Pages

Saturday, August 31, 2024

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातर्फे विद्यार्थीनींना दिले आत्मसंरक्षणाचे धडे


राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या  महिला तक्रार निवारण समिती आणि जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील विद्यार्थीनींसाठी आत्मसंरक्षण प्रशिक्षणचे आयोजन दिनांक २८ ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान परभणीच्या जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे, मार्शल आर्ट आणि तायकांदो प्रशिक्षक श्रीमती अयोध्या आणि श्रीमती दिपाली मुदगलकर यांनी मार्शल आर्ट आणि तायकांदोचे विविध आत्मरक्षणाचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थीनींनी कठीण प्रसंगी स्वत:चे रक्षण कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले. याबरोबरच स्वत:च्या आत्मसंरक्षणासाठी व्यायाम, खेळ, आहार अशा बाबतीत दक्षता घेऊन स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली अंगिकारण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी महिलांवर व मुलीवर होणारे अत्याचार टाळण्याकरिता तसेच स्वरक्षणासाठी त्यांनी आत्मनिर्भर व अधिक सक्षम होण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. आगामी काळात यासाठी विद्यापीठातंर्गत विविध जाणीव-जागृती कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इन्द्र मणिसर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी या प्रसंगी जाहीर केले. 

या प्रशिक्षणासाठी वर्षा मुलींचे वसतिगृह येथे विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, कृषि महाविद्यालय, अन्न तंत्र महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय येथील वास्तव्यास असणाऱ्या सर्व विद्यार्थीनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमास जिमखाना उपाध्यक्ष डॉ. सुनीता काळे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी डॉ. विद्यानंद मनवर तसेच अन्न व पोषण विभाग प्रमुख डॉ. विजया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तसेच सुत्रसंचालन सहयोगी प्राध्यापक व वर्षा मुलींच्या वासतिगृहाच्या अधिक्षिका डॉ. नीता गायकवाड यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉ. अश्विनी बेद्रे, प्रसाद देशमुख, सौ. रेखा लाड व इतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. सदरील कार्यक्रमास विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.




ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा नववा भाग संपन्न

योग्य, अचूक व वेळेतच उपाय सुचवणे हा या संवादाचा उद्देश.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग व कृषि विभागाच्या क्रॉपसॅप  प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा नववा भाग माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० ऑगस्ट रोजी संपन्न झाला. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षस्थानावरून बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, पिकांचे योग्य पद्धतीने संरक्षण करण्यासाठी शेतीतील समस्या वेळेवर समजून घेऊन त्यावर वेळेतच योग्य आणि अचूक उपाय सुचवणे हा या ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ संवादाचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांचा समस्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाचा कृषी विभाग महत्त्वाची भूमिका निभावत आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनीही शेतीविषयक समस्या कार्यक्रमामध्ये सांगाव्यात. यासाठी प्रादुर्भावग्रस्त पिकांचा फोटो किंवा व्हिडिओ या कार्यक्रमात दाखवावा, अशा प्रकारच्या प्रत्याभरणातून योग्य मार्गदर्शन करणे सोयीचे होईल. या कार्यक्रमासोबतच विद्यापीठ शेतकरी केंद्रित अनेक उपक्रम राबवीत असून यामध्ये शेतकरी – शास्त्रज्ञ - शासन यांची  महत्त्वपूर्ण भूमिका आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या या उत्साही स्वभावामुळे तसेच त्यांच्या मेहनतीमुळे देश पातळीवर नेहमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रशंसा केली जाते. शेतकऱ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमास बळकटी मिळते व शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करण्यास उत्साह निर्माण होतो, म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दर शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजता या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मागील आठवड्यात पावसाचे कमी अधिक प्रमाणामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यांचे वेळेतच नियंत्रण करण्यासाठी या कार्यक्रमातून दिलेल्या मार्गदर्शनाचा पुरेपूर लाभ घ्यावा असे प्रास्ताविकात सांगितले.

