Pages

Friday, September 13, 2024

वनामकृवित १७ सप्टेंबर रोजी रबी पीक परिसंवादाचे आयोजन

राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह हे मुख्य अतिथी  




मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांचे संयुक्त विद्यमाने रबी पिक परिसंवादाचे आयोजन दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू माननीय प्रा.(डॉ.) इन्द्र मणि  हे राहणार असून मुख्य अतिथी म्हणून ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनचे माजी उप महासंचालक माननीय प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह आणि विशेष अतिथी म्हणून बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथील सनशाईन व्हिजीटेबल प्रा. लि.चे संचालक माननीय कर्नल श्री सुभाष दैशवाल हे उपस्थित राहणार आहेत. शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

परिसंवादात रबी पिक लागवड, पिकावरील कीड - रोग व्यवस्थापन आदी विषयावर विद्यापीठ शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सदर परिसंवादास जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री दौलत चव्हाण यांनी केले आहे.

तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी द्वारा विकसित रबी पिकांच्या वाणांचे बियाणे विक्रीचा शुभारंभ १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आयोजित रबी पीक परीसंवादापासून होणार आहे. यामध्ये ज्वारीचा परभणी शक्ती (२० क्विंटल), सुपर मोती (२४ क्विंटल),  परभणी मोती (४२ क्विंटल), परभणी ज्योती (८ क्विंटल)  विक्रीस उपलब्ध आहे. प्रत्येक वाणाची बॅग ४ किलोची असून प्रति बॅगचा दर ५०० रुपये असा आहे. हुरड्याचा परभणी वसंत (४ क्विंटल) हा वाण १ किलोच्या बॅग मध्ये उपलब्ध असून प्रति बॅग १५० रुपये दर आहे. 

हरभरा वाण बीडीएनजीके ७९८ (५.५० क्विंटल) , बीडीएनजी ७९७ (४० क्विंटल), फुले विक्रम (९० क्विंटल) उपलब्ध आहे. दहा किलोची बॅगची पॅकिंग असून बीडीएनजीके ७९८ या वाणाच्या दर १००० रुपये तर हरभराच्या इतर वाणाचा दर ९००  रुपये प्रति बॅग असा आहे. 

जवसाचा एलएसएल ९३ (१९ क्विंटल) हा वाण उपलब्ध असून ५ किलोची बॅग ६५० रुपये आणि २  किलोची बॅग२६० रुपये दरानुसार उपलब्ध आहे. 

करडईचे पीबीएनएस १५४ (१५ क्विंटल), पीबीएनएस १८४ (५ क्विंटल), पीबीएनएस १२ (३० क्विंटल), पीबीएनएस ८६ (३० क्विंटल), पीबीएनएस ४० (१० क्विंटल) उपलब्ध असून ५ किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध आहे. पाच किलोच्या बॅगचा दर ५५० रुपये असा आहे. 

गहू या पिकाचे वाण एनआयएडब्ल्यू १९९४ (३० क्विंटल), एनआयएडब्ल्यू ३०१ (१२ क्विंटल), एनआयएडब्ल्यू १४१५ (१० क्विंटल) उपलब्ध असून बॅग पॅकिंग ४० किलोची आहे. याचा दर २००० रुपये प्रति बॅग असा आहे.

याप्रमाणे एकूण ३९४.५० क्विंटल बियाणे रबी हंगामासाठी शेतकऱ्यांना खरेदीसाठी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले आहे.