ. एस. जी. शिंदे यांनी कृषि वनस्पतीशास्त्र, डॉ. व्हि. एम. घोळवे यांनी वनस्पती रोगशास्त्र, डॉ. आय.ए.बी. मिर्झा यांनी कृषिशास्त्र व डॉ. ए. एम. भोसले यांनी उद्यानविद्या या विषयांबाबत मार्गदर्शन केले. सदरील विद्यार्थ्यांना ऊती संवर्धन संशोधन केंद्र, सोयाबीन संशोधन केंद्र, ज्वार संशोधन केंद्र, गहु संशोधन केंद्र, मध्यवर्ती रोपवाटीका, तुती संशोधन केंद्र व कोरडवाहु शेती संशोधन केंद्र या विद्यापीठातील सात संशोधन केंद्रावर आवंटित करण्यात आले. कार्यक्रमास या संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संतोष बरकुले, मध्यवर्ती रोपवाटीका, डॉ. सी. बी. लटपटे, तुती संशोधन केंद्र आदि उपस्थित होते. कार्यक्रमास सातव्या सत्रातील २४३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.