Pages

Wednesday, July 3, 2024

वनामकृवितील उद्यानविद्या महाविद्यालायाद्वारा कृषी संजीवनी सप्ताह साजरा

 मा कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांचे एक लाख वृक्षरोपणाचे आव्हान....


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) या उपक्रमांतर्गत  कृषि संजीवनी सप्ताह  'वृक्ष लागवड'  करून दिनांक 03 जुलै  रोजी मौजे. मिरखेल येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते तर शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, प्राचार्य डॉ. व्ही एस खंदारे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. रवी हरणे, सरपंच श्री. थोरवट, प्रगतशील शेतकरी श्री जनार्धन आवरगंड यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी विद्यापीठाचे शेतीच्या विकासामधील योगदाना विषयी उपस्थिताना अवगत केले. याबरोबरच जमिनीची धुप रोखण्यासाठी आणि जमिनीच्या  आरोग्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड, मृद जल संधारणाचे महत्व विशद करून एक लाख वृक्षरोपणाचे आव्हान केले.

कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम हा उपक्रम महाविद्यालयाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भाग असून या उपक्रमामध्ये राबविण्यात येणाऱ्या कार्याबदल माहिती दिली. तदनंतर उपविभागीय कृषी अधिकारी श्री. रवी हरणे यांनी कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेले विविध योजनेचे माहिती दिली. याप्रसंगी  प्रगतशील शेतकरी श्री जनार्धन  आवरगंड यांनी त्यांच्या शेतीमधील अनुभव सांगितले.

कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉ. व्ही एस खंदारे यांनी केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. व्ही एस खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक डॉ. बसलिंगअप्पा कलालबंडी आणि ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे) च्या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमासाठी  उपसरपंच श्री.कैलास देशमुख, मुख्याध्यापक श्री अशोक लोखंडे, ग्रामसेवक श्री राम पवार, आत्माच्या स्वाती घोडके, शितल पोळ यांची उपस्थिती होती.