Pages

Wednesday, September 18, 2024

कोरडवाहू शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन उत्पादकता वाढविणे गरजेचे... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाअंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विकसित केलेल्या विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करुन उत्पादकता वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. इंद्र मणि मा. कुलगुरु, यांनी कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या मुल्यांकनासाठी आलेल्या केंद्रीय पंचवार्षीक समीक्षा समिती (QRT Team) यांच्या भेटीदरम्यान आयोजीत कार्यक्रमामध्ये केले. त्यांनी कोरडवाहू तंत्रज्ञान जसे की, विहीर व कुपनलिका पुनर्भरण, रुंद वरंबा सरी पध्दत, शेततळे व त्यातील पाण्याचा पुनर्वापर, विविध आंतरपीक पध्दती तसेच कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती यासारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब कोरडवाहू शेतकऱ्यांनी हवामान बदलानुरुप परिस्थितीत करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाअंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्राच्या मुल्यांकनाकरीता पंचवार्षीक समीक्षा समिती (QRT Team) प्रा. डॉ. इंद्र मणि, मा. कुलगुरु, भुवनेश्वर येथील ओडीसा कृषि विद्यापीठाचे डॉ. एस.एन. पशुपालक, ग्वाल्हेर येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विद्यापीठाचे माजी. कुलगुरु डॉ. ए. के. सिंग, सदस्य सचिव डॉ. जी रविंद्र चारी,  प्रकल्प समन्वयक डॉ. जे.व्ही.एन.एस. प्रसाद, तसेच प्रकल्प समन्वयक डॉ. एस. के. बल यांची भेट दिनांक १४ ते १६ सप्टेंबर २०२४ दरम्यान आयोजीत करण्यात आली होती. सर्व मान्यवरांचे विद्यापीठाच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खीजर बेग, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आदींची उपस्थिती होती. मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे यांनी कोरडवाहू शेतीच्या मागील ०५ वर्षाच्या संशोधनाची उपलब्धी याबाबत सादरीकरण केले. याप्रसंगी संशोधनाच्या उपलब्धतेविषयी झालेल्या चर्चासत्रात कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, प्रा. रावसाहेब राऊत, डॉ. मदन पेंडके, डॉ. पपिता गौरखेडे, यांनी भाग घेतला.

यादरम्यान मराठवाडा विभागातील सर्व कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांचेसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस मराठवाड्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक तसेच त्यांचे प्रतिनीधी याशिवाय कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री रवि हरणे आणि आत्मा परभणीचे प्रकल्प संचालक श्री दौलत चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. सर्व शास्त्रज्ञांनी व अधिकाऱ्यांनी कोरडवाहू शेतीचे तंत्रज्ञानाचा अवलंब त्यांच्या विभागात कशा प्रकारे करण्यात आला याविषयी सादरीकरण केले.

कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातील विविध संशोधन प्रयोगांना समिती सदस्यांनी भेट दिली. हवामान बदलानुरुप परिस्थितीत मागील ०५ वर्षात झालेले तसेच सद्यस्थितीत चालू असलेले संशोधन याबाबत समितीने प्रशंसा करून समाधान व्यक्त केले. तसेच हे संशोधन अधिकाधीक शेतकऱ्यांच्या शेतावर कशा पध्दतीने नेता येईल याविषयी मार्गदर्शन केले व पोहचण्याच्या दृष्टीने आवाहन केले. जेणेकरुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांच्या उत्पादनात स्थिरता आणण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.

तसेच समितीने कोरडवाहू शेती संशोधन केंद्रामार्फत हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम परभणी तालुक्यातील ०३  गावांमध्ये मागील १० वर्षापासून  राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत मौजे. बाभुळगाव येथे शेतकरी मेळावा, चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट आयोजीत करण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतावर अवलंब केलेले विहीर व कुपनलिका पुनर्भरण, रुंद वरंबा सरी पध्दत, शेततळे व त्यातील पाण्याचा पुनर्वापर, विविध आंतरपीक पध्दती तसेच कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती याची भेट देवून  पाहणी करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी शेतकऱ्यांनी त्यांना आलेल्या अनुभव कथन करून आपले मत व्यक्त केले. या मेळाव्यास उपविभागीय कृषी अधिकारी श्री रवि हरणे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच मौजे बाभुळगाव, उजळांबा व सोन्ना येथील श्री ज्ञानोबा गणपतराव पारधे, श्री ज्ञानोबा तुकाराम पारधे, श्री भारत निळोबा आव्हाड, श्री कृष्णा ज्ञानोबा पारधे, श्री बाबासाहेब दगडूबा पारधे, श्री शिवाजी कारभारी दळवे आणि श्री गमे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीच्या वतीने तंत्रज्ञान अवलंब केलेल्या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान केला. या शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे दूत बनून विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरडवाहू शेतीच्या आधूनिक तंत्रज्ञानाचा प्रसार लगतच्या सर्व  परिसरात करावा. सध्या बहुतांश शेतकरी पारंपारिक पीक पध्दतीमध्ये कापूस, सोयाबीन, तुर, बाजरा या पिकाचा समावेश करतात. त्यामध्ये नवीन पिके फळ पिकांचा समावेश करुन अधिक उत्पादन नफा मिळविणे शक्य आहे. फळ भाजीपाला पिकामध्ये शेवगा आणि फणस याव्यतिरिक्त दुय्यम व्यवसाय जसे दुग्धोत्पादन, शेळीपालन, कुक्कुटपालन, गांडुळ खत यांचा आपल्या शेतीमध्ये अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले.

समितीने ताडकळस भागातील श्री गजानन अंबुरे यांच्या शेतावर भेट देवून रुंद वरंबा सरी पध्दतीवर पेरलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती आम्रपाली शिंदे, श्री शिवाजी काळे, श्री विलास रिठ्ठे, श्री रामकिशन तुरे, श्री संतोष धनवे, श्री सादेक शेख आणि श्री दिपक भुमरे आदींनी परिश्रम घेतले.