Pages

Saturday, August 31, 2024

ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा नववा भाग संपन्न

योग्य, अचूक व वेळेतच उपाय सुचवणे हा या संवादाचा उद्देश.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग व कृषि विभागाच्या क्रॉपसॅप  प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा नववा भाग माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ३० ऑगस्ट रोजी संपन्न झाला. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षस्थानावरून बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, पिकांचे योग्य पद्धतीने संरक्षण करण्यासाठी शेतीतील समस्या वेळेवर समजून घेऊन त्यावर वेळेतच योग्य आणि अचूक उपाय सुचवणे हा या ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ संवादाचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांचा समस्या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाचा कृषी विभाग महत्त्वाची भूमिका निभावत आहे. याबरोबरच शेतकऱ्यांनीही शेतीविषयक समस्या कार्यक्रमामध्ये सांगाव्यात. यासाठी प्रादुर्भावग्रस्त पिकांचा फोटो किंवा व्हिडिओ या कार्यक्रमात दाखवावा, अशा प्रकारच्या प्रत्याभरणातून योग्य मार्गदर्शन करणे सोयीचे होईल. या कार्यक्रमासोबतच विद्यापीठ शेतकरी केंद्रित अनेक उपक्रम राबवीत असून यामध्ये शेतकरी – शास्त्रज्ञ - शासन यांची  महत्त्वपूर्ण भूमिका आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या या उत्साही स्वभावामुळे तसेच त्यांच्या मेहनतीमुळे देश पातळीवर नेहमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रशंसा केली जाते. शेतकऱ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमास बळकटी मिळते व शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करण्यास उत्साह निर्माण होतो, म्हणून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दर शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजता या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मागील आठवड्यात पावसाचे कमी अधिक प्रमाणामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यांचे वेळेतच नियंत्रण करण्यासाठी या कार्यक्रमातून दिलेल्या मार्गदर्शनाचा पुरेपूर लाभ घ्यावा असे प्रास्ताविकात सांगितले.

तसेच छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी वाटाणा आणि सोयाबीन या पिकांची वाढ जास्त होत आहे आणि कांड्यामधील अंतर ही वाढत असल्याने उत्पन्नात घट येऊ शकते. याकरिता या पिकाची वाढ रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी अतिरिक्त खतांचा वापर टाळावा आणि योग्य पद्धतीने वाढ नियंत्रण ठेवावे असे नमूद केले.

तांत्रिक सत्रात डॉ. कैलास डाखोरे यांनी पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज सांगितला तसेच वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी सोयाबीन वरील चारकोल रॉट आणि पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव ओळखण्याची पद्धत आणि  त्यावरील सद्यस्थितील व्यवस्थापन सुचविले तसेच कीटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांनी सोयाबीन पिकातील तंबाखुवरील पाने खाणारी अळीची ओळख आणि त्याचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण सांगितले. 

यावेळी उद्यान पंडित श्री प्रतापराव काळे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक घटकांचे बाजारात मिळणारे औषधाचे नाव सुचविण्याची विनंती केली तसेच सहभागी शेतकऱ्यांनी कापूस पिकाची वाढ, सोयाबीन वरील कीड व रोग याबाबत प्रमुख समस्या विचारल्या, यास विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, डॉ. अनंत लाड यांनी उत्तरे दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी तर आभार डॉ. संतोष फुलारी यांनी मानले. कार्यक्रमामध्ये कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विद्यावेत्त्ता, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक, आणि मराठवाड्यातील आठही जिल्ह्यासह बुलढाणा, जळगाव येथून बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.