तसेच छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी वाटाणा आणि सोयाबीन या पिकांची वाढ जास्त होत आहे आणि कांड्यामधील अंतर ही वाढत असल्याने उत्पन्नात घट येऊ शकते. याकरिता या पिकाची वाढ रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिरिक्त खतांचा वापर टाळावा आणि योग्य पद्धतीने वाढ नियंत्रण ठेवावे असे नमूद केले.

तांत्रिक सत्रात डॉ. कैलास डाखोरे यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज सांगितला तसेच वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी सोयाबीन वरील चारकोल रॉट आणि पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव ओळखण्याची पद्धत आणि  त्यावरील सद्यस्थितील व्यवस्थापन सुचविले तसेच कीटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांनी सोयाबीन पिकातील तंबाखुवरील पाने खाणारी अळीची ओळख आणि त्याचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण सांगितले. 

यावेळी उद्यान पंडित श्री प्रतापराव काळे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक घटकांचे बाजारात मिळणारे औषधाचे नाव सुचविण्याची विनंती केली तसेच सहभागी शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वाढ, सोयाबीन वरील कीड व रोग याबाबत प्रमुख समस्या विचारल्या, यास विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, डॉ. अनंत लाड यांनी उत्तरे दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी तर आभार डॉ. संतोष फुलारी यांनी मानले. कार्यक्रमामध्ये कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विद्यावेत्त्ता, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक, आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यासह बुलढाणा, जळगाव येथून बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

वनामकृवित आठ दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनाद्वारे युवकांमध्ये उद्योजकता विकास करण्यासाठी दिनांक ४ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२४ दरम्यान एकूण आठ दिवसीय “बाल्य  रेशीम कीटक संगोपन कार्यक्रम” या विषयावर सशुल्क प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून या अंतर्गत प्रशिक्षणार्थींना आठ दिवस राहण्याची व भोजनाची व्यवस्था वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे करण्यात आली आहे. या प्रशिक्षणाच्या संधीचा नवीन तुती लागवड केलेल्या इच्छुक रेशीम उद्योजक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून जिल्हा रेशीम अधिकारी, केंद्रीय रेशीम मंडळ कार्यालयातील अधिकारी, विद्यापीठाचे रेशीम अधिकारी, कीटकशास्त्र विभागाचे तज्ञ तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन होणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी रेशीम संशोधन केंद्रातील वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री धनंजय मोहोड यांचा मोबाईल क्रमांक ९४०३३९२११९ यावर संपर्क करावा व आपली नोंदणी करावी असे विद्यापीठाच्या रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी कळविले आहे.

Thursday, August 29, 2024

रावे उपक्रमांतर्गत हट्टा येथे खरीप शेतकरी मेळावा आणि स्कूल कनेक्ट कार्याक्रम संपन्न

 संचालक मा. डॉ. भगवान आसेवार यांनी हवामान बदलानुसार शास्वत शेतीसाठी सुचविले तंत्रज्ञान


