Pages

Wednesday, August 7, 2024

कृषि कन्या व कृषि दुत तर्फे पशु लसीकरण उपक्रम

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय गोळेगाव येथील ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वसमत तालुक्यातील हट्टा आणि ब्राह्माणगाव परिसरातील पशूधनासाठी लाळ्या आणि खुरकुत्या तसेच घटसर्प रोग प्रतिबंधक लसीकरणाच्या माहितीचा उपक्रम हट्टा येथील पशुवैद्यक विभागाच्या मदतीने दि. ७ ऑगस्ट रोजी घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी कार्यक्रम समन्वयक डॉ शंकर पुरी, सरपंच श्री. जिवन चव्हाण, पशुधन पर्यवेक्षिका डॉ. सुजाता कंची यांची प्रमुख उपस्थिती होती. 

प्रास्ताविकात डॉ. शंकर पुरी यांनी कृषि महाविद्यालयातील रावे अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांविषयी अवगत केले तसेच पशुधनाच्या आरोग्याच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमात पशुधन पर्यवेक्षिका डॉ. सुजाता कंची यांनी शेतकऱ्यांना पशुलसीकरणाचे महत्व सांगितले व घटसर्प, लाळ्या आणि खुरकुत्या, फऱ्या, चर्मरोग रोगापासून आपल्या पशुंचे रक्षण करण्याविषयीचे सल्ले दिले आणि हट्टा आणि ब्राह्माणगाव येथील पशुधनास रोग प्रतीबंधात्मक लसी दिल्या.

विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पशुधनाच्या वेगवेगळ्या रोगांची व त्यावरील उपाय तसेच लसींची विषय विशेषज्ञ डॉ. शंकर नरवाडे यांनी दिलेले शिक्षण या कार्यक्रमातून प्रात्यक्षिकाद्वारे अनुभवले. कार्यक्रमामध्ये हट्टा येथील पशुवैद्यक विभागाचे नारायण पिसाळ, ओंकार गरुड आणि व्ही.एच. लोंढे यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी हट्टा व लिंगी येथील कृषि कन्या आणि कृषि दुत यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमामध्ये मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून पशुधनास लसीकरण करून घेतले.