Pages

Sunday, September 15, 2024

राष्ट्राच्या जडणघडणीत पुढाकार घेणारे महाराष्ट्र राज्य

 मेघालयाचे महामहिम राज्यपाल श्री. सी.एच.विजय शंकर यांचे प्रतिपादन ; वनामकृवित नागरी सत्कार सोहळा

महामहिम राज्यपाल श्री. सी.एच.विजय शंकर


माननीय कुलगूरू डॉ. इन्द्र मणि

परभणी : महाराष्ट्र राज्य ही थोर संतांसह वीर पुरूषांची जन्मभुमी आहे. हे राज्य राष्ट्राच्या जडणघडणीत नेहमीच पुढाकारावर राहिलेले आजपर्यंत दिसले. येथील संस्कृती, पाहुणचार, आचरण हे उच्च दर्जाचे असून महाराष्ट्रातून खुप काही शिकण्यासारखे आहे, असे प्रतिपादन मेघालयाचे राज्यपाल सी.एच.विजयशंकर यांनी केले.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालय सभागृहात रविवारी (दि. १५ सप्टेंबर) दुपारी आदर्श व्यक्‍तीमत्व मेघालयाचे महामहिम राज्यपाल श्री. सी.एच.विजय शंकर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिंतूरचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर होते. उदघाटन आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते झाले. यावेळी आ.मेघना साकोरे-बोर्डीकर, कुलगूरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांची उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना महामहिम राज्यपाल श्री सी.एच.विजय शंकर यांनी मेघालय या राज्याचे पर्यटन असलेले आयुर्वेदिक हब हे वैशिष्ट्यपुर्ण असून तेथील सामाजिक रचना, शासकीय कामकाज, जीवनशैली, आहार पद्धती, संस्कृती याबाबतची माहिती उपस्थितांसमोर विशद केली. तसेच विचार, आहार, विहारावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून असते म्हणून भविष्यात मेघालय राजभवन हे संपूर्ण व्यसनमुक्त करण्याचा निर्धार आहे अशी आशा व्यक्‍त केली. देशाच्या प्रत्येक लढयात महाराष्ट्र हा अग्रेसर असल्याचेही म्हटले. समाजाने शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सुधारणांसाठी लक्ष केंद्रित करावे, एकसंघाने कार्य करावे असे केल्यास यश निश्‍चितच मिळते असे प्रतिपादन केले. 

दरम्यान कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी त्यांचे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या भारतीय कृषि अनुसंधान संस्थेच्या ईशान्येकडील राज्यासाठीच्या एनइएच कार्यक्रमांतर्गत मेघालय राज्यासह इतर राज्यासाठी केलेले कार्य यावेळी विशद केले. तसेच विद्यापीठाचा इतिहास, कार्यक्षेत्र आणि करत असलेल्या महत्वाकांक्षी कार्याची माहिती देताना बायोमिक्स उत्पादन, पशु शक्तीचा वापर यावरील संशोधन, विविध अवजारे निर्मिती, सेंद्रिय शेती उत्पादनातून मूल्यवर्धित पदार्थ बनवणे, विद्यापीठाची जमीन विकसित करून बीजोत्पादन कार्यक्रम राबवणे, केंद्रीय मंत्री माननीय श्री नितीन गडकरीजी यांच्या मार्गदर्शनाखाली सिंचन सुविधा मध्ये विकास करण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने माती तपासणी आधुनिक प्रयोगशाळा  स्थापन करण्यात आली. याबरोबरच मेघालय राज्याच्या कृषि विकासासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ योगदान देतील असे नमूद केले. 

अध्यक्षीय भाषणात माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी चांगल्या विचारधारेवर चालले तर जीवनात उन्नती साधता येते. महामहीम राज्यपाल यांनी सांगितलेले एकजुटीचे गुण सर्वांनी अंगीकारावे असे आवाहन केले.

यावेळी आ.मेघना बोर्डीकर यांनी परभणीचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्याची माहिती महामहिम राज्यपाल श्री सी.एस.विजय शंकर यांच्यासमोर मांडताना म्हणाल्या की, हे विद्यापीठ मराठवाडयातील शेतकर्‍यांसाठी विविध उपक्रम राबवित आहे. विद्यापीठ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन शेतकरी घेत असल्याने त्यांचे नैसर्गिक आपत्‍तीपासून होणारे पिकांचे नुकसान बर्‍यापैकी टळते. विद्यापीठाने राज्यासह देशाला विविध पदावर कार्य करण्यासाठी उच्चपदस्थ अधिकारी दिले. यासह विद्यापीठातील अन्य महत्वाच्या बाबींच्या माहिती दिली. यावेळी आ.रत्नाकर गुट्टे व विठ्ठलराव रबदडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक आयोजक श्री सुरेश भुमरे यांनी केले.