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, गोळेगाव अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव जागरुकता कार्यक्रम (रावे) वसमत तालुक्यातील हट्टा येथे दि. २८ ऑगस्ट रोजी खरीप शेतकरी मेळावा आणि स्कूल कनेक्ट कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटक विस्तार शिक्षण संचालक मा. डॉ. भगवान आसेवर हे होते तर अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव नारखेडे हे होते आणि सरपंच श्री दीपक हातागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. शंकर पुरी, सहाय्यक प्राध्यापक, डॉ. राहुल भालेराव आणि डॉ. प्रवीण राठोड, प्रा. संजय पवार, प्रभारी अधिकारी डॉ. डी. एच. सारंग, हट्टा येथील जिल्हा परिषद प्रशालेचे श्री मुंडीकसर, ग्रामपंचायत सदस्य श्री. गोविंद देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या उद्घाटनात  विस्तार शिक्षण संचालक मा. डॉ. भगवान आसेवर यांनी हवामान बदलानुसार शास्वत शेतीसाठी विविध तंत्रज्ञान सुचविले. तसेच त्यांनी शेतीमध्ये शक्यतो कमी खर्चाच्या आणि  घरच्या निविष्ठा वापरून शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्याचा सल्ला दिला. यावेळी स्कूल कनेक्ट कार्याक्रमाची संकल्पना राबविताना जिल्हा परिषद प्रशालेचे विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला होता त्यांना कृषि आणि सलग्न शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शेतीविकासातील महत्व मा. डॉ. भगवान आसेवर यांनी विशद केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वासुदेव नारखेडे यांनी खरीप पिकातील सद्यस्थितील उपाययोजना आणि रावे उपक्रमातील विविध उपक्रमाची माहिती दिली. तांत्रिक मार्गदर्शनामध्ये कृषि विद्यावेता डॉ. गजानन गडदे यांनी कापूस, सोयाबीन आणि हळद पिकातील सद्यस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत आणि कापुस उत्पादन वाढीसाठी गळफांदी कापणे तसेच झाडाची अतीरीक्त वाढ रोखण्यासाठी वाढ प्रतिबंधक रसायनाची फवारणी बाबत मार्गदर्शन केले. यानंतर कीटक शास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी सोयाबीन पिकातील तंबाखुवरील पाने खाणारी अळीची ओळख आणि त्याचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण तसेच कापूस, सोयाबीन आणि हळद यावरील कीड आणि रोग नियंत्रणाची माहिती सांगितली व विविध लेबलक्लेम कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापराबाबत तसेच सोयाबीन मधील विषाणुजन्य पिवळा मोझॅकचे व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. याबरोबरच प्रा. संजय पवार यांनी शेती व्यवसायात सिंचन पद्धतीचे महत्व विशद केले आणि यांत्रिकीकरणावर भर द्यावा तसेच सोलार पंप वापरण्यासाठी प्रोत्साहित केले. प्रास्ताविकात  रावे कार्यक्रम कार्यक्रमांतर्गत विद्यर्थ्यांनी राबविलेल्या कार्यक्रमाची माहिती रावे समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषेद शाळेमध्ये रावेच्या विद्यार्थ्यांनी गावाचा संपूर्ण स्थिती दर्शविणारा नकाशाचे निरीक्षण मान्यवरांनी आणि शेतकऱ्यांनी तसेच शाळेतील शिक्षकासह सर्व विद्यार्थ्यांनी अवलोकन केले तसेच शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रांचालन रावेच्या कृषि कन्या वैष्णवी म्हस्के आणि कामिनी राजे यांनी केले तर आभार ऋतुजा महाळणर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषि दूत अदनान पठाण यांचासह हट्टा येथील रावेचे सर्व कृषि दूत आणि कृषि कन्यांनी उच्चपरिश्रम घेतले. कार्यक्रमामध्ये रावेचे लिंगी, तेलगाव, हट्टा येथील सर्व कृषि दूत आणि कृषि कन्या, गावातील शेतकरी तसेच शाळेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.











वनामकृविचे कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि प्रख्यात अभियंता पुरस्काराने सन्मानित

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांना जगातील सर्वात मोठी बहु-शाखीय अभियांत्रिकी व्यावसायिक संस्था, इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), द्वारे “प्रख्यात अभियंता पुरस्कार (इमीनन्ट इंजिनिअर आवार्ड)” छत्तीसगढ राज्याचे कृषी मंत्री माननीय ना. श्री राम विचार नेताम यांच्या शुभहस्ते छत्तीसगढ येथील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, येथे दिनांक २९-३० ऑगस्ट दरम्यान आयोजित "कृषी अभियांत्रिकी : ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शाश्वत विकासाची वाटचाल" या विषयावरील राष्ट्रीय कृषी अभियंता अधिवेशन आणि राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार देणारी इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया), IEI ही भारतातील अभियंत्यांची राष्ट्रीय संस्था असून जगातील सर्वात मोठी बहु-शाखीय अभियांत्रिकी व्यावसायिक संस्था आहे. याचे १५ अभियांत्रिकी शाखांमध्ये दहा लाखांहून अधिक सदस्य असून संस्थेची स्थापना १९२० मध्ये कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाली होती आणि १९३५ मध्ये रॉयल चार्टरद्वारे तिचा समावेश करण्यात आला होता. सध्या तिचे मुख्यालय ८ गोखले रोड, कोलकाता येथे आहे. या संस्थेने कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांना त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान आणि उपलब्धींची दखल घेत दिला आहे.

कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि हे २५ जुलै २०२२ पासून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (महाराष्ट्र) येथे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. याआधी, त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषेदेच्या भारतीय कृषि अनुसंधान संस्था, नवी दिल्ली येथे उप संचालक (संशोधन), नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन शाळेचे समन्वयक, संरक्षित शेती तंत्रज्ञान केंद्राचे प्रभारी आणि कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणून काम केले आहे.

आपल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळाच्या दीर्घ आणि गौरवशाली कारकिर्दीत, त्यांनी कृषी अवशेष व्यवस्थापन, कोरडवाहू शेती, भाजीपाला यांत्रिकीकरण, लहान शेतातील यांत्रिकीकरण आणि खतांचा वापर कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपकरणांच्या विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी विकसित आणि विस्तार केलेल्या तंत्रज्ञानाचा प्रसार देशातील १९ पेक्षा जास्त राज्यांमध्ये झाला आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), कानपूर यांच्या सहकार्याने त्यांनी डिझाइन इनोव्हेशन सेंटर स्थापन केले, जे नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी कार्यरत आहे. त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान संस्था, नवी दिल्लीच्या ईशान्येकडील राज्यांतील (सर्व सात राज्ये), टीएसपी (मध्य प्रदेश) आणि एमजीएमजी (उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली) कार्यक्रमांचे समन्वयक म्हणून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी योगदान दिले आहे.

तसेच त्यांनी शेतकरी केंद्रित यांत्रिकीकरण धोरणांचे समर्थन आणि विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारताच्या कृषी ड्रोन धोरणाच्या विकासात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यासाठी त्यांनी कृषीमध्ये ड्रोनच्या वापरासाठी मानक मार्गदर्शक तत्त्वे (SoP) विकसित करण्यासाठी समितीचे संयोजक आणि अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सध्या, ते पिकांच्या पोषक तत्त्वांच्या ड्रोन-आधारित अनुप्रयोगांसाठी, ज्यात नॅनो फॉर्म्युलेशनचा समावेश आहे, मानक मार्गदर्शक तत्त्वे (SoP) विकसित करण्यासाठीच्या ड्रोन समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारयांच्या कार्यक्रमांतर्गत शेती तंत्रज्ञानाशी संबंधित नवकल्पक आणि स्टार्ट-अप्सच्या मार्गदर्शनात सक्रियपणे भाग घेतला आहे. तसेच, ते कृषी पोषणासाठी तंत्रज्ञान नवोपक्रम मंच (TIFAN) मध्ये सक्रियपणे सहभागी होते.

कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांच्या उत्कृष्ट योगदानामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि या  नवीन प्रख्यात अभियंता पुरस्काराने त्यांना सन्मानित केल्यामुळे विद्यापीठात उत्सहाचे वातावरण निर्माण झाले. या सन्मानाबद्दल विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,  विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव डॉ. संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता डॉ. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ यांच्या सह सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.


