Pages

Friday, August 9, 2024

रावे उपक्रमांतर्गत पाळोदी येथे खरीप शेतकरी मेळावा संपन्न

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, परभणी अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव जागरुकता कार्यक्रम (रावे) आणि रेशीम संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने परभणी तालुक्यातील पाळोदी येथे दि. ८ ऑगस्ट रोजी खरीप  शेतकरी मेळावा संपन्न झाला. अध्यक्ष म्हणुन उपसरपंच तौफिक खान पठाण उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणुन सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल होते आणि कार्यक्रम समन्वयक तथा विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, विभाग प्रमुख डॉ. संदीप बडगुजर, प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम यांनी मराठवाडयातील तीन हजार विदयार्थी या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्याशी जोडले गेले आहेत आणि या उपक्रमाद्वारे विद्यापीठाचे तंत्रज्ञान संपूर्ण मराठवाडा विभागात पोहचविले जाते असे नमूद केले. कार्यक्रमामध्ये विभाग प्रमुख डॉ. संदीप बडगुजर यांनी सोयाबीनवरील रोग नियंत्रण याबाबत तर कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी कापुस उत्पादन वाढीसाठी गळफांदी कापणे तसेच झाडाची अतीरीक्त वाढ रोखण्यासाठी वाढ प्रतिबंधक रसायनाची फवारणी घ्यावी व तण आणि खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. तसेच वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी हळद व विविध पिकामध्ये विद्यापीठ निर्मीत बायोमिक्स व ट्रायकोडर्माचा वापर व हुमणीचे व्यवस्थापन या विषयी माहिती दिली. प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे यांनी पारंपारीक पिकांपेक्षा रेशीम उद्योग आर्थिक फायदेशीर असुन रोजगार उपलब्ध करुन देतो व रेशीम कीटकावरील प्रमुख ग्रासरी व फ्लॅचरी रोगास प्रतिबंध कसा करावा तसेच उझीमाशीचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. तदनंतर कीटक शास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड यांनी कापुस व सोयाबिन पिकावरील प्रमुख कीडींचे व विविध लेबलक्लेम कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापराबाबत तसेच सोयाबीन मधील विषाणुजन्य यलो मोझॅकचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. शेवटी डॉ. संजोग बोकन, डॉ. योगेश मात्रे यांनी खरीप पिकातील आंतरमशागत, तण, अन्नद्रव्य, खत, कीड, रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शक केले. या कार्यक्रमाला रावेचे सर्व विद्यार्थी तसेच पाळोदी गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.