Pages

Tuesday, June 25, 2024

वनामकृविचे विद्यार्थी पदव्युत्तर कृषि व संलग्न अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षांमध्ये महाराष्ट्रात सर्वप्रथम

विद्यार्थ्यांच्या कठोर मेहनतीचे यश…. माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि

 निखिल निळकंठ पडोळे
 
 आनंद शंकरराव शिंदे
ऋतुजा विजयकुमार तापडिया 

पुणे येथील महाराष्ट्र कृषि  शिक्षण व संशोधन परिषदेच्या महाराष्ट्र कृषि विद्यापीठे परीक्षा मंडळाद्वारा कृषि, उद्यानविद्या, कृषि अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान, वनशास्त्र, मत्स्यशास्त्र, जैवतंत्रज्ञान कृषि व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील २०२४ - २५ या शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर प्रवेशाकरिता सामाईक पात्रता परीक्षा (पीजी - सीईटी) घेण्यात आली होती.

या परीक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाचा निखिल निळकंठ पडोळे या विद्यार्थ्यास कृषि विषयात ८८.५० टक्के गुण मिळाले तसेच कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणीच्या आनंद शंकरराव शिंदे यास कृषि अभियांत्रिकी विषयात ६०.०० टक्के गुण मिळाले आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणीच्या ऋतुजा विजयकुमार तापडिया या विद्यार्थीनीस सामुदायिक विज्ञान विषयात ७३.५० टक्के गुण मिळाले आणि या तिघांनीही त्यांच्या विषयात रँकींगमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला.

पदव्युत्तर कृषि अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रातून ७५६० विद्यार्थी तर कृषि अभियांत्रिकी साठी १८६ विद्यार्थी आणि सामुदायिक विज्ञान साठी १७ विद्यार्थी सामाईक पात्रता परीक्षेसाठी बसले होते. या परीक्षेमध्ये मिळालेल्या यशानिमित्त विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इंद्र मणि  यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढे बोलताना म्हणाले की, या परीक्षेमध्ये मिळालेले यश हे विद्यार्थ्यांची जिद्द, चिकाटी, सातत्य आणि कठोर मेहनतीचे फलित असून त्यांनी ते कायम ठेवावे असे नमूद केले. तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले आणि बिजोत्पादन संचालक डॉ. देवराव देवसरकर यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.  

याबरोबरच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषि महाविद्यालयाचे २५ विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर कृषि अभ्यासक्रमाच्या यादीमध्ये पहिल्या ५६ विद्यार्थ्यांमध्ये क्रमांक मिळविलेला असून हे या वर्षाच्या निकालाचे आणखीन एक मोठे यश आहे. तसेच विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय लातूरच्या ५०, आंबेजोगाईच्या २७, धाराशिवच्या ३४ तर गोळेगावच्या १९ विद्यार्थांनी कृषि अभ्यासक्रमासाठी तसेच लातूर येथील जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांनी जैवतंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी आणि परभणी येथील अन्नतंत्र महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांनी अन्नतंत्र अभ्यासक्रमासाठी १०० व्या रँकींगच्या आत यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यापीठ आणि विद्यापीठ परिसरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यापीठातील सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी केले.