एक पेड मॉ के नाम अभियानात वनामकृविद्वारा २८१० वृक्षांची लागवड

 कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनात अभियानामध्ये अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

भारताचे माननीय पंतप्रधानांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आईच्या नावाने एक झाड –एक पेड मॉ के नाम – Plant4Mother हे अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील परिसरात तसेच विद्यापीठाच्या संपूर्ण मराठवाड्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालयांनी दिनांक २९ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण केले. या जागतिक अभियानात विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विद्यापीठ अभियंता डॉ. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे,  सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर, उप-विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांच्या शुभहस्ते वैद्यनाथ वसतीगृहाच्या मैदान परिसरात त्यांनी त्यांच्या आईसाठी वृक्षारोपण केले तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बीड जिल्ह्यातील खामगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात त्यांच्या आईच्या नावाने एक झाड लावले आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,  कुलसचिव डॉ संतोष वेणीकर यांनी नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात व कृषीतंत्र विद्यालयात आणि सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढे यांनी पशुसंवर्धन व दुग्ध शास्त्र विभागात वृक्षारोपण केले. तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात देखील सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या नावाने एक-एक झाड लावले. याबरोबरच विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, कृषि विज्ञान केंद्राचे मुख्य शास्त्रज्ञ, कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य, तसेच इतर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात तसेच प्रक्षेत्रावर त्यांच्या आईच्या नावाने वृक्षारोपण केले. या जागतिक मोहिमे अंतर्गत विद्यापीठातील एकूण ३५०  अधिकारी तसेच कर्मचारी यांनी सहभाग घेतला व त्यांनी एकूण २८१० वृक्षांची लागवड केली. या अभियानातून विद्यापीठामध्ये वृक्षरोपणाची एक चळवळ सुरू झाली असून विद्यापीठातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत वृक्षारोपण करून आपल्या मातेला तसेच पृथ्वीमातेला मानवंदना दिली.

या अभियानांतर्गत सप्टेंबर २०२४ पर्यंत देशभरात ८० कोटी रोपे आणि मार्च २०२५ पर्यंत १४० कोटी रोपे लावण्याचा प्रयत्न केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे केला जात असून याद्वारे हे उद्दिष्ट देखील पूर्ण होत आहे तसेच वृक्ष लागवडीतून माती, पाण्याची गुणवत्ता सुधारून आणि जैवविविधता वाढवून शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी मदत होत आहे.

















Wednesday, August 28, 2024

प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांद्वारा वनामकृवितील महादेवाचा महाभिषेक

 विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासाठी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनीही केली महादेवाची पूजा


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सेवेत प्रकल्पग्रस्त उमेदवारांमधून रुजू झालेल्या एकशे एकतीस कर्मचाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी नियमाकुल करण्यासाठीचा मुद्दा कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या कर्मचारी केंद्रित धोरणानुसार त्यांनी शासनाकडे मार्गदर्शनासाठी पत्र पाठवून व त्यास यश मिळविले आणि त्यांच्या परिविक्षाधीन कालावधीनियमातील आवश्यक तरतुदींची काटेकोर पूर्तता करून घेऊन नियमाकुल करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी उत्साहित होवून मनोभावातून पवित्र श्रावण महिन्यात दिनांक २८ ऑगस्ट रोजी विद्यापीठातील मृत्युंजय गवळेश्वर  महादेवाचा महाअभिषेक कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत केला. यावेळी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनीही विद्यापीठाचा सर्वांगीण विकास, कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि त्यांचा उत्कर्ष, सर्वाना चांगले आरोग्य, आनंद आणि सर्वामध्ये एकजूट राहून सौहार्द भावना निर्माण व्हावी यासाठी सद्भावनेने मृत्युंजय गवळेश्वर महादेवाची पूजा केली. यावेळी प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या महाप्रसादाचा लाभ विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी, तसेच परभणी शहरातील आणि आसपासच्या गावातील नागरिकांनी घेतला. या कार्यक्रमाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी कौतुक केले आणि आयोजक सर्व प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

कुलगुरू मा. डॉ इन्द्र मणि यांचे जवाहर नवोदय विद्यालयात प्रेरणादायी मार्गदर्शन

 

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरातील पीएम श्री शाळा जवाहर नवोदय विद्यालय येथे दिनांक २७ ऑगस्ट रोजी विज्ञान ज्योती कार्यक्रमांतर्गत प्रेरणादायक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुलगुरू मा. डॉ  इन्द्र मणि हे होते. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगताना म्हणाले की, प्रत्येकाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी उत्तम शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. शालेय शिक्षण हे आपले व्यक्तिमत्व घडविण्यास मदत करते आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवते. आपला देश कृषि प्रधान असल्याने आपण भविष्यात कृषि आणि सलग्न शाखेतील व्यावसायिक अभ्यासक्रम घेवून शेतीविकासास चालना देवू शकतो. तसेच शालेय शिक्षणासोबतच अनुभवातून मिळणारे शिक्षणदेखील दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असते त्याचेही आपण आत्मसात करणे आवश्यक आहे. याद्वारे आपण आदर्श नागरिक बनून राष्ट्राच्या विकासासाठी कार्य करू शकणार आहोत, असे प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस. व्ही. बोभाटे, वरिष्ठ अध्यापक श्री. डी. के. जुमडे श्री. व्ही. ए. पोघे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्रीनिवास करखेलिकर, वामन कनगरकर, रमेश मटकमवाड, प्रबोध मडावी, प्रियंका कैरी व सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस.जी. भोरगे यांनी केले.




Monday, August 26, 2024

सहा दिवसीय परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचा यशस्वी समारोप

 शेतकरी केंद्रीत विद्यापीठांचे संशोधन आणि विस्तार कार्य... कुलगुरू मा.डॉ. इन्द्र मणि

समारोपात शेतकऱ्यांचा उल्लेखनीय कार्याचा मान्यवरांचा शुभहस्ते यथोचित सन्मान


महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठे आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठाने विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा दृष्टीने दिनांक ऑगस्ट ते २ऑगस्ट २०२४  या कालावधीत राज्‍याचे कृषि मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे यांच्‍या संकल्‍पनेतुन आणि मार्गदर्शनाखाली तसेच कृषी विभागाच्‍या पुढाकाराने  परळी वैजनाथ (बीड) येथे परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव – २०२४ यशस्वी संपन्न होवून समारोप दिनांक २६ ऑगस्ट रोजी झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते. तर बीडचे जिल्हाधिकारी मा. श्री अविनाश पाठक (भाप्रसे), आत्माचे संचालक मा श्री. अशोक किरनळ्ळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्रीमती संगीतादेवी पाटील, वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विभागीय कृषी सहसंचालक मा श्री साहेबराव दिवेकर (लातूर), डॉ तुकाराम मोटे (छत्रपती संभाजीनगर), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुभाष साळवे, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी श्री एस. डी. गरांडे, परळीचे तहसिलदार श्री. व्यंकटेश मुंडे  आदींची प्रमुख उपस्थिती होती. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात लाडकी बहिण याजानेचे बीड जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष श्री वाल्मिकअण्णा कराड यांनी विशेष परिश्रम घेतले.  

कार्यक्रमामध्ये मान्यवरांचा शुभहस्ते शेतीव्यवसायात उल्लेखनिय कार्य केलेल्या तसेच यशस्वी शेतकऱ्यांचे आणि प्रदर्शनातील मुख्यमंत्री लाडकी बहिण, जिवंत नमुने ठेवलेले याबरोबरच शिवाभोजन दालानाधारक, परळीचा शिक्षण विभाग तसेच महोत्सवात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा यथोचित सन्मान करण्यात आला.    

अध्यक्षीय भाषणात बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठ शेतकरी देवो भव या भावनेने शेतकरी केंद्रीत संशोधन आणि विस्तार कार्य करीत असून भविष्यात विद्यापीठ राज्य शासनाचा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रे, अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, प्रगतशील शेतकरी, यांच्यात इतर राज्याहून उत्कृष्ठ असा समन्वय असल्याने शेती विकासासाठी विस्तार यंत्रणेचे उत्कृष्ट मॉडेल बनविण्यासाठी अधिक प्रयत्नशील असेल असे नमूद केले. तसेच राज्यातील चारही कृषि विद्यापीठे शेतकरी कल्याणासाठी समर्पित असून शेतकऱ्यांच्या समस्या निवारणासाठी सदैव तत्पर आहेत. याबरोबरच विद्यापीठाद्वारे महत्वपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले जाते. ते शेतकऱ्यांना प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक असून यासाठी विद्यापीठ विविध उपक्रम राबवीत आहे. यात विद्यापीठाने पारंपारिक विस्तार पद्धतीला जोड देत विविध सामाजिक माध्यमांचा उपयोग करून शेतकरी - शास्त्रज्ञ संवाद दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी सातत्याने आयोजित करत आहे. त्यामध्ये नाविन्यता ठेवून विविध विषयावर मार्गदर्शन आयोजित करून वृद्धिगत करण्यात येत असून यात विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषी विभागाचे मोठे योगदान आहे. या ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ संवादात दोन्ही बाजूने संवाद होतो आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती माहिती मिळते म्हणून कृषी क्षेत्रात हा कार्यक्रम लोकप्रिय होत आहे. यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवावा आणि शाश्वत शेती उद्योगास चालना द्यावी. याबरोबरच परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सव – २०२४ यशस्वी संपन्न झाला आणि याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना झाला म्हणून असे कार्यक्रम नियमित आयोजित व्हावेत अशी अशा व्यक्त करून त्यांनी आयोजकांचे तसेच पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे आणि प्रदर्शनातील दालनधारकांचे अभिनंदन केले.

या कृषी महोत्सवाचे आयोजन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात झाला असल्याने या विद्यापीठाचा विशेष सहभाग होता. यासाठी माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि  यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी  संपूर्ण सहा दिवसाचे नियोजन केले आणि विद्यापीठाने या महोत्सवातील प्रदर्शनामध्ये तेरा दालने उभारली होती. या दालनासह इतर विद्यापीठांच्या दालनास माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी भेट देवून निरीक्षण केले. तसेच महोत्सवात दररोज शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रांचे आयोजनाद्वारे विविध विषयावर शास्त्रज्ञ व तज्ञ व्यक्ती यांचे शेतकऱ्यांशी यशस्वी सुसंवाद  विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी घडवून आणला यासाठी आयोजकांनी त्यांचा विशेष सत्कार केला.

कार्यक्रमामध्ये आत्माचे संचालक मा श्री. अशोक किरनळ्ळी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्तविक छत्रपती संभाजीनगरचे कृषी सहसंचालक डॉ तुकाराम मोटे यांनी केले.  बीडचे पोलीस अधीक्षक मा श्री अविनाश बारगळ (भापोसे) यांच्या नियंत्रणाखाली महोत्सवात सुरक्षततेच्या यशस्वी उपाययोजना केल्या होत्या. या महोत्सवामध्ये कृषी निविष्ठा, कृषी अवजारे, सिंचन साधने, संरक्षित शेती साधने, महिला गट, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, इत्यादींची उत्पादित वस्तू , खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्व. पंडीतअण्णा मुंडे सभामंडपातील कृषि प्रदर्शनीत ४०० हून अधिक दालनात करण्यात आलेले होते. याशिवाय कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत कृषी विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम झालेले संशोधन यांची देखील माहिती महोत्सवात शेतकऱ्यांना देण्यातआले. तसेच रानभाजी महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सुत्रांचालन मंडळ कृषि अधिकारी मंजुश्री कवडे यांनी तर आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री सुभाष साळवे यांनी मानले. महोत्सवास राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील तसेच  नागपूर येथील महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी, विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि  शेतकरी बांधवांसाठी हा महोत्सव एक मोठा लाभदायक ठरला आणि या महोत्सवात